छप्परफाड रिटर्न! ‘या’ कंपनीचा ३५ पैशांचा शेअर २२० पार; १ लाखाचे ६.२९ कोटी, तुम्ही घेतलाय का?

By ऑनलाइन लोकमत | Published: February 21, 2022 07:41 PM2022-02-21T19:41:08+5:302022-02-21T19:46:56+5:30

गेल्या केवळ २ वर्षांच्या कालावधीत या कंपनीने उत्तुंग भरारी घेत गुंतवणूकदारांना भरघोस रिटर्न दिले आहे.

गेल्या अनेक दिवसांपासून शेअर मार्केटमध्ये सातत्याने चढ-उतार पाहायला मिळत आहे. विविध क्षेत्रातील अनेकविध कंपन्यांचे आयपीओ लागोपाठ सादर होत आहेत. काही कंपन्यांनी गुंतवणूकदारांना मालामाल केले. तर काही आयपीओ खूपच फ्लॉप झाले.

मात्र, टाटासह अनेक कंपन्यांनी शेअर मार्केटमध्ये दमदार कामगिरी करत गुंतवणूकदारांना छप्परफाड रिटर्न्स दिले आहेत. कोरोना संकटकाळातही अनेक कंपन्यांनी चांगली प्रगती करून दाखवल्याचे पाहायला मिळाले. यामुळे गुंतवणूकदारांचा विश्वास आणखी वाढला.

या यादीत एक कंपनी अशीही आहे, जिने अवघ्या एका वर्षात आपल्या गुंतवणूकदारांना करोडपती बनवले. या स्टॉकचे नाव आहे, SEL Manufacturing Company Limited. गेल्या वर्षभरात या कंपनीच्या स्टॉकने गुंतवणूकदारांना ११,८०८ टक्क्यांहून अधिक परतावा दिला आहे.

SEL कंपनीने गेल्या दोन वर्षांत कंपनीच्या शेअरने ६२,८४२ टक्क्यांहून अधिक परतावा दिल्याने गुंतवणूकदारांच्या भुवया उंचावल्या आहेत. गेल्या 2 वर्षांच्या शेअर्सच्या किमतीचा आढावा घेता, SEL कंपनीच्या शेअर्सनी आश्चर्यकारक परतावा दिला आहे.

SEL कंपनीच्या शेअरने २ वर्षात ६२८४२.८६ टक्के परतावा दिला आहे. २७ मार्च रोजी या शेअरची किंमत NSE वर फक्त ०.३५ पैसे होती आणि १८ फेब्रुवारी रोजी या कंपनीच्या शेअरची किंमत वाढून ती २२०.३० रुपयांवर गेली आहे.

गेल्या वर्षी याच कालावधीत २२ फेब्रुवारी २०२१ रोजी या शेअरची किंमत NSE वर १.८५ रुपयांवरुन १८ फेब्रुवारी २०२२ रोजी २२०.३० रुपयांपर्यंत वाढली. या कालावधीत गुंतवणूकदारांना ११,८०८.११ टक्के इतका जबरदस्त परतावा मिळाला आहे.

वार्षिक आधारावर पाहायचे झाल्यास, या कंपनीचा स्टॉक ३९६.१७ टक्क्यांनी वाढला आहे. ३ जानेवारी २०२२ रोजी यावर्षीच्या २०२२ च्या ट्रेडिंग पहिल्या दिवशी हा स्टॉक रु ४४.४० च्या किमतीवर होता. एका महिन्यात हा स्टॉक १५१.९२ टक्क्यांनी वाढला आहे. महिनाभरापूर्वी २१ जानेवारीला या शेअरची किंमत ८७.४५ रुपये होती.

जर दोन वर्षांपूर्वी एखाद्या गुंतवणूकदाराने या शेअरमध्ये १ लाख रुपये गुंतवले असते तर आताच्या घडीला त्याची रक्कम ६.२९ कोटी रुपये झाली असती. त्याच वेळी या स्टॉकमध्ये वर्षभरापूर्वी १ लाख गुंतवणूक केली असती, तर आता १.१८ कोटी रुपयांचा परतावा मिळू शकला असता.

वार्षिक आढाव्यानुसार, १ लाख गुंतवणुकीची रक्कम आताच्या घडीला ४.९६ लाख रुपये झाली असेल. त्याच वेळी, ही रक्कम एका महिन्यात २.५१ लाख रुपये झाली असती, म्हणजेच एका महिन्यात दुप्पट नफा मिळू शकला असता, असे सांगितले जात आहे.