Demat Account Updates: ३१ मार्चपूर्वी करा ‘हे’ काम कराच! अन्यथा होईल डीमॅट खाते बंद; महत्त्वाची अपडेट जाणून घ्या

By ऑनलाइन लोकमत | Published: March 10, 2023 04:09 PM2023-03-10T16:09:26+5:302023-03-10T16:14:55+5:30

Demat Account Updates: सेबीने शेअर बाजारातील गुंतवणूकदारांसाठी नवे निर्देश जारी केले आहेत. जाणून घ्या, डिटेल्स...

Demat Account Updates: आताच्या घडीला शेअर मार्केट कोसळताना दिसतोय. एकीकडे, अदानी समूहाचे शेअर्स चांगलेच तेजीत आलेले दिसत आहेत, तर दुसरीकडे शेअर बाजार ५९ हजारांच्याही खाली गेल्याचे पाहायला मिळत आहे. तसेच सेबीने अनेक नियमांत बदल केलेला आहे. हे नवीन नियम कठोर करण्यात आले असून, उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाईचा इशारा देण्यात आला आहे.

शेअर मार्केटमध्ये ट्रेडिंग करण्यासाठी तसेच शेअरची खरेदी विक्री करण्यासाठी डीमॅट अकाऊंट असते. ज्यांच्याकडे डीमॅट खाते आहे, त्यांच्यासाठी एक महत्त्वाची अपडेट आहे. ३१ मार्च २०२३ पूर्वी डीमॅट खात्याशी संबंधित महत्त्वाचे काम केले नाही, तर डीमॅट खाते बंद होऊ शकते, असे सांगितले जात आहे.

इन्कम टॅक्स विभागानंतर आता बाजार नियामक सेबीने शेअर बाजारातील गुंतवणूकदारांसाठी आदेश जारी केले आहेत. शेअर बाजारात गुंतवणूक करणाऱ्या सर्व गुंतवणूकदारांना सेबीच्या या आदेशाचे पालन करावे लागेल आणि जर त्यांनी तसे केले नाही तर त्यांचे डीमॅट खाते बंद केले जाऊ शकते.

शेअर बाजारात ट्रेडिंग करत असाल तर तुम्हाला डीमॅट खात्याबद्दल माहिती असणे आवश्यक आहे. डीमॅट खात्याच्या संदर्भात नामांकन म्हणजेच नॉमिनी देण्याची प्रक्रिया पूर्ण करण्याची अंतिम तारीख ३१ मार्च आहे. या कालावधीत तुम्ही नामांकन प्रक्रिया पूर्ण न केल्यास तुमचे डिमॅट खाते गोठवले जाऊ शकते.

जुलै २०२१ मध्ये स्टॉक मार्केट नियामक संस्था, सेबीने विद्यमान पात्र ट्रेडिंग आणि डिमॅट खातेधारकांना नामांकन करण्यासाठी सांगितले होते. आणि त्यासाठी मार्च २०२२ ही अंतिम मुदत होती मात्र, नंतर सेबीने प्रक्रिया पूर्ण करण्यास एक वर्षाची मुदत वाढ दिली.

अशा प्रकारे आगामी ३१ मार्च २०२३ पर्यंत तुम्ही डिमॅट खात्यात नामांकन प्रक्रिया पूर्ण न केल्यास तुमचे खाते बंद होईल आणि तुम्ही बाजारात ट्रेडिंग करू शकणार नाहीत. नॉमिनीची प्रक्रिया तुम्ही घरबसल्याही करू शकाल.

तुमच्या डीमॅट खात्यात लॉग इन करा. यानंतर उघडणाऱ्या पेजच्या 'माय नॉमिनी' ऑप्शनवर क्लिक करा. यानंतर तुम्ही 'ॲड नॉमिनी' किंवा 'ऑप्ट-आउट'चा ऑप्शन निवडू शकता. नामनिर्देशित व्यक्तीचे तपशील फाइल करा आणि नॉमिनीचा आयडी पुरावा अपलोड करा.

पुढे, 'टक्केवारी' मध्ये नॉमिनीचा हिस्सा प्रविष्ट करा. म्हणजे तुम्हाला नॉमिनीला किती टक्के वाटा द्यायचा आहे याचा तपशील तुम्हाला भरावा लागेल. यानंतर कागदपत्रावर ई-स्वाक्षरी करा. ही प्रक्रिया आधार OTP द्वारे पूर्ण होऊ शकते.

यानंतर दस्तऐवज पडताळणी केली जाईल आणि या प्रक्रियेसाठी २४ ते ४८ तासाचा कालावधी लागेल. सेबीने बाजारातील गुंतवणूकदारांना त्यांचा पॅन क्रमांक आधार कार्डशी लिंक करण्यास निर्देश दिले असून, हे काम ३१ मार्च २०२३ पूर्वी करायचे आहे. डीमॅट खातेधारकाने आधार-पॅन लिंक केले नाही, तर त्याच्या शेअर्सच्या खरेदी-विक्रीवर बंदी घातली जाऊ शकते.