पैशांचा पाऊस; नोव्हेंबर महिन्यात गुंतवणूकदारांच्या संपत्तीत 24 लाख कोटींहून अधिकची वाढ

By ऑनलाइन लोकमत | Published: November 30, 2023 05:36 PM2023-11-30T17:36:38+5:302023-11-30T17:53:52+5:30

Share Market Today: नोव्हेंबर महिन्याच्या शेवटच्या दिवशी शेअर बाजारात मोठी वाढ दिसून आली.

Share Market Today: नोव्हेंबर महिन्याचा शेवटचा दिवस शेअर बाजारासाठी लकी ठरला. महिन्याच्या अखेरच्या दिवशी सेन्सेक्स 86 अंकांच्या वाढीसह बंद झाला, तर निफ्टी वाढून 20,100 पार गेला. त्यामुळे आज एकाच दिवसात गुंतवणूकदारांच्या संपत्तीत सुमारे 2.35 लाख कोटी रुपयांची वाढ झाली.

विशेष म्हणजे, नोव्हेंबरच्या संपूर्ण महिन्यात सेन्सेक्स-निफ्टी सुमारे 5.5% वाढले आणि गुंतवणूकदारांच्या संपत्तीत सुमारे 24 लाख कोटी रुपयांची वाढ झाली. आज बीएसई मिडकॅप निर्देशांक 0.83% च्या वाढीसह बंद झाला, तर स्मॉलकॅप निर्देशांक 0.96% च्या वाढीसह बंद झाला. युटिलिटीज आणि बँका वगळता बीएसईचे इतर क्षेत्रीय निर्देशांकही हिरव्या रंगात होते.

व्यवहाराच्या शेवटी, BSE सेन्सेक्स 86.53 अंकांच्या किंवा 0.13% च्या वाढीसह 66,988.44 अंकांवर बंद झाला. तर NSE चा 50 शेअर्सचा निर्देशांक निफ्टी 36.55 अंकांनी किंवा 0.18% ने वाढून 20,133.15 वर बंद झाला.

BSE वर सूचीबद्ध कंपन्यांचे एकूण बाजार भांडवल आज 30 नोव्हेंबर रोजी वाढून 335.64 लाख कोटी रुपयांवर पोहोचले, जे आधीच्या ट्रेडिंग दिवशी म्हणजे बुधवार, 29 नोव्हेंबर रोजी 333.29 लाख कोटी रुपये होते.

अशाप्रकारे, BSE मध्ये सूचीबद्ध कंपन्यांचे मार्केट कॅप आज सुमारे 2.35 लाख कोटी रुपयांनी वाढले आहे. किंवा दुसऱ्या शब्दांत, गुंतवणूकदारांच्या संपत्तीत सुमारे 2.35 लाख कोटी रुपयांची वाढ झाली आहे.

आज सेन्सेक्समधील 30 पैकी 17 शेअर्स वाढीसह बंद झाले. यामध्ये अल्ट्राटेक सिमेंटच्या शेअर्समध्ये सर्वाधिक 3.14 टक्के वाढ झाली आहे. तर सन फार्मा, भारती एअरटेल, महिंद्रा अँड महिंद्रा आणि विप्रोचे शेअर्स 1.75% ते 2.19% च्या वाढीसह बंद झाले.

सेन्सेक्सचे केवळ 13 शेअर्स घसरणीसह बंद झाले. यामध्ये इंडसइंड बँकेचे शेअर्स सर्वाधिक 1.19% घसरून बंद झाले. तर एशियन पेंट्स, पॉवर ग्रिड, रिलायन्स इंडस्ट्रीज आणि टाटा मोटर्सचे शेअर्स जवळपास 0.71% ते 1.10% च्या घसरणीसह बंद झाले.

बॉम्बे स्टॉक एक्सचेंज (BSE) वर आज वाढीसह बंद होणाऱ्या शेअर्सची संख्या जास्त होती. एक्सचेंजमध्ये आज एकूण 3,857 शेअर्सचे व्यवहार झाले. यातील 1,900 शेअर्स वाढीसह बंद झाले. 1,812 शेअर्समध्ये घसरण दिसून आली.