Shopping : ऑनलाइन शॉपिंगमध्ये फसला आहात, मग 'हे' करावे

By ऑनलाइन लोकमत | Published: January 25, 2022 10:56 AM2022-01-25T10:56:54+5:302022-01-25T11:08:44+5:30

आपण ऑनलाइन खरेदी करताना कपडे खरेदी केलेले आहेत. त्याचे पेमेंटदेखील झालेले आहे; पण आपल्याला अजून ते कपडे मिळालेले नाहीत,

मी काही दिवसांपूर्वी ऑनलाइन शॉपिंग केली, परंतु माझी त्यात फसवणूक झाली. मी फोन पे केले होते. माझे पैसे कट झाले, पण माझी ऑर्डर मला मिळालेली नाही किंवा मिळालेले कपडे चांगल्या दर्जाचे नाहीत. - प्रियांका गांगुर्डे, संप्रीत चाैरासिया

प्रत्यक्ष बाजारात न जातादेखील आपल्याला हव्या त्या वस्तूंची खरेदी करण्याची ऑनलाइन शॉपिंगची पद्धती सध्या खूपच लोकप्रिय झाली आहे.

त्याचे अनेक फायदे आहेत हे उघड आहे; पण खरेदीच्या या पद्धतीचा फटकादेखील अनेकांना बसलेला पाहायला मिळतो. आपल्यापुढे असलेली समस्यादेखील त्याच प्रकारची आहे.

आपण ऑनलाइन खरेदी करताना कपडे खरेदी केलेले आहेत. त्याचे पेमेंटदेखील झालेले आहे; पण आपल्याला अजून ते कपडे मिळालेले नाहीत, अशी तक्रार जशी करण्यात आली आहे. तशीच दुसऱ्या तक्रारीत आपल्याला मिळालेले कपडे चांगल्या दर्जाचे नाहीत अशी तक्रार केली गेली आहे.

ऑनलाइन खरेदी ही स्मार्ट पद्धती वापरणारा ग्राहकदेखील स्मार्ट असला पाहिजे. या बाबतीत सर्वांत महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपण ज्या ऑनलाइन विक्रेत्याकडून खरेदी करतो आहोत त्याची विश्वासार्हता किती आहे.

याचा अंदाज आपल्याला आला पाहिजे. अनेकदा अयोग्य पद्धतीने काम करणारे विक्रेते खूप आकर्षक जाहिराती करीत असतात. त्या जाहिरातींकडे लक्ष न देता त्यामागची सत्यस्थिती जाणून घेणे, त्या विक्रेत्याचा बाजारातला लौकिक कशा प्रकारचा आहे ते समजाऊन घेतल्याशिवाय वस्तू खरेदी करणे चुकीचे ठरते.

अनेकदा या उत्पादकांच्या वेबसाइटस्, फेसबुकसारख्या माध्यमातून आपल्यासमोर येणारे विक्रेतेदेखील बनावट असू शकतात. ऑनलाइन खरेदी करताना त्या विक्रेत्याची तक्रार निराकरणाची, तसेच वस्तू परत घेण्याची आणि किंमत परत करण्याची पद्धती कशा प्रकारची असेल याची माहिती समजाऊन घेणे आवश्यक आहे.

ज्यांचे पैसे कट झालेले आहेत ते आता ग्राहक कायद्याचा वापर करू शकतात. खूप मोठी फसवणूक असेल तर फौजदारी कारवाईदेखील करता येऊ शकेल; पण मुळात कायद्याचा वापर करून तक्रारी सोडवून घेण्याची वेळच आपल्यावर येणार नाही याची आपण खबरदारी घेतली पाहिजे. तुमचे प्रश्न / अडचणी पाठवण्यासाठी इमेल पत्ता : tarkaikaral@gmail.com