Siddharth Mallya Net Worth: विजय मल्ल्याचा मुलगा सिद्धार्थनं केलं लग्न, काय करतो ज्युनिअर मल्ल्या, किती आहे संपत्ती?

By ऑनलाइन लोकमत | Published: June 24, 2024 08:29 AM2024-06-24T08:29:58+5:302024-06-24T09:03:37+5:30

Siddharth Mallya Net Worth: सिद्धार्थ मल्ल्या त्याच्या लक्झरी लाइफस्टाइलसाठी ओळखला जातो. सिद्धार्थनं त्याची गर्लफ्रेंड जॅस्मिनसोबत लग्न केलंय.

Siddharth Mallya Net Worth: सिद्धार्थ मल्ल्या त्याच्या लक्झरी लाइफस्टाइलसाठी ओळखला जातो. त्याच्याबद्दलच्या एका बातमीनं सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे. सिद्धार्थनं त्याची गर्लफ्रेंड जॅस्मिनसोबत लग्न केलंय. सिद्धार्थ आणि जॅस्मिन गेल्या वर्षभरापासून एकमेकांना डेट करत होते.

सिद्धार्थ मल्ल्याचे वडील विजय मल्ल्याच्या लंडनजवळील हवेली 'लेडीवॉक'मध्ये हा विवाह सोहळा पार पडला. वडील विजय मल्ल्या याच्या बिझनेस एम्पायरव्यतिरिक्त सिद्धार्थ मल्ल्यानं अनेक क्षेत्रात करिअर केलंय.

शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनं डियाजिओ येथे गिनीजचे असिस्टंट ब्रँड मॅनेजर म्हणून काम केलं. यानंतर सिद्धार्थने रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आयपीएल क्रिकेट संघाच्या संचालकाची भूमिका पार पाडली. यावेळी त्यानं संघाला कार्बन न्यूट्रल करण्यासाठी अनेक उपक्रम हाती घेतले.

सिद्धार्थनं २०१२ मध्ये 'नो बाउंड्री' नावाचा इंटरनेट टॉक शो सुरू केला होता. यातून त्यानं कॉर्पोरेट जगतापेक्षा वेगळी ओळख निर्माण केली. सिद्धार्थनं फॅशन इंडस्ट्रीतही काम केलं आहे. त्यानं अनेक प्रसिद्ध डिझायनर्ससाठी रॅम्पवॉकही केलाय. नुकताच त्यानं स्वत:चा यूट्यूब शो 'सिड सेशन्स' सुरू केला.

अनेक मीडिया रिपोर्ट्सनुसार, २०२३ पर्यंत सिद्धार्थ मल्ल्याची एकूण संपत्ती सुमारे ३८ मिलियन डॉलर (सुमारे ३,१७५ कोटी रुपये) असण्याचा अंदाज होता. बिझनेस, एन्टरटेनमेंट आणि मॉडेलिंगच्या दुनियेतून त्याची ही कमाई आहे. मात्र, त्याचा अधिकृत खुलासा करण्यात आलेला नाही.

सिद्धार्थ मल्ल्याची पत्नी जॅस्मिनही खूप डायनॅमिक आहे. अमेरिकेत राहणाऱ्या जॅस्मिनलाही सिद्धार्थप्रमाणेच नवनवीन ठिकाणी फिरणं आणि नव्या गोष्टींचा अनुभव घ्यायला आवडतं. हे तिच्या सोशल मीडिया पोस्टवरून स्पष्ट होतं. नागरी हक्क आणि मानवाधिकारासारख्या मुद्द्यांवरही ती अनेकदा बोलताना दिसते.