काय सांगता! 20-25 हजार कमवणारे बनू शकतात करोडपती; जाणून घ्या फॉर्म्युला...

By ऑनलाइन लोकमत | Published: July 7, 2024 04:16 PM2024-07-07T16:16:07+5:302024-07-07T16:25:41+5:30

SIP Investment Plans : कमी पगार असणारे कर्मचारीदेखील करोडपती बनण्याचे स्वप्न पूर्ण करू शकतात.

SIP Investment Plans : श्रीमंत व्हावे, आपल्याकडेही कोट्यवधी रुपये असावे, असे अनेकांना वाटते. मात्र, अपुऱ्या कमाईमुळे कोट्यवधी रुपये जमवण्यात अनेक अडचणी येतात. पण, आता 20-25 हजार रुपयांच्या पगारातही 1-2 कोटी रुपये जमवणे शक्य आहे. ऐकून तुम्ही चकीत व्हाल, पण नियमित आणि दीर्घकालीन गुंतवणुकीतून तुम्ही करोडपती होऊ शकता. यासाठी तुम्हाला काय करावे लागेल, कुठे गुंतवणूक करायची आणि किती गुंतवणूक करायची? हे आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.

1-2 कोटीं सारखी मोठी रक्कम जमा करण्यासाठी इक्विटी म्युच्युअल फंडात SIP, हा एक चांगला मार्ग आहे. सिस्टिमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅनद्वारे तुम्ही म्युच्युअल फंड स्कीममध्ये दर महिन्याला नियमितपणे रक्कम गुंतवता. एसआयपीची रक्कम लहान असली तरी, दीर्घकाळात तुम्हाला मोठी रक्क मिळू शकते.

समजा तुमचा पगार 20,000 रुपये आहे, त्यातील 20-25 टक्के, म्हणजे 4-5 हजार रुपये दरमहा बाजूला काढून ठेवा. तुम्ही इक्विटी म्युच्युअल फंडात रु. 5000 ची SIP केली आणि त्यात 12% वार्षिक परतावा मिळाला, तर तुम्हाला 1 कोटी रुपये जमा होण्यासाठी सुमारे 26 वर्षे लागतील. तुम्हाला 24 वर्षात 1 कोटी रुपये जोडायचे असतील, तर पगाराच्या 30 टक्के म्हणजे, 6000 रुपये एसआयपी करावे लागेल.

तुम्ही जितकी जास्त गुंतवणूक कराल तितक्या लवकर तुम्ही करोडपती होऊ शकता. कमी पगाराच्या लोकांना एकाच वेळी मोठी रक्कम गुंतवणे शक्य नसते, त्यामुळे SIP द्वारे तुम्ही करोडपती होण्याचे स्वप्न पूर्ण करू शकता.

पण, तुम्ही स्टेप-अप एसआयपीचा वापर करू शकता. म्हणजेच, तुमचा पगार वेळोवेळी वाढेल, त्यानुसार तुम्हाला वेळोवेळी SIP ची रक्कम वाढवावी लागेल. यामुळे तुम्ही कमी वेळेत करोडपती बनू शकता.

स्टेप-अप कॅल्क्युलेटरनुसार, जर तुम्ही एसआयपी 5,000 रुपयांनी सुरू केली आणि वार्षिक 10 टक्के वाढ केली. म्हणजे, दरवर्षी 10 टक्क्यांनी SIP रक्कम वाढवली, तर तुम्हाला अंदाजे 12 टक्के परतावा मिळेल. तसेच, तुम्ही 10 ऐवजी 20 टक्के वार्षिक स्टेप-अप केल्यास 1 कोटी रुपये व्हायला फक्त 16 वर्षे लागतील.

हा गुंतवणूकीचा सल्ला नसून, फक्त माहिती आहे. कुठल्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी जाणकारांचा सल्ला घ्या किंवा स्वतः विचार करुन गुंतवणूक करा.