₹१०,००० ची एसआयपी की Post Office RD? ५ वर्षांसाठी गुंतवणूक केल्यास कुठे सर्वाधिक मिळेल रिटर्न, पाहा By ऑनलाइन लोकमत | Published: November 16, 2024 10:56 AM 2024-11-16T10:56:31+5:30 2024-11-16T11:03:36+5:30
जर तुम्हाला दर महिन्याला होणारी बचत एकरकमी गुंतवणूक करण्याऐवजी कुठेतरी गुंतवायची असेल तर तुमच्याकडे दोन चांगले पर्याय आहेत. पाहूया कोणते आहेत हे पर्याय. जर तुम्हाला दर महिन्याला होणारी बचत एकरकमी गुंतवणूक करण्याऐवजी कुठेतरी गुंतवायची असेल तर तुमच्याकडे दोन चांगले पर्याय आहेत. पहिला पर्याय म्हणजे पोस्ट ऑफिस आरडी, ज्यामध्ये तुमची गुंतवणूक सुरक्षित राहील आणि परताव्याची हमी मिळेल. दुसरा पर्याय म्हणजे एसआयपी.
एसआयपीच्या माध्यमातून म्युच्युअल फंडात गुंतवणूक केली जाते. एसआयपी बाजाराशी निगडित योजना आहे, त्यामुळे त्याचा परतावाही बाजारावर आधारित असतो. अशा तऱ्हेनं जर तुम्हाला दरमहा १०,००० रुपयांची गुंतवणूक करायची असेल तर तुम्हाला किती नफा मिळेल? जाणून घेऊया.
तुम्हाला बँकेत वेगवेगळ्या मुदतीच्या आरडीचा पर्याय मिळतो, पण पोस्ट ऑफिस आरडीमध्ये पैसे गुंतवल्यास तुम्हाला ५ वर्षांसाठी आरडीमध्ये गुंतवणूक करावी लागते. पण पोस्ट ऑफिस आरडीवर तुम्हाला चांगलं व्याज दिलं जातं. सध्या यावर ग्राहकांना ६.७ टक्के दराने व्याज मिळत आहे.
जर तुम्ही पोस्ट ऑफिस आरडीमध्ये महिन्याला १० हजार रुपयांची गुंतवणूक केली तर ५ वर्षात ६,००,००० रुपयांची गुंतवणूक कराल. ६.७ टक्के व्याजानुसार तुम्हाला १,१३,६५९ रुपयांचं व्याज मिळेल. अशा प्रकारे तुम्हाला मॅच्युरिटी अमाउंट म्हणून एकूण ७,१३,६५९ रुपये मिळतील.
जर तुम्ही ५ वर्षांसाठी एसआयपीमध्ये दरमहा १० हजार रुपये गुंतवले तर इथेही तुमची एकूण गुंतवणूक ६ लाख रुपये होईल. सरासरी एसआयपी परतावा सुमारे १२ टक्के असल्याचं मानलं जातं. यामध्ये १२ टक्के व्याज म्हणून तुम्हाला २,२४,८६४ रुपये मिळतील. अशा प्रकारे ५ वर्षांनंतर तुम्हाला एकूण ८,२४,८६४ रुपये मिळतील.
एसआयपी ही मार्केट लिंक्ड स्कीम आहे, पण पैसे कमावण्यासाठी ती खूप चांगली मानली जाते. शेअर्समध्ये थेट गुंतवणूक करण्यापेक्षा यात जोखीम कमी असते आणि दीर्घ मुदतीत कंपाउंडिंगसह रुपी कॉस्ट एव्हरेजिंगचाही फायदा मिळतो. अशा वेळी तुम्हाला मोठा नफा मिळू शकतो.
दीर्घकालीन एसआयपीचा सरासरी परतावा १२ टक्के मानला जातो. परंतु तो अधिकही होऊ शकतो. एवढा परतावा सध्या इतर कोणत्याही योजनेत मिळत नाही. या योजनेत महागाईवर मात करण्याची ताकद असल्याचं जाणकारांचं मत आहे. तुम्ही एसआयपीमध्ये जितकी जास्त काळ गुंतवणूक कराल तितका तुम्हाला कंपाउंडिंगचा फायदा होईल. अशा तऱ्हेनं संपत्ती निर्मितीच्या दृष्टीने ही अतिशय चांगली योजना मानली जाते.
(टीप - यामध्ये सामान्य माहिती देण्यात आलेली आहे. हा गुंतवणूकीचा सल्ला नाही. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील जाणकार किंवा तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)