SIP करेल तुमच्या 'होम लोन'चं टेन्शन दूर, व्याजासह वसूल होतील पैसे; जाणून घ्या काय करावं लागेल? By ऑनलाइन लोकमत | Published: July 5, 2024 08:51 AM 2024-07-05T08:51:59+5:30 2024-07-05T09:02:45+5:30
Home Loan SIP Investment : गृहकर्जाच्या माध्यमातून तुम्ही स्वत:साठी प्रॉपर्टी खरेदी करता, पण मोठ्या व्याजदरानं त्याची भरपाई करता. पण तुम्ही एसआयपीच्या माध्यमातून तितकेच पैसे जमवू शकता, पाहूया कसं. Home Loan SIP Investment : गृहकर्ज हे असं कर्ज आहे जे एखाद्या व्यक्तीवर अनेक वर्ष ओझे बनल्यासारखं राहतं. गृहकर्जाच्या माध्यमातून तुम्ही स्वत:साठी प्रॉपर्टी खरेदी करता, पण मोठ्या व्याजदरानं त्याची भरपाई करता. कर्जाची मुदत जितकी जास्त असेल तितकं व्याज जास्त असतं. अशा तऱ्हेने हिशोब केला तर कधी कधी प्रॉपर्टी तुम्हाला मूळ किंमतीपेक्षा दुप्पट किंवा त्याहूनही महाग पडते.
पण घर विकत घेण्यासाठी तुमच्याकडे एकरकमी रक्कम नसेल तर कर्ज हाच एक पर्याय आहे. अशावेळी खंत बाळगण्यापेक्षा कर्ज फेडण्यात जी रक्कम गेली आहे भरपाई करावी, हादेखील एक पर्याय तुमच्यासमोर असतो. याचा एक मार्ग म्हणजे एसआयपी. तुम्हाला हवं असेल तर तुम्ही एसआयपीच्या माध्यमातून होम लोनची संपूर्ण किंमत वसूल करू शकता. यासाठी आपल्याला काय करावं लागेल हे जाणून घेऊ.
समजा तुम्ही एसबीआय बँकेकडून २५ वर्षांसाठी ३० लाखांचं कर्ज घेतलं आहे. एसबीआयमध्ये गृहकर्जाचा व्याजदर ९.५५% आहे. एसबीआय होम लोन कॅल्क्युलेटरनुसार तुम्हाला २५ वर्षात ७८,९४,५७४ रुपये बँकेला परत करावे लागतील. जर तुम्ही २० वर्षांसाठी कर्ज घेत असाल तर तुम्हाला ६७,३४,८७१ रुपये आणि १५ वर्षांसाठी कर्ज घेतल्यास ९.५५% दरानं ५६,५५,११७ रुपये परत करावे लागतील. दीर्घ मुदतीमुळे ईएमआयची रक्कम कमी होते, पण कर्जाच्या बदल्यात किंमत परत करावी लागते.
गृहकर्जाची वसुली करायची असेल तर म्युच्युअल फंड एसआयपीच्या माध्यमातून करू शकता. यासाठी गृहकर्जाचा ईएमआय सुरू होताच त्याच कालावधीसाठी मासिक एसआयपी सुरू करावी लागेल.
मूळ रक्कम आणि व्याजासह गृहकर्जाची रक्कम वसूल करण्यासाठी आपण ईएमआयच्या २०-२५% रकमेसह एसआयपी सुरू केली पाहिजे. यामुळे गृहकर्ज संपेपर्यंत तुम्ही बँकेला जेवढे पैसे द्याल, तेवढे सहज जमा करू शकाल.
एकूण गृहकर्ज : ३० लाख रुपये, टेन्योर : २० वर्षे, व्याजदर : ९.५५ टक्के, वार्षिक ईएमआय: २८,०६२ रुपये, कर्जावरील एकूण व्याज : ३७,३४,८७१ रुपये, मुद्दल रक्कम व व्याजसह एकूण देय रक्कम : ६७,३४,८७१ रुपये.
कितीची करावी लागेल एसआयपी? एसआयपी रक्कम: ईएमआयच्या २५% (७,०१५ रुपये), गुंतवणुकीचा कालावधी : २० वर्षे, अंदाजे परतावा : १२ टक्के वार्षिक, २० वर्षांनंतर एसआयपीचे मूल्य : ७०,०९,०२३ रुपये (डिस्क्लेमर: म्युच्युअल फंडातील गुंतवणूक बाजारातील जोखमीच्या अधीन असते. यात सामान्य माहिती देण्यात आलेली आहे. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील जाणकार किंवा तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.