Small Saving Schemes: सुकन्या समृद्धी योजना, पीपीएफच्या गुंतवणूकदारांसाठी मोठी बातमी, मिळू शकतं मोठं गिफ्ट

By ऑनलाइन लोकमत | Published: August 26, 2022 04:55 PM2022-08-26T16:55:37+5:302022-08-26T16:59:53+5:30

Small Saving Schemes: सुकन्या समृद्धी योजनेत जमा रकमेवर ७.६ टक्के व्याज मिळत आहे. तर पीपीएफवरील व्याजदर ७.१ टक्के आहे.

Small Saving Schemes: महागाईचा सामना करणाऱ्या छोट्या गुंतवणूकदारांना आनंदाची बातमी मिळू शकते. सरकार लहान बचत योजनांचे (small saving schemes) व्याजदर वाढवण्याची शक्यता आहे. सरकार दर तिमाहीत स्मॉल सेव्हिंग स्किम्सच्या व्याजदरांचा आढावा घेते. यानंतर नवीन व्याजदर जाहीर केले जातात. अशा परिस्थितीत, सप्टेंबर २०२२ च्या तिमाही आढाव्यात सरकार व्याजदर वाढवण्याची शक्यता आहे.

मीडिया रिपोर्ट्सनुसार, केंद्र सरकार छोट्या बचत योजनांवरील व्याजदर ०.५० वरून ०,७५ टक्क्यांपर्यंत वाढवण्याची घोषणा करू शकते. 30 जून 2022 रोजी रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) च्या रेपो दरात दोनदा वाढ करण्याचा निर्णय घेतल्यानंतरही वित्त मंत्रालयाने छोट्या बचत योजनांच्या व्याजदरात बदल केला नव्हता.

जेव्हापासून रिझर्व्ह बँकेने रेपो रेट वाढवला आहे. त्यानंतर अनेक बँकांनी ठेवींवरील व्याजदरात वाढ केली आहे. अशा परिस्थितीत या सरकारी बचत योजनांवरील व्याजदरातही वाढ होण्याची शक्यता आहे. सध्या, सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी (PPF) दरवर्षी ७.१ टक्के व्याज दर देते. तर सुकन्या समृद्धी योजनेवर (Sukanya Samridhi Yojana) सध्या ७.६ टक्के आणि एएससीवर (NSC) ६.८ टक्के वार्षिक व्याज मिळत आहे. याशिवाय किसान विकास पत्रावर ६.९ टक्के व्याज दिले जात आहे. आता लोकांना आशा आहे की सरकार या योजनांवरील व्याजदर वाढवू शकते.

कोणतीही व्यक्ती आपल्या मुलाचे भविष्य लक्षात घेऊन त्याच्या नावाने पीपीएफ खाते उघडू शकते. पालकांना 18 वर्षे वयापर्यंत खाते सांभाळावे लागते. 18 वर्षांनंतर, मूल हे खाते स्वतः चालवू शकते.

सुकन्या समृद्धी योजना (SSY) अंतर्गत कोणत्याही पोस्ट ऑफिस किंवा कमर्शिअल बँकेत खाते उघडता येते. साधारणपणे ज्या बँकांमध्ये सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी (PPF) खाते उघडण्याची सुविधा उपलब्ध आहे. त्यांच्याकडे सुकन्या समृद्धी योजना खाते उघडण्याचीही सुविधा असते.