Smart SIP Vs Regular SIP : स्मार्ट आणि रेग्युलर SIP मध्ये फरक काय, ५००० रुपयांतून २३ लाखांची होईल अधिक कमाई; कशी?

By ऑनलाइन लोकमत | Published: October 7, 2024 08:48 AM2024-10-07T08:48:00+5:302024-10-07T09:02:13+5:30

Smart SIP Vs Regular SIP : म्युच्युअल फंडात गुंतवणूक करण्यासाठी आजकाल अनेक जण स्मार्ट एसआयपीचा पर्याय निवडत आहेत. हे बाजारानुसार आपल्या गुंतवणुकीत बदल करते.

Smart SIP Vs Regular SIP Investment Tips : आजकाल अनेक जण भविष्यातील गरजा पूर्ण करण्यासाठी गुंतवणूकीकडे वळताना दिसतात. गेल्या काही वर्षांमध्ये शेअर बाजारात गुंतवणूक करणाऱ्यांची संख्या वाढली आहे. जोखीम जरी अधिक असली मिळणारा परतावा हा अधिक असल्यामुळे लोक शेअर बाजारातील गुंतवणूकीकडे वळताना दिसतात.

म्युच्युअल फंडात गुंतवणूक करण्यासाठी आजकाल अनेक जण स्मार्ट एसआयपीचा पर्याय निवडत आहेत. हे बाजारानुसार आपल्या गुंतवणुकीत बदल करते. यामुळे तुम्हाला अधिक नफा मिळण्याची अपेक्षा आहे. परंतु, नेहमीच असं होत नाही. स्मार्ट एसआयपी म्हणजे काय, ते कसं काम करतं आणि ते नेहमीच जास्त परतावा देते का? त्यासंदर्भातील प्रत्येक पैलू येथे समजून घेऊया.

एसआयपी म्हणजेच सिस्टिमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन. ही अशी पद्धत आहे जिथे तुम्ही म्युच्युअल फंडात दरमहा ठराविक रक्कम गुंतवता. परंतु, स्मार्ट एसआयपीमध्ये ही रक्कम बाजारपेठेच्या परिस्थितीनुसार बदलते.

जेव्हा शेअर बाजाराचं मूल्यांकन योग्य असतं, तेव्हा ते सहसा आपली मासिक एसआयपीची रक्कम इक्विटी म्युच्युअल फंडांमध्ये गुंतवते. जेव्हा बाजार तुलनेनं कमी मूल्यांकनावर असतो, तेव्हा ते आपल्या मासिक एसआयपीची रक्कम दुप्पट करते. जेव्हा बाजार तेजीत असतो तेव्हा ते इक्विटी योजनांमध्ये आपले पैसे गुंतवणं थांबवते.

त्यानंतर हे पैसे लिक्विड फंडात गुंतवले जातात. जेव्हा बाजार खूप तेजीत असतो तेव्हा तो आपल्या म्युच्युअल फंड युनिट्सचा काही भाग विकून प्रॉफिट बुकिंग करतात. दरम्यान, स्मार्ट एसआयपी नेहमीच चांगला परतावा देईल याची शाश्वती नाही. कधीकधी ते उलटही होऊ शकतं.

मंदीच्या बाजारात स्मार्ट एसआयपी चमकू शकतात. बाजार घसरत असताना ते अधिक गुंतवणूक करू शकतात. उच्च परताव्याची ही शक्यता असते. विशेषत: ती मंदीच्या बाजारात अधिक असते. या कालावधीत ती आपली गुंतवणूक रणनीती ऑप्टिमाइझ करू शकते.

समजा कोणी दर महिन्याच्या ५ तारखेला रेग्युलर एसआयपीद्वारे ५,००० रुपयांची गुंतवणूक करतो. बाजाराची परिस्थिती कशीही असली तरी त्यांची गुंतवणूक दरमहा पाच हजार रुपयांवर स्थिर राहते. उलट समोरची व्यक्ती स्मार्ट एसआयपीचा वापर करतो. मार्केट व्हॅल्यूएशन न्यूट्रल असेल तर स्मार्ट एसआयपीमध्ये ५,००० रुपयांची गुंतवणूक करण्याची त्यांची योजना आखली जाते.

जर बाजारात तेजी असेल तर तो अर्धीच रक्कम (२,५०० रुपये) गुंतवणार आहे. मार्केट डाऊन असेल तर तो मूळ एसआयपी रकमेच्या दुप्पट (१०,००० रुपये) गुंतवणूक करतो. या धोरणामुळे त्यांना बाजारपेठेच्या गतीचा फायदा होण्यास मदत होईल. बाजारातील मंदीच्या काळात ते अधिक युनिट्स खरेदी करतात. बाजारातील तेजीदरम्यान ते कमी गुंतवणूक करतात.

आता समजा तुम्ही रेग्युलर इक्विटी लार्ज कॅप एसआयपीमध्ये दरमहा ५,००० रुपये गुंतवता. १२ टक्के परतावा दिला असे गृहीत धरले तर १० वर्षांत ११ लाख २० हजार १७९ रुपये, १५ वर्षांत २३ लाख ७९ हजार ६७५ रुपये, २० वर्षांत ४५ लाख ९९ हजार २८७ रुपये आणि २५ वर्षांत ८५ लाख १ हजार ३३ रुपये मिळतील.

जर तुम्ही स्मार्ट एसआयपी निवडली असेल तर तुम्हाला रेग्युलर एसआयपीपेक्षा १.५% जास्त परतावा मिळू शकतो. जेव्हा तुम्ही दीर्घ मुदतीसाठी गुंतवणूक करता तेव्हा तो १.५% जास्त परतावा तुम्हाला चांगला दिसेल. १३.५ टक्के वार्षिक परताव्यावर तुम्हाला १० वर्षांत १२,१३,५५५ रुपये, १५ वर्षांत २७,०६,६५७ रुपये, २० वर्षांत ५५,१९,००३ रुपये आणि २५ वर्षांत १,०८,१६,२२२ रुपये मिळतील. अशा प्रकारे, स्मार्ट एसआयपीचा पर्याय न निवडल्यास आपल्याला २० वर्षांत ९.१९ लाख रुपये आणि २५ वर्षांत २३.१५ लाख रुपये अधिक कमावू शकता.

(टीप - यामध्ये सामान्य माहिती देण्यात आलेली आहे. शेअर बाजारातील गुंतवणूक जोखमीच्या अधीन आहे. हा गुंतवणूकीचा सल्ला नाही. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील जाणकार किंवा तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)