"... तर ९०% लोक दुसऱ्या दिवसापासून कामावर येणार नाहीत," कोण आहेत शंतनू देशपांडे जे म्हणाले असं, किती आहे नेटवर्थ?
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 9, 2025 08:47 IST2025-01-09T08:36:08+5:302025-01-09T08:47:19+5:30
शंतनू देशपांडे आपल्या वक्तव्यांमुळे ही चर्चेत असतात. लिंक्डइनवर त्यांनी भारताच्या कार्यसंस्कृतीवर आपले विचार मांडले आहेत.

Shantanu Deshpande : शंतनू देशपांडे सोशल मीडियावर नेहमीच चर्चेत असतात. ते गुरुग्राम स्थित बॉम्बे शेव्हिंग कंपनीचे सीईओ आहेत. अनेकदा ते आपल्या वक्तव्यांमुळे ही चर्चेत असतात. लिंक्डइनवरील एका पोस्टमुळे ते पुन्हा चर्चेत आलेत. लिंक्डइनवर त्यांनी भारताच्या कार्यसंस्कृतीवर आपले विचार मांडले आहेत.
"भारतात बहुतांश लोकांना आपली नोकरी आवडत नाही. भारतात अनेक जण हवं म्हणून काम करत नाहीत. आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करायचा आहे म्हणून ते काम करतात," असं त्यांनी आपल्या पोस्टमध्ये नमूद केलंय.
"बहुतांश भारतीय आपल्या नोकरीचा आनंद घेत नाही. जर भारतातील प्रत्येकाला त्यांच्या सध्याच्या नोकऱ्यांनुसार उदरनिर्वाहाचे पैसे आणि आर्थिक सुरक्षा दिली गेली तर ९९% लोक दुसऱ्या दिवसापासून कामावर येणार नाहीत," असं शंतनू देशपांडे म्हणाले.
ब्लू कॉलर वर्कर्स आणि सरकारी कर्मचाऱ्यांपासून ते गिग वर्कर्स, फॅक्टरी स्टाफ, इन्शुरन्स एजंट, बँक कर्मचारी आणि अगदी स्वत:च्या कंपनीत काम करणाऱ्यांपर्यंत सर्व क्षेत्रांमध्ये हीच परिस्थिती आहे. '१९-२० चा फरक' म्हणजे सगळीकडे परिस्थिती सारखीच आहे, असंही त्यांनी नमूद केलं. शंतनू देशपांडे यांनीही लोकांच्या श्रीमंतीवर भाष्य केले. दोन हजार भारतीय कुटुंबांकडे राष्ट्रीय संपत्तीच्या १८ टक्के मालकी आहे. या कुटुंबांचा करात १.८ टक्क्यांपेक्षा कमी वाटा आहे. हा वेडेपणा असल्याचाही ते म्हणाले.
शंतनू देशपांडे चर्चेत येण्याची ही पहिलीच वेळ नाही. ते म्हणाले की, काही व्यवसायासाठी दिल्ली बंगळुरूपेक्षा १००० टक्के चांगली आहे. झोमॅटोचे सीईओ दीपिंदर गोयल यांनी व्यवसाय सुरू करण्यासाठी बंगळुरूला जाण्याची गरज नसल्याचं सांगितल्यानंतर ही चर्चा सुरू झाली.
याशिवाय शंतनू यांनी १० मिनिटांत जेवण पोहोचवण्यावरही प्रश्नचिन्ह उपस्थित केलं. यापूर्वीही त्याची बरीच चर्चा झाली होती. जे जेवण घरी तयार व्हायला तासाभरापेक्षा जास्त वेळ लागतो, ते १० मिनिटांत तुमच्यापर्यंत कसं पोहोचवणार? अशा सेवांमध्ये अन्न त्वरीत पोहोचविण्यावर भर दिला जातो, परंतु त्याच्या गुणवत्तेवर लक्ष केंद्रित केले जात नाही, असं ते म्हणाले.
३७ वर्षीय शंतनू हे बॉम्बे शेव्हिंग कंपनीचे संस्थापक आणि सीईओ आहेत. त्यांची कंपनी गुरुग्राममध्ये आहे. त्यांच्या लिंक्डइन प्रोफाइलनुसार, ते दिल्लीत राहतात. जून २०२३ च्या आकडेवारीनुसार त्यांचा कंपनीतील हिस्सा २१.१ टक्के आहे.
शंतनू यांची नेटवर्थ किती आहे, याची नेमकी माहिती उपलब्ध नाही. पण मीडिया रिपोर्ट्सनुसार त्यांची नेटवर्थ १०० कोटींपेक्षा जास्त असल्याचं बोललं जातंय. मिंटनं दिलेल्या वृत्तानुसार, शंतनू यांची नेटवर्थ जवळपास १६७.४ कोटी रुपये आहे.