केमिकल लोचा नव्हे, हा तर लंबी रेस का घोडा!; पाहा कोणते शेअर्स देतायत जोरदार रिटर्न्स

By ऑनलाइन लोकमत | Published: July 11, 2022 10:59 AM2022-07-11T10:59:25+5:302022-07-11T11:07:47+5:30

पाहा कोणते आहेत हे शेअर्स?

केमिकल म्हणजेच रासायनिक घटक पदार्थ. खते, औषधे, सॅनिटरी उत्पादने, खाद्यपदार्ध, रंगनिर्मिती, डाय तसेच अनेक उद्योगप्रक्रियेत विविध रासायनिक घटक पदार्थ वापरले जातात.

ग्राहक जरी अशी रासायनिक उत्पादने थेट वापरत नसला तरी दैनदिन जीवनात वापरात असलेल्या बहुतांश वस्तूंमध्ये विविध केमिकल्स हमखास असतातच. यामुळे या क्षेत्रातील कंपन्यांचा व्यवसाय उत्तम राहतो. शेअर बाजारात लार्ज, मिड आणि स्मॉल कॅपमध्ये अनेक केमिकल कंपन्या लिस्ट आहेत आणि त्या अनेक वर्षांपासून गुंतवणूकदारांना उत्तम रिटर्न्स देत आहेत.

गुंतवणूकदारांनी आपल्या पोर्टफोलिओमध्ये केमिकल सेक्टरमधील काही उत्तम कंपन्यांचे शेअर्स अवश्य ठेवावेत. दीर्घ काळात उत्तम रिटर्न्स देण्याचा हातखंडा या कंपन्यांमध्ये आहे. उदाहरणादाखल काही कंपन्यांचा उल्लेख या लेखात केला आहे.

आरती इंडस्ट्रीज - या क्षेत्रातील आघाडीची कंपनी. स्पेशालिटी केमिकल्स, फार्मा, पेंट्स, डाय, रबर, छपाई शाई यांसह २०० विविध उत्पादने आहेत. चार वेळा बोनस शेअर्स आणि एकदा शेअर स्प्लिट करून गुंतवणूकदारांना उत्तम रिटर्न्स दिले आहेत. जुलै २०१२. भाव : रु. १८/- सध्याचा भाव : रु ७२३/-

अतुल लिमिटेड - कंपनीची लाइफ सायन्स आणि परफॉर्मन्स केमिकल या दोन विभागातील उत्पादने भारतात आणि जगातील अनेक देशांत निर्यात केली जातात. स्पेशालिटी केमिकल सेगमेंटमध्ये आघाडीची कंपनी. गुंतवणूकदारांना एकदा बोनस शेअर दिला आहे. जुलै २०१२ भाव : रु. २७०/- सध्याचा भाव : रु ८२१०/-

एशियन पेंट्स - घरगुती आणि इंडस्ट्रिअल पेंट्स निर्मितीमध्ये अग्रेसर आणि सुप्रसिद्ध कंपनी. केमिकल / पेंट्स सेगमेंटमध्ये बाजारातील हिस्सा कायम अग्रेसर ठेवून गुंतवणूकदारांना गेल्या अनेक वर्षांत मालामाल केले आहे. चार वेळा बोनस आणि एकदा शेअर स्प्लिट केला आहे. जुलै २०१२ भाव : रु. ३६५/- सध्याचा भाव : रु २८८०/-

यूपीएल - ॲग्रोकेमिकल आणि पेस्टीसाइड्स सेगमेंटमधील रासायनिक खते निर्मिती क्षेत्रातील अग्रेसर कंपनी. याचबरोबर इंडस्ट्रियल केमिकल क्षेत्रातही उत्तम व्यवसाय. दोन वेळा बोनस आणि एकदा शेअर स्प्लिट केला आहे. जुलै २०१२ भाव : रु. ८०/- सध्याचा भाव : रु ६९०/-

विनाती ऑरगॅनिक केमिकल्स लि. - स्पेशालिटी ऑरगॅनिक केमिकल उत्पादने बनविणारी या क्षेत्रांतील नामवंत कंपनी. एकवेळा बोनस आणि दोनदा शेअर स्प्लिट केले आहे. जुलै २०१२ भाव : रु. ४८/- सध्याचा भाव : रु २००८/-

दीर्घकाळासाठी गुंतवणूक किती उत्तम रिटर्न्स देऊ शकते हे गेल्या दहा वर्षांत शेअरचा भाव किती प्रमाणात वाढला आहे यावरूनच सिद्ध होते. गुंतवणूकदारांनी केमिकल क्षेत्रातील उत्तम कंपन्या शोधून त्याचा अभ्यास करावा आणि दीर्घकालीन गुंतवणूक नियोजन करावे. उत्तम परताव्याची बाजार ‘नीती’ यातच आहे. (टीप - कोणतीही गुंतवणूक करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आणि मार्गदर्शन घ्यावे.)