Aadhaar Card : Aadhaar मध्ये केवळ एकदा करू शकता 'हा' बदल; अनावधानानेही करू नका 'ही' चूक; पुन्हा संधी मिळणार नाही By ऑनलाइन लोकमत | Published: September 20, 2024 08:51 AM 2024-09-20T08:51:35+5:30 2024-09-20T09:18:24+5:30
Aadhaar Card : तुम्हाला यूआयडीएआयकडून आधारमध्ये अनेक गोष्टी अपडेट करण्याची संधी दिली जाते. पण आधारमधील प्रत्येक चूक पुन्हा पुन्हा दुरुस्त करता येत नाही. आधार कार्ड हे आजच्या काळातील महत्त्वाचे दस्तऐवज आहे. काही वेळा तुम्ही घर बदलता, मग तुमचा पत्ता बदलतो आणि तुम्ही तुमच्या आधार कार्डमध्येही ते बदलू शकता. यासाठी तुम्हाला यूआयडीएआयकडून आधार अपडेट करण्याची संधी दिली जाते. पण आधारमधील प्रत्येक चूक पुन्हा पुन्हा दुरुस्त करता येत नाही.
आधारमध्ये बदल करण्याबाबत काही नियम करण्यात आले आहेत. एखादी व्यक्ती आपलं नाव, पत्ता, लिंग आणि जन्मतारीख किती वेळा बदलू शकते आणि ती बदलण्याचा मार्ग काय आहे हे आज आपण जाणून घेऊ.
युनिक आयडेंटिफिकेशन ऑथॉरिटी ऑफ इंडियाच्या (यूआयडीएआय) म्हणण्यानुसार, लिंग आणि जन्मतारीख ही एकदाच बदलली जाऊ शकते. त्यात कोणत्याही प्रकारची चूक असेल तर ती एकदा दुरुस्त करून घेऊ शकता. पण ही संधी तुम्हाला पुन्हा पुन्हा मिळणार नाही.
आधार कार्डधारकांना आपलं नाव (Name Change in Aadhaar) जास्तीत जास्त २ वेळा बदलण्याची सुविधा दिली जाते. म्हणजेच तुम्हाला केवळ दोनवेळा नाव बदलता येतं. तुमच्या नावात काही चूक असेल किंवा लग्नानंतर एखाद्या महिलेला आडनाव बदलावं लागलं तर ती हे काम फक्त दोनदा करू शकता.
आधार कार्डवरील पत्ता तुम्ही कितीही वेळा बदलू शकता (Address Change in Aadhaar), त्यासाठी कोणतीही मर्यादा निश्चित करण्यात आलेली नाही. इलेक्ट्रिसिटी/वॉटर/टेलिफोन बिल, रेंटल अॅग्रीमेंट असे वैध पुरावे देऊन किंवा आधार नोंदणी केंद्रावर जाऊन तुम्ही तुमचा पत्ता ऑनलाइन बदलू शकता.
नाव बदलण्यासाठी आधार नोंदणी केंद्रावर जा आणि आपला आधार क्रमांक अधिकाऱ्याला द्या. तिथे तुम्हाला आधार एनरोलमेंट फॉर्म भरावा लागेल. ते भरून आवश्यक कागदपत्रे जोडावी लागतील. फॉर्म आणि सर्व कागदपत्रे मिळाल्यानंतर एक्झिक्युटिव्ह ऑथेंटिकेशनसाठी तुमचा बायोमेट्रिक डेटा घेऊन माहिती एन्टर करावी लागेल.
कागदपत्राचा पुरावा स्कॅन करून मूळ कागदपत्र परत केली जातात. अर्ज प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर अधिकारी पावती क्रमांक असलेली पावती देतात. आधार अपडेट स्टेटस ट्रॅक करण्यासाठी संबंधित क्रमांकाचा वापर केला जाऊ शकतो. या कामासाठी ५० रुपये शुल्क आकारलं जातं.
जर तुम्हाला आधारची जन्मतारीख बदलायची असेल तर त्यासाठी जवळच्या आधार नोंदणी केंद्रात जाणं योग्य ठरेल. कारण ही संधी तुम्हाला एकदाच दिली जाते. त्यासाठी पॅनकार्ड, जन्मदाखला, पासपोर्ट, बँकेचं पासबुक, विद्यापीठानं दिलेलं प्रमाणपत्र आदी कागदपत्रांची आवश्यकता भासणार आहे. तसंच करेक्शन फॉर्मही भरावा लागतो. यानंतर आधार केंद्रावर उपस्थित अधिकारी तुमचे बायोमेट्रिक डिटेल्स घेऊन त्याची पडताळणी करतील, ज्यामध्ये तुमच्या फिंगर प्रिंटपासून आयरिस स्कॅनपर्यंतची कामं केली जातात.
यानंतर तुमची कागदपत्रे योग्य आढळल्यास तुमची जन्मतारीख अपेडट केली जाते. आधारमध्ये जन्मतारीख बदलण्यासाठी तुम्हाला ५० रुपये शुल्क म्हणून भरावं लागेल. आधार केंद्रावर तुम्हाला एक यूआरएन स्लिप दिली जाते ज्याद्वारे तुम्ही आधार अपडेट रिक्वेस्टची स्थिती ऑनलाइन ट्रॅक करू शकता.
आपला पत्ता बदलण्यासाठी सर्वप्रथम यूआयडीएआयच्या अधिकृत वेबसाइट myaadhaar.uidai.gov.in/ जाऊन लॉगिन करा. टॉप मेनूमध्ये आधार अपडेट ऑप्शनवर जा. यानंतर Proceed to Aadhaar update या पर्यायावर क्लिक करा. आता पुढच्या पेजवर पत्ता सिलेक्ट करा आणि Proceed to Aadhaar update च्या पर्यायावर क्लिक करा. यानंतर तुमचा सध्याचा पत्ता तुमच्या स्क्रीनवर दिसेल.
तुम्हाला ज्या पत्त्याला अपडेट करायचं आहे त्याचा पर्याय येईल. तुम्हाला नवीन पत्त्याचा तपशील भरावा लागेल. यानंतर तुम्हाला काही कागदपत्रे अपलोड करावी लागतील. आपल्याला खालील दोन्ही चेक बॉक्सवर क्लिक करावं लागेल आणि नेक्स्टवर क्लिक करावं लागेल. यानंतर तुम्हाला पेमेंटचा ऑप्शन दिसेल. येथे तुम्हाला ५० रुपये नॉन रिफंडेबल फी भरावी लागेल. पेमेंट पूर्ण होताच तुम्हाला एक पावती मिळेल. यानंतर एक-दोन दिवसात तुमचं आधार अपडेट होईल.