पतीसोबत २०१६ मध्ये सुरू केली कंपनी, ३५ व्या वर्षी बनली अब्जाधीश; आता आलाय IPO

By ऑनलाइन लोकमत | Published: November 2, 2023 09:02 AM2023-11-02T09:02:09+5:302023-11-02T09:13:45+5:30

मामाअर्थ (MamaEarth) हा आज भारतातील एक प्रसिद्ध ब्रँड आहे. वाचा यामागची कहाणी.

मामाअर्थ (MamaEarth) हा आज भारतातील एक प्रसिद्ध ब्रँड आहे. ६ वर्षांच्या आत, ममाअर्थची मूळ कंपनी होनासा कन्झ्युमर प्रायव्हेट लिमिटेड (Honasa Consumer Private Limited) ही युनिकॉर्न बनली. भारतात टॉक्सिन फ्री बेबी प्रोडक्ट्स उपलब्ध असत्या तर कदाचित ममाअर्थ सारख्या ब्रँडचा पाया रचला गेला नसता.

मामाअर्थच्या सह-संस्थापक गझल अलघ यांना जेव्हा त्यांच्या मुलासाठी टॉक्सिन फ्री उत्पादनं सापडली नाही तेव्हा टॉक्सिन फ्री बेबी प्रोडक्ट्स तयार करण्याची त्यांना कल्पना सुचली. त्यांना परदेशातून टॉक्सिन फ्री उत्पादनं मागवावी लागत होती. गझल यांनी आपले पती वरुण यांच्यासोबत २०१६ मध्ये होनासा कंझ्युमर प्रायव्हेट लिमिटेड नावाचा स्टार्टअप सुरू केला आणि ममाअर्थ या ब्रँड नावानं बाजारात प्रोडक्ट लाँच केले.

मामाअर्थ आज एक मोठा ब्रँड बनला आहे. गझल आणि वरुण यांची कंपनी Honasa आता बाजारात बेबी केअर, स्किन केअर आणि ब्युटी सेगमेंटमध्ये अनेक उत्पादनांची विक्री करते. ममाअर्थव्यतिरिक्त, द डर्मा को (The Derma Co) आणि बीब्लंट (BeBlunt) हे देखील होनासाचे ब्रँड आहेत.

सेबीनं Honasa ला ऑगस्ट २०२३ मध्ये आयपीओ लाँच करण्यास मान्यता दिली होती. कंपनीचा आयपीओ ३१ ऑक्टोबर रोजी खुला झाला आणि त्यात २ नोव्हेंबरपर्यंत पैसे गुंतवता येणार आहेत. या IPO च्या माध्यमातून कंपनीला बाजारातून सुमारे १,७०० कोटी रुपये उभे करायचे आहेत.

गझल अलघ यांचा मुलगा अगस्त्यला जन्मापासूनच त्वचेची समस्या होती. टॉक्सिन असलेलं कोणतेही उत्पादन त्याला चालत नव्हतं. भारतात टॉक्सिन फ्री प्रोडक्ट्स नसल्यामुळे गझल आणि वरुण यांना परदेशात जाणाऱ्या त्यांच्या मित्रांकडून टॉक्सिन फ्री प्रोडक्ट्स घ्यावी लागली. अनेक पालक या समस्येशी झगडत असल्याचं गझल यांच्या लक्षात आलं. येथूनच गझल यांना मामाअर्थ सुरू करण्याची कल्पना सुचली.

गझल यांनी २०१० मध्ये पंजाब विद्यापीठातून इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी विषयाची पदवी मिळवली. त्यांनी न्यूयॉर्क युनिव्हर्सिटी ऑफ आर्टमधून इंटेन्सिव्ह कोर्सही केला आहे. त्यांनी आयटी क्षेत्रात कॉर्पोरेट ट्रेनर म्हणूनही काम केलं. अलघचे पती वरुण यांनीही हिंदुस्थान युनिलिव्हर आणि इन्फोसिस सारख्या कंपन्यांमध्ये काम केलं होतं.

२०१६ मध्ये, जेव्हा गझल अलघ आणि वरुण यांनी मामाअर्थ सुरू करण्याचा निर्णय घेतला तेव्हा वरुण कोका-कोला येथे वरिष्ठ ब्रँड व्यवस्थापक म्हणून काम करत होते. वरुण यांनी आपल्या नोकरीचा राजीनामा दिला आणि गझल यांच्यासोबत कामाला सुरुवात केली.

होनासा कन्झुमर २०२२ मध्ये युनिकॉर्न बनले. ज्या स्टार्टअपचं मूल्य १ अब्ज डॉलर्सपेक्षा अधिक आहे, म्हणजे आजनुसार सुमारे ८३०० कोटी रुपये, त्याला युनिकॉर्न म्हणतात. Sequoia Capital च्या नेतृत्वाखाली कंपनीनं ५.२ कोटी रुपये उभारून हा टप्पा गाठला.

होनासा कंझ्युमरचा महसूल आता १००० कोटी रुपयांच्या जवळपास आहे. कंपनीची स्वतःची रिसर्च लॅबही आहे जिथे प्रोडक्ट विकसित केले जातात आणि त्यांची चाचणीही केली जाते. अमेरिकेच्या मेडेसेफ एजन्सीद्वारे त्यांच्या चाचण्या केल्या जातात, कंपनीने मेडेसेफ मार्गदर्शक तत्त्वांनुसार फॉर्म्युलेशन केलं आहे.