State Bank Of India : आता देशातील सर्वात मोठ्या बँकेनं वाढवला BPLR, स्टेट बँकेचे सर्व लोन होणार महाग

By ऑनलाइन लोकमत | Published: September 15, 2022 01:54 PM2022-09-15T13:54:22+5:302022-09-15T14:03:05+5:30

बँकेने असे केल्याने ग्राहकांवर होम लोन, कार लोन आणि पर्सनल लोनच्या ईएमआयचा बोजा आणखी वाढेल.

देशातील सर्वात मोठी सार्वजनिक क्षेत्रातील बँक स्टेट बँक ऑफ इंडियाने (SBI) बेंचमार्क प्राइम लेंडिंग रेट 70 बेसिस पॉईंटने वाढवला आहे. एसबीआयच्या वेबसाइटवर दिलेल्या माहितीनुसार, या वाढीनंतर सुधारित दर आता 13.45 टक्क्यांवर गेले आहेत. आता हे नवे दर 15 सप्टेंबरपासून लागू होतील. यानंतर आता ग्राहकांवर होम लोन, कार लोन आणि पर्सनल लोनच्या ईएमआयचा बोजा आणखी वाढेल.

एसबीआयनं आपल्या वेबसाईटवर दिलेल्या माहितीनुसार बेंचमार्क प्राईम लेंडिंग रेट 15 सप्टेंबरपासून 13.45 टक्के प्रति वर्ष असं रिव्हाईज करण्यात आलं आहे. या निर्णयामुळे बीपीएलआरशी निगडीत कर्जाचे हप्ते महागणार आहेत. यापूर्वी बीपीएलआर दर 12.75 टक्के होते. यापूर्वी जून महिन्यात हे दर रिव्हाईज करण्यात आले होते.

बँका तिमाही आधारावर बीपीएलआर आणि बेस रेट दोन्ही रिव्हाईज करतात. येत्या काही दिवसांत बँक पुन्हा एकदा या दरांमध्ये सुधारणा करू शकते. SBI बँकेने RBI च्या बैठकीपूर्वी बेंचमार्क कर्जदरात वाढ केली आहे. आता RBI ची पतधोरण बैठक 28 ते 30 सप्टेंबर दरम्यान होणार आहे. या बैठकीत वाढत्या महागाईला आळा घालण्यासाठी काय निर्णय घेते हे पाहावं लागणार आहे.

गुरूवारी कामकाजादरम्यान बीएसईवर स्टेट बँकेच्या शेअर 0.22 टक्क्यांनी घसरून 570.50 रूपयांवर होता. बुधवारी शेअर बाजारात अधिक विक्री दिसून आली होती, तरी शेअर बाजाराचे दर 574.65 रूपयांच्या उच्चांकी स्तरावर पोहोचले होते.

यापूर्वी एचडीएफसी बँकेनं आपल्या मार्जिनल कॉस्ट ऑफ फंड्स बेस्ड लेंडिंग रेटमध्ये (MCLR) 10 बेस पॉईंट्सची वाढ केली होती. MCLR दर वाढल्याने नवीन आणि जुन्या गृहकर्ज, वाहन कर्ज आणि इतर अनेक कर्जांचे EMI महाग होणार झाले. एचडीएफसी बँकेने आपल्या सर्व टेन्योरसाठी हे लेंडिंग रेट्स वाढवले आहेत. वाढलेले नवीन दर 7 सप्टेंबरपासून लागू करण्यात आलेत.

एडीएफसी बँकेनं आपल्या 1 वर्षांचा एमएलसीआर रेट वाढवून 8.2 टक्के केला आहे. तर ओव्हरनाइट एमएलसीआर रेट वाढवून 7.9 टक्के केलाय. 1 वर्षांच्या एमएलसीआर रेटमध्ये वाढ रिटेल लोनच्या कारणामुळे महत्त्वाचे ठरते. बँकेचे लाँग टर्म लोन्स जसे की होम लोन या रेटला लिंक्ड असतात. एचडीएफसी बँकेनं 1 महिना, 3 महिने, आणि 6 महिन्यांच्या टेन्योरसाठी एमएलसीआर रेटमध्ये अनुक्रमे 7.90 टक्के, 7.95 टक्के आणि 8.05 टक्के वाढ केली आहे.

कोणतीही बँक आपले व्याजदरर मार्जिनल कॉस्ट ऑफ फंड्स बेस्ड लेंडिंग रेटवर ठरवतात. एमएलसीआर रिझर्व्ह बँकेद्वारे 2016 मध्ये सुरू करण्यात आला होता. हा रेट कमी झाला किंवा वाढला तर त्यावर ग्राहकांचा ईएमआय अवलंबून असतो. बँका आपापल्या हिशोबाना एमएलसीआर ठरवत असतात.

रिझर्व्ह बँकेनं रेपो दरात बदल केल्यानंतर बँका आपल्या एमएलसीआर दरात बदल करतात. जर एमएलसीआर अधिक असेल तर ग्राहकांना अधिक व्याज द्यावं लागतं. ते कमी झाल्यानंतर कमी व्याजदरानं ईएमआय द्यावे लागतात.