'Steelbird' नाव ऐकलंच असेल, आगीत फॅक्ट्री गेली; २१ कोटीचं कर्ज, आता आहेत ५५४ कोटींचे मालक

By ऑनलाइन लोकमत | Published: October 22, 2023 10:34 AM2023-10-22T10:34:48+5:302023-10-22T10:47:19+5:30

भारतातील अनेक मोठ्या उद्योगपतींच्या यशोगाथा आज लाखो तरुण उद्योजकांना प्रेरणा देत आहेत.

भारतातील अनेक मोठ्या उद्योगपतींच्या यशोगाथा आज लाखो तरुण उद्योजकांना प्रेरणा देत आहेत. गेल्या काही वर्षांत अनेक तरुणांनी नोकरी सोडून व्यवसाय करण्याचा निर्णय घेतला आणि आज ते लाखो लोकांना रोजगार देत आहेत. ज्या यशस्वी व्यावसायिकाची कहाणी आम्ही तुम्हाला सांगणार आहोत, त्यांनी आपला व्यवसाय अशा वेळी सुरू केला जेव्हा कोणताही उद्योग सुरू करणं सोपं काम नव्हतं.

स्टीलबर्डचं नाव तुम्ही ऐकलं असेलच. हेल्मेटच्या जगात हे एक प्रसिद्ध नाव आहे. उत्कृष्ट उत्पादनाच्या गुणवत्तेमुळे स्टीलबर्ड हेल्मेट ही आशियातील नंबर वन कंपनी बनली आहे.

स्टीलबर्डच्या मालकाची यशोगाथाही त्याच्या ब्रँडप्रमाणेच जबरदस्त आहे. देशात हेल्मेट किंग म्हणून ओळखले जाणारे स्टीलबर्डचे एमडी राजीव कपूर यांनी कठोर परिश्रमातून ५५४ कोटी रुपयांची कंपनी उभी केली आहे.

राजीव कपूर यांचा व्यवसायाचा प्रवास लहानपणापासूनच सुरू झाला. शाळेतून वेळ मिळाल्यानंतर ते आपल्या वडिलांसोबत कारखान्यात जायचे. यावेळी त्यांचे वडील त्यांना कारखान्यात हेल्मेट कसे बनवतात हे सांगायचे आणि त्याची माहिती द्यायचे. त्यांचा हा प्रवास दीर्घकाळ सुरू होता.

राजीव कपूर यांचे शालेय शिक्षण पूर्ण होताच ते आपल्या या कामात गुंतले आणि कॉलेजचं शिक्षणही सुरू ठेवलं. मीडिया रिपोर्ट्सनुसार राजीव कपूर यांनी सांगितलं की, मी प्रत्येक कामाला आव्हान म्हणून घ्यायचो. वडील मला या कामात निष्णात बनवत होते.

स्टीलबर्ड हा हेल्मेट उत्पादनातील एक आघाडीचा ब्रँड आहे, परंतु कंपनीनं कोणत्याही सेलिब्रिटीला ब्रँड अॅम्बेसेडर बनवलेलं नाही. स्टीलबर्ड ६० वर्षांपासून बाजारात आहे आणि तो स्वतःच एक ब्रँड बनला आहे, असा विश्वास राजीव कपूर यांनी व्यक्त केला. आपलं हेल्मेट हे अनेक लोकांसाठी संरक्षणात्मक कवच बनलं आहे, त्यामुळे आजही ते लोकांची पहिली पसंती असल्याचं त्यांचं म्हणणं आहे.

२००२ मध्ये राजीव कपूर यांच्या आयुष्यात एक वेदनादायक क्षण आला. त्यावेळी कंपनीच्या मायापुरी युनिटमध्ये भीषण आग लागली. ज्या दिवशी ही घटना घडली त्यादिवशी ते ४ कोटी रुपयांचा माल निर्यात करणार होते. पण या आगीत सर्व काही उद्ध्वस्त झालं.

एचटीच्या रिपोर्टनुसार, त्यावेळी राजीव कपूर यांनी कंपनीचा विस्तार करण्यासाठी २१ कोटी रुपयांचं कर्जही घेतलं होतं. मात्र, अशा कठीण परिस्थितीतही राजीव कपूर यांनी मागे वळून पाहिलं नाही आणि कठोर परिश्रम सुरूच ठेवले. त्याचाच परिणाम म्हणजे आज स्टीलबर्ड कंपनी सतत प्रगती करत आहे.