शेअर बाजारात सलग 6 दिवस घसरण; 18 लाख कोटी रुपये बुडाले, हे आहे त्यामागचे कारण... By ऑनलाइन लोकमत | Published: June 19, 2022 05:46 PM 2022-06-19T17:46:16+5:30 2022-06-19T17:50:52+5:30
Why Share Market Is Falling: अमेरिकन मध्यवर्ती बँकेने व्याजदरात केलेली आक्रमक वाढ, उच्च चलनवाढ आणि शेअर्सचे उच्च मूल्यांकन, यामुळे FPI's जूनमध्येही विक्री करत आहेत. Share Market Falling: अमेरिकन मध्यवर्ती बँकेने व्याजदरात केलेली आक्रमक वाढ, उच्च चलनवाढ आणि समभागांचे उच्च मूल्यांकन, यामुळे विदेशी पोर्टफोलिओ गुंतवणूकदारांची (भारतातील FPI गुंतवणूक) विक्री जूनमध्ये सुरूच आहे. या महिन्यात आतापर्यंत FPI's ने भारतीय समभागातून 31,430 कोटी रुपये काढले आहेत. डिपॉझिटरी डेटावरुन ही माहिती मिळाली.
अशा प्रकारे, चालू वर्षात म्हणजे 2022 मध्ये, FPI's ने आतापर्यंत 1.98 लाख कोटी रुपयांचे शेअर्स विकले आहेत. यामुळे शेअर बाजारात गेल्या काही दिवसांपासून मोठी घसरण पाहण्यात येत आहे.
कोटक सिक्युरिटीजचे इक्विटी रिसर्च (रिटेल) प्रमुख श्रीकांत चौहान म्हणाले, “FPI's पुढेही अस्थिर राहतील. भू-राजकीय तणाव, वाढती महागाई, मध्यवर्ती बँकांची आर्थिक भूमिका, यामुळे FPIs बाजारपेठेत विक्रेते झाले आहेत. आकडेवारीनुसार, या महिन्यात 17 जूनपर्यंत FPIs ने भारतीय शेअर बाजारातून 31,430 कोटी रुपये काढले आहेत. ऑक्टोबर 2021 पासून FPI विक्री सुरुच आहे."
जिओजित फायनान्शिअल सर्व्हिसेसचे चीफ इन्व्हेस्टमेंट स्ट्रॅटेजिस्ट व्हीके विजयकुमार म्हणाले, “जागतिक गुंतवणूकदार जगभरातील मंदीच्या वाढत्या जोखमीवर प्रतिक्रिया देत आहेत. वाढत्या महागाईच्या पार्श्वभूमीवर फेडरल रिझर्व्हने व्याजदरात 0.75 टक्क्यांनी वाढ केली आहे. अमेरिकेच्या मध्यवर्ती बँकेने पुढे जाऊन कठोर भूमिका घेण्याचे संकेत दिले आहेत."
ते पुढे म्हणाले की, "एफपीआय मुख्यतः मजबूत होत असलेला डॉलर आणि अमेरिकेतील रोखावर वाढत्या उत्पन्नाच्या आधारे विक्री करत आहेत. फेडरल रिझर्व्ह, बँक ऑफ इंग्लंड आणि स्वित्झर्लंडच्या मध्यवर्ती बँकेने व्याजदर वाढवले आहेत. परिणामी, एफपीआय स्टॉकमधून बाँडकडे वळत आहेत.
ट्रेडस्मार्टचे चेअरमन विजय सिंघानिया म्हणाले, “अशा अनिश्चिततेच्या परिस्थितीत जेव्हा बाँड्स भांडवलाची सुरक्षितता आणि चांगला परतावा देतात, तेव्हा गुंतवणूकदार विक्री करतील याची खात्री असते. यूएस मार्केटमध्ये मार्च 2020 नंतरची सर्वात मोठी साप्ताहिक घसरण दिसून आली आहे. देशांतर्गत आघाडीवर महागाई ही चिंतेची बाब असून त्यावर आळा घालण्यासाठी रिझर्व्ह बँक धोरणात्मक दर वाढवत असल्याचे ते म्हणाले."
त्याचवेळी, मॉर्निंगस्टार इंडियाचे सहयोगी संचालक-व्यवस्थापक संशोधन, हिमांशू श्रीवास्तव म्हणतात की, "फेडरल रिझर्व्हने व्याजदरात आक्रमक वाढ केल्यानंतर रिझर्व्ह बँकही पुढील दोन तिमाहीत धोरणात्मक दरांमध्ये वाढ करेल", असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.