LIC चा अदानींच्या कंपन्यांवर भरवसा वाढला, खरेदी केले ७३,४६७ कोटींचे शेअर्स

By ऑनलाइन लोकमत | Published: December 5, 2022 08:41 PM2022-12-05T20:41:46+5:302022-12-05T20:48:59+5:30

भारतीय आयुर्विमा महामंडळाने (LIC) गौतम अदानी यांच्या समूहातील कंपन्यांमध्ये मोठ्या प्रमाणात गुंतवणूक केली आहे.

भारतीय आयुर्विमा महामंडळाने (LIC) गौतम अदानी यांच्या समूहातील कंपन्यांमध्ये मोठ्या प्रमाणात गुंतवणूक केली आहे. अलीकडच्या तिमाहीत LIC ने ज्या तीन समूह कंपन्यांमध्ये भागभांडवल वाढवले ​​आहे ते म्हणजे अदानी एंटरप्रायझेस, अदानी टोटल गॅस आणि अदानी ट्रान्समिशन.

यासह, गेल्या आठवड्याच्या शेवटच्या कामकाजाच्या दिवसापर्यंत, अदानी समूहाच्या एकूण 5 कंपन्यांमध्ये एलआयसीची गुंतवणूक 73,467 कोटी रुपये होती. तथापि, याच काळात विदेशी पोर्टफोलिओ गुंतवणूकदारांनी (FPIs) अदानी समूहातील कंपन्यांमधील हिस्सा कमी केला आहे.

अदानी समूहाच्या ज्या 5 कंपन्यांमध्ये LIC ची हिस्सेदारी आहे त्यामध्ये अदानी एंटरप्रायझेस, अदानी ग्रीन एनर्जी, अदानी पोर्ट्स आणि स्पेशल इकॉनॉमिक झोन (SEZ), अदानी टोटल गॅस आणि अदानी ट्रान्समिशन यांचा समावेश आहे.

PRIME डेटाबेसनुसार, LIC चा एकूण इक्विटी पोर्टफोलिओ 30 सप्टेंबरपर्यंत 10.27 लाख कोटी रुपये होता. अदानी समूहातील एलआयसीचा हिस्सा त्याच्या एकूण इक्विटी पोर्टफोलिओच्या सुमारे 7 टक्के एवढा होता.

30 जून 2021 रोजी अदानी एंटरप्रायझेसमधील LIC चा हिस्सा 1.32 टक्के होता, जो पाच तिमाहींपासून सातत्यानं वाढत आहे. 30 सप्टेंबरपर्यंत हा हिस्सा 4.02 टक्क्यांवर गेला होता. एलआयसीकडे सप्टेंबरपर्यंत अदानी एंटरप्रायझेसचे 4,58,14,945 शेअर्स होते. त्याची किंमत 17,966 कोटी रुपये होती.

30 सप्टेंबरपर्यंत, अदानी टोटलमध्ये एलआयसीचा हिस्सा 5.77 टक्के होता. 2021 च्या मार्च तिमाहीपासून प्रत्येक तिमाहीत त्यात वाढ होत आहे. मार्च तिमाहीत ते 5.11 टक्क्यांपर्यंत वाढले. या कंपनीत एलआयसीची एकूण गुंतवणूक 22,706 कोटी रुपये आहे.

अदानी ट्रान्समिशनच्या बाबतीत, एलआयसीचा हिस्सा 2021 च्या जून तिमाहीत 2.42 टक्क्यांवरून 30 सप्टेंबरपर्यंत 3.46 टक्क्यांपर्यंत वाढला आहे. या स्टेकची किंमत 10,600 कोटी रुपये आहे. अदानी ग्रीनबद्दल बोलायचे झाल्यास, सप्टेंबर तिमाहीत LIC चा यात 1.15 टक्के हिस्सा होता. अदानी ग्रीन एनर्जीमध्ये एलआयसीचा हिस्सा 3,760 कोटी रुपयांचा आहे.

अदानी पोर्ट्सच्या बाबतीत सांगायचे झाले तर LIC चा हिस्सा 2020 च्या सप्टेंबर तिमाहीत 11.9 टक्क्यांवरून 2022 च्या सप्टेंबर तिमाहीत 9.82 टक्क्यांवर आला आहे. LIC यापुढे अदानी पॉवरमध्ये 1 टक्‍क्‍यांहून अधिक स्टेक ठेवणार नाही. कंपनीत मार्च तिमाहीपर्यंत 1.56 टक्के हिस्सा होता.