Success Story : वडिलांच्या व्यवसायात २२ व्या वर्षी एन्ट्री, आता ₹९९३८००००००००० च्या साम्राज्यात केलं रूपांतर

By ऑनलाइन लोकमत | Published: June 25, 2024 09:18 AM2024-06-25T09:18:01+5:302024-06-25T09:42:30+5:30

Metropolis Healthcare: काही निवडक लोक असतात जे अपयशानं खचून न जाता मेहनतीच्या जोरावर यशाला गवसणी घालतात. अशाच एका व्यवसायाचं नेतृत्व करणाऱ्या व्यक्ती म्हणजे अमिरा शाह. त्या एका दिग्गज हेल्थकेअर चेनचं नेतृत्व करत आहेत.

Success Story : हल्ली इंस्टंटच्या जमान्यात तरुण- तरुणींना सर्व काही इंस्टंट पाहिजे असतं. अनेकांमध्ये पेशन्स तर अजिबातच पाहायला मिळत नाही. बिझनेस असो किंवा इतर कोणतंही क्षेत्र असो, ज्याने अपयशाची चव चाखली नाही त्याला यशाचं मोल कधीच समजत नाही. काही निवडक लोक असतात जे अपयशानं खचून न जाता मेहनतीच्या जोरावर यशाला गवसणी घालतात.

असंच एका व्यवसायाचं नेतृत्व म्हणजे अमिरा शाह. अमिरा शाह या एक भारतीय उद्योजक आहेत. मेट्रोपोलिस हेल्थकेअर लिमिटेड नावाच्या प्रसिद्ध पॅथॉलॉजी लॅब चेनचं त्या नेतृत्व करतात.

अमिरा शाह कंपनीच्या प्रवर्तक आणि व्यवस्थापकीय संचालक असून कंपनीचं मार्केट कॅप ९,९३८ कोटी रुपये आहे. मुंबईत या कंपनीची स्थापना करणारे पॅथॉलॉजिस्ट डॉ. सुशील शाह यांच्या त्या कन्या. अमिरा यांनी वयाच्या अवघ्या २२ व्या वर्षी वडिलांचा व्यवसाय सांभाळला आणि आज तो मोठ्या उंचीवरही नेला.

अमिरा शाह यांनी मुंबईच्या एच. आर. कॉलेज ऑफ कॉमर्स अँड इकॉनॉमिक्समधून कॉमर्समध्ये पदवी घेतली. त्यानंतर टेक्सास विद्यापीठातून फायनान्सची पदवी घेण्यासाठी त्या अमेरिकेला गेल्या. अमिरा हार्वर्ड बिझनेस स्कूलच्या (ओपीएम प्रोग्राम) माजी विद्यार्थिनी आहेत. न्यूयॉर्कमधील गोल्डमन सॅक्समधून त्यांनी आपल्या कारकिर्दीची सुरुवात केली.

मात्र, नंतर अमिरा शाह यांनी नोकरी सोडली आणि आपल्या वडिलांच्या व्यवसायात मदत करण्यास सुरुवात केली. २००१ मध्ये वयाच्या २२ व्या वर्षी त्यांनी वडिलांचा व्यवसाय हाती घेतला. या व्यवसायासाठी अथक परिश्रम घेत अमिरा यांनी आज ९,९३८ कोटी रुपयांच्या मार्केट कॅपसह कंपनीचं यशस्वी व्यवसायात रूपांतर केलं.

अमिरा शाह यांच्या नेतृत्वाखाली एप्रिल २०१९ मध्ये मेट्रोपॉलिसची स्टॉक एक्स्चेंजमध्ये यशस्वी पणे लिस्टिंग झालं. त्या एक अॅक्टिव्ह फायनान्शिअल इनव्हेस्टर्स आणि बिझनेस मेंटर आहेत. अमिरा यांनी २०१७ मध्ये महिलांच्या नेतृत्वाखालील व्यवसायांना सल्ला, मार्गदर्शन आणि मायक्रो-फंडिंगसाठी एम्पायर्स या नानफा प्लॅटफॉर्मची स्थापना केली.