तेराव्या वर्षी सेल्समन म्हणून काम, आईकडून १० हजार घेऊन सुरू केला व्यवसाय, उभारला ३३ हजार कोटींचा ब्रँड

By ऑनलाइन लोकमत | Published: November 22, 2024 10:20 AM2024-11-22T10:20:36+5:302024-11-22T10:38:29+5:30

Manyavar Success Story : म्हणतात ना की यश मिळवायचं असेल तर जोखीम घेणं आवश्यक आहे. ज्यांना जोखीम कशी घ्यायची हे माहित आहे आणि मागे हटत नाहीत ते एक दिवस नक्कीच यशाचं शिखर गाठतात.

Manyavar Success Story : म्हणतात ना की यश मिळवायचं असेल तर जोखीम घेणं आवश्यक आहे. ज्यांना जोखीम कशी घ्यायची हे माहित आहे आणि मागे हटत नाहीत ते एक दिवस नक्कीच यशाचं शिखर गाठतात. कोलकात्यात लहानाचे मोठे झालेल्या रवी मोदी यांनी आपल्या मेहनतीने यशाचं शिखर गाठलं आहे.

देशातील सर्वात श्रीमंत व्यक्तींच्या यादीत आज रवी मोदी यांचं नाव समाविष्ट आहे. आज त्यांची संपत्ती २०,००० कोटी रुपयांपेक्षा जास्त आहे. आम्ही बोलत आहोत एथनिक वेअर ब्रँड मान्यवरचे संस्थापक आणि एमडी रवी मोदीयांच्याबद्दल. मोदी यांनी उभा केलेला मान्यवर हा ब्रँड इंडियन वेडिंग मार्केटमधील एक प्रसिद्ध नाव आहे.

कोणतंही मोठं भांडवल न गुंतवता मोदी यांनी आपलं काम सुरू केलंय. वडिलांशी वाद झाल्यानंतर आईकडून मिळालेल्या दहा हजार रुपयांतून त्यांनी आपला व्यवसाय सुरू केला. आज आपल्या मेहनतीच्या जोरावर ते कोट्यवधींच्या संपत्तीचे मालक बनले आहेत.

कोलकात्याच्या एका सामान्य कुटुंबात जन्मलेले रवी मोदी यांना लहानपणापासूनच अभ्यासाची आवड होती. आई-वडिलांचा एकुलता एक मुलगा असलेले रवी मोदी गणित या विषयात अत्यंत हुशार होते. त्याचे वडील कोलकात्यातील एका मार्केटमध्ये रिटेल स्टोअर चालवायचे, जिथे मोदी वडिलांना अभ्यासादरम्यान मदत करायचे.

रवी मोदी दुसरीत असताना त्यांनी गणितात १०० पैकी १०० गुण मिळवले होते. त्यानंतर त्यांच्या आईनं त्यांच्यासाठी एक पार्टी आयोजित केली होती. पण त्यानंतर १०० गुण मिळवून परत आल्यावर घरातील वातावरण सामान्य होते. त्यानंतर त्याला समजले एकसारखं यश मिळालं तर कोणीही ते साजरं करत नाही. त्यामुळे त्यांनी काहीतरी वेगळं करण्याचा निर्णय घेतला.

रवी मोदी यांच्या वडिलांचं कोलकात्यात कपड्यांचं छोटंसं दुकान होतं. रवी मोदीही लहानपणापासून वडिलांना मदत करत असत. वयाच्या तेराव्या वर्षापासून ते दररोज दुकानात येऊ लागले. रवी मोदी स्वत:च्या दुकानात सेल्समन म्हणून काम करत होते. नऊ वर्षे दुकानात काम करताना त्यांनी विक्रीतले बारकावे शिकून घेतले. या दरम्यान त्यांनी कोलकात्याच्या सेंट झेवियर्स कॉलेजमधून बीकॉम केलं.

एके दिवशी वडिलांशी वाद झाल्यानंतर रवी यांनी आईकडून दहा हजार रुपये घेऊन कपड्याचा व्यवसाय सुरू केला. त्यांनी त्याचा एकुलता एक मुलगा वेदांत याच्या नावावरून त्याचं नाव ठेवलं. त्यांनी भारतीय एथनिक कपडे बनविण्यास सुरुवात केली आणि कोलकात्याहून पश्चिम बंगालच्या इतर शहरांमध्ये तसंच उत्तर प्रदेश, ओडिशा, बिहार आणि मध्य प्रदेशमध्ये त्यांची विक्री केली.

उत्तम दर्जा आणि डिझाईनमुळे त्यांनी बनवलेले कपडे लोकांना आवडले. त्यानंतर मोदींनी त्यांच्या कपड्यांना 'मान्यवर' हे नाव दिलं. बाजाराबरोबरच विशाल मेगा मार्ट, पॅन्टॅलून सारख्या बड्या दुकानांनाही त्यांनी टार्गेट केलं. रवी मोदी यांनी ओडिशाची राजधानी भुवनेश्वर मध्ये वेदांत फॅशनचं पहिलं स्टोअर उघडले. आज देशभरात त्यांची ६०० हून अधिक स्टोअर्स आहेत. आज त्यांच्या या ब्रँडचं मूल्य ३३ हजार कोटी रुपयांहून अधिक आहे.