Cloud Kitchen Business: यशोगाथा! फक्त ८० रुपयांच्या गुंतवणुकीवर आज दर महिना १ लाखांची कमाई करतेय महिला By ऑनलाइन लोकमत | Published: July 24, 2024 09:57 AM 2024-07-24T09:57:22+5:30 2024-07-24T10:04:24+5:30
हैदराबादमध्ये टेक्सटाइल इंजिनिअर नाज अंजुमनं घरातून क्लाऊड किचन व्यवसाय सुरू केला आणि आज लाखोनं कमाई करते. लग्नानंतर २०१० मध्ये हैदराबादला आल्यानंतर नाज अंजुमनं स्वत:चं उद्योग सुरू करण्याचा विचार केला. तिच्याकडे उत्तम जेवण बनवण्याचं कौशल्य होतं.
नाज यांनी बनवलेलं जेवण शेजारी, त्यांच्या बिल्डिंगमधील बॅचलर्स यांना खूप आवडायचं. सर्वांनी त्यांच्या जेवणाचं कौतुक केले आणि त्यांना व्यवसाय उभा करण्याची प्रेरणा दिली. त्यानंतर नाज अंजुम यांनी त्यादिशेने पाऊलं टाकण्यात सुरुवात केली.
ज्या कामाची सुरुवात अंजुम यांनी ८० रुपयांत केली होती. आज त्याच कामामुळे त्या महिन्याला १ लाख कमाई करतात. नाज अंजुम यांनी हे यश मिळवलं कसं, त्यांचा संघर्षमय प्रवास कसा घडला याबाबत आपण जाणून घेऊया.
सुरुवातीला नाज अंजुम यांच्या राहत्या बिल्डिंगमधील बॅचलर्स रोज संध्याकाळी त्यांच्याकडून भाजी खरेदी करायचे. हळूहळू त्यांची मागणी वाढत गेली. आता अंजुम यांच्याकडूनच ते रोज टिफिन घ्यायचे. बॅचलर्स आणि शेजाऱ्यांकडून प्रोत्साहित होऊन नाज यांनी २०१६ साली घरातूनच अंजुम किचन उद्योगाला सुरुवात केली.
अंजुम किचनची सुरुवात केवळ ८० रुपयांना झाली होती. ८० रुपयांची गुंतवणूक आणि बिर्यानीसाठी फेमस अंजुम यांनी क्लाऊड किचनच्या व्यवसायात पाय रोवले. २०१६ मध्ये रमझानच्या काळात शेजाऱ्यांनी नाज यांना मिठाई, लौकी हलवासारखे पदार्थ बनवण्याची ऑर्डर दिली. जी शेजाऱ्यांना खूप पसंत पडली.
त्यानंतर HITEC सिटीमध्ये एका छोट्या पार्टीची त्यांना पहिली ऑर्डर मिळाली. ही ऑर्डर होती मटण दम बिर्यानी, ही बिर्याणी इतकी लोकप्रिय झाली की पाहता पाहता या दम बिर्याणीच्या अनेक ऑडर्स अंजुम किचनला मिळू लागल्या.
अंजुम किचन काही काळातच हैदराबादमधील पहिलं महिला क्लाऊड किचन बनलं. या क्षेत्रात अन्य लोकांसाठीही मार्ग खुले झाले. मटण दम बिर्याणीची चव लोकांच्या जीभेवर रेंगाळली. त्यामुळे सोशल मीडियाच्या माध्यमातून हा उद्योग वाढतच गेला.
नाज अंजुमनं आपल्या मेन्यूमध्ये डेली टिफिन, बिर्याणी, पार्टी ऑर्डर आणि मिठाई यांचा समावेश केला. त्यांच्या जेवणाला अनेकांची पसंती पडली. लोकांकडून होणाऱ्या कौतुकामुळे दिवसेंदिवस त्यांनी बनवलेल्या पदार्थांची प्रसिद्धी होत राहिली.
आज अंजुम किचन एक यशस्वी क्लाऊड किचन आहे. त्यांना दिवसाला २५-३० ऑर्डर मिळतात. नाज अंजुम या दर महिन्याला जवळपास १ लाख कमाई करतात. कोरोना महामारीतही त्यांच्याकडे ५०० हून अधिक ऑर्डर येत होत्या. हैदराबादेत लोकांना घरच्या जेवणाची चव देणाऱ्या अंजुम किचननं अल्पावधीतच नावारुपाला आलं.
नाज अंजुम एक टेक्सटाईल इंजिनिअर असूनही यशस्वी उद्योजिका बनल्या आहेत. मेहनत आणि जिद्द याच्या बळावर स्वप्न पूर्ण करण्यासाठी धडपड केली तर यशाचा मार्ग नक्कीच सापडतो. नाज यांची कहाणी त्या महिलांसाठी प्रेरणादायी आहे ज्या आज आत्मनिर्भरपणे स्वत:चा उद्योग सुरु करण्याचा विचार करत आहेत.