१० मिनिटांची जबरदस्त आयडिया, ₹११५०० कोटींची कमाई; १९ वर्षांच्या दोन मुलांनी केली कमाल

By ऑनलाइन लोकमत | Published: August 28, 2023 09:49 AM2023-08-28T09:49:54+5:302023-08-28T10:00:02+5:30

कोरोना काळात लोकांना सेवा देण्यासाठी सुरू झालेली ही कंपनी आज देशातील ११ वी युनिकॉर्न ठरलीये...

व्यवसाय चालवणं हा मुलांचा खेळ नाही. त्यासाठी काय काय करावं लागतं हे तुम्हाला काय माहित? असं काही वेळा तुम्ही लोकांच्या तोंडून ऐकलं असेल. १९ व्या वर्षी मुलं आपलं कॉलेज लाईफ एन्जॉय करतात. पण कैवल्य वोहरा आणि त्याचा मित्र आदित पलिचा यांनी मात्र याच वयात आपली कंपनी सुरू केली.

कोरोनाच्या काळात जेव्हा लोकांना व्यवसाय चालवणं कठीण झालं होतं, त्या वेळी या दोन बालपणीच्या मित्रांनी आपली कंपनी सुरू केली. सुरुवात तर केलीच पण दोन वर्षात त्या कंपनीला युनिकॉर्नही बनवलं. आज आम्ही तुम्हाला सांगत आहोत झेप्टो (Zepto) बद्दल. ही कंपनी जे तुम्हाला ग्रोसरीपासून स्टेशनरीपर्यंत १० मिनिटांत सामान तुमच्या घरी डिलिव्हर करते.

अलीकडेच देशाला १११ वं युनिकॉर्न स्टार्टअप मिळालेय. ऑनलाइन ग्रोसरी डिलिव्हरी स्टार्टअप झेप्टो हे २०२३ मधील पहिले युनिकॉर्न स्टार्टअप बनलं आहे. युनिकॉर्न म्हणजे, स्टार्टअप किंवा कंपनी ज्याचं मूल्यांकन १०० मिलियन डॉलर्स किंवा १ बिलियन डॉलर्सपेक्षा अधिक झालं आहे.

अवघ्या दोन वर्षांत झेप्टो ही युनिकॉर्न कंपनी बनली आहे. झेप्टोचं मूल्यांकन १४० मिलियन डॉलर्स म्हणजेच सुमारे ११५०० कोटी रुपयांवर पोहोचले आहे. कोट्यवधींच्या कंपनीच्या मागे या दोन मित्रांची मेहनत आहे.

कैवल्य वोहरा हा मुंबईचा रहिवासी आहे. कैवल्यनं सुरुवातीचं शिक्षण मुंबईत झालं. कम्प्युटर इंजिनिअरिंगचं शिक्षण पूर्ण करण्यासाठी तो अमेरिकेतील स्टॅनफोर्ड विद्यापीठात गेला, परंतु अभ्यासापेक्षा त्याला स्टार्टअप्समध्ये अधिक रस होता. कैवल्यने वयाच्या १७ व्या वर्षी त्याचा मित्र आदित पलिचासोबत पहिला स्टार्टअप सुरू केलं. त्यांनी आपल्या स्टार्टअपचे नाव GoPool ठेवलं. शिक्षणासोबतच कंपनी चालवणं अवघड होत होतं, त्यामुळे तो शिक्षण सोडून मुंबईला परत आला.

झेप्टो सुरू करण्याची कल्पनाही या दोघांना कॉलेजमध्ये असतानाच आली. जेव्हा तो कोणतेही सामान मागवायचा तेव्हा ते घरापर्यंत पोहोचायला किमान दोन दिवस लागायचे. यामुळे त्याला काही तासांतच लोकांपर्यंत सामान पोहोचवणारी एक कंपनी सुरू करण्याची कल्पना सुचली.

त्यामुळे त्यानं २०२१ मध्ये कोरोना महासाथीच्या काळात झेप्टोची सुरुवात केली. कंपनीची सुरुवात मुंबईतील १००० कर्मचारी आणि डिलिव्हरी एजंट्ससह करण्यात आली होती. यांच्या प्रवासाबद्दल सांगायचं झालं तर, सुरुवातीला दोघांनी किराणाकार्ट या ग्रॉसरी डिलिव्हरी प्लॅटफॉर्मची सुरूवात केली. ते ४५ मिनिटांत किराणा सामान पोहोचवत होते. पिक-अप पॉईंटच्या जवळ राहणाऱ्या ग्राहकांना १५ मिनिटांत डिलिव्हरी दिली जात होती. या प्लॅटफॉर्मवर हे ग्राहक पुन्हा पुन्हा येऊ लागले. यानंतर त्यांच्या मनात विचार आला की १० मिनिटांत वस्तू का देता येत नाहीत?

जबाबदारी सांभाळली तर आणि कैवल्य वोहरा यानं मुख्य चीफ टेक्नॉलॉजी ऑफिसरची जबाबदारी हाती घेतली. दोघांनी अनेक गुंतवणूकदारांकडून पैसा उभा केला. आपल्याला मोठे अपार्टमेंट, उत्तम दर्जाची आणि जलद वितरण सेवा हवी आहे याची जाणीव त्यांना संशोधनातून झाली. त्यांनी डार्क स्टोअर नावाच्या मायक्रो डिस्ट्रिब्युशन नेटवर्क सेंटरद्वारे त्यांची सेवा सुरू केली. ग्राहकांना शक्य तितक्या लवकर माल पोहोचवला जावा, हा त्याचा उद्देश होता. त्यासाठी सरासरी अंतर दोन किलोमीटरच्या आत ठेवण्यात आले होते.

"सुरुवातीला काही लोकांनी आम्हाला गांभीर्याने घेतले नाही. आम्ही तरुण होतो, कल्पना धाडसी होती आणि आम्ही आमच्या वयाच्या दुप्पट असलेल्या गुंतवणूकदारांशी बोलत होतो. आमच्यासाठी आणि गुंतवणूकदारांसाठीही हा एक मजेदार अनुभव होता,” असं आदितनं सांगितलं. आमचा योगायोग चांगला होता की आम्हाला काही चांगले गुंतवणूकदार मिळाले. आमची कल्पना जाणून घेतल्यानंतर त्यांनी आमच्यावर विश्वास दाखवला, असंही त्यानं म्हटलं.

सध्या झेप्टो भारतातील प्रमुख शहरांमध्ये कार्यरत आहे. कंपनी सतत आपलं नेटवर्क वाढवत आहे. कंपनीत १ हून अधिक कर्मचारी कार्यरत आहेत. कंपनी आपल्या प्लॅटफॉर्मवर ३००० हून अधिक प्रोडक्ट्स डिलिव्हर करत आहे. त्‍याच्‍या जलद डिलिव्हरी सेवेमुळे, कंपनी केवळ बाजारात स्थिर नाही तर सतत नफा कमवत आहे. कंपनी आता त्याचा विस्तार छोट्या शहरांमध्ये करण्याच्या दिशेने काम करत आहे.