Bharat Desai Syntel : रतन टाटांच्या कंपनीत करायचे नोकरी, एका खोलीतून सुरू केला बिझनेस; आज आहेत १३,५०० कोटींचे मालक

By ऑनलाइन लोकमत | Published: November 18, 2024 08:49 AM2024-11-18T08:49:24+5:302024-11-18T09:07:17+5:30

Success Story Bharat Desai : भरत देसाई हे उद्योग जगतातील एक नावाजलेलं नाव आहे. त्यांची गणना जगातील सर्वात मोठ्या श्रीमंत लोकांमध्ये केली जाते.

Success Story Bharat Desai : भरत देसाई हे उद्योग जगतातील एक नावाजलेलं नाव आहे. त्यांची गणना जगातील सर्वात मोठ्या श्रीमंत लोकांमध्ये केली जाते. आयआयटी मुंबईतून इलेक्ट्रिकल इंजिनीअरिंगची पदवी घेतलेले देसाई १९७६ मध्ये रतन टाटा यांच्या टीसीएस कंपनीत काम करत असताना अमेरिकेत स्थायिक झाले.

पण, त्याची कहाणी इथेच संपत नाही. त्यांनी पत्नी नीरजा सेठी यांच्यासोबत मिळून १९८० मध्ये केवळ २,००० डॉलर्स (दीड लाख रुपये) गुंतवणुकीतून आयटी कन्सल्टिंग आणि आऊटसोर्सिंग कंपनी सिंटेल सुरू केली. त्यांचा हा प्रवास सोपा नव्हता.

मिशिगनमधील एका खोलीच्या फ्लॅटमधून त्यांनी आपली कंपनी सुरू केली. त्यांची मेहनत आणि समर्पण फळाला आलं. आज त्यांच्याकडे १.६ अब्ज डॉलर्स (सुमारे १३,५०१ कोटी रुपये) संपत्ती आहे. भरत देसाई यांच्या आजवरच्या प्रवासाविषयी जाणून घेऊया.

भरत देसाई यांचा जन्म नोव्हेंबर १९५२ मध्ये केन्यात झाला. त्यांचे बालपण भारतात गेलं. त्यांनी आयआयटी मुंबईमधून इलेक्ट्रिकल इंजिनीअरिंगची पदवी मिळवली. देसाई यांनी स्टीफन एम रॉस स्कूल ऑफ बिझनेसमधून फायनान्समध्ये एमबीए केलं आहे. १९७६ मध्ये देसाई टीसीएसमध्ये प्रोग्रामर म्हणून रुजू झाले आणि अमेरिकेत गेले. टीसीएसमध्ये काम करत असताना त्यांची भेट नीरजा सेठी यांच्याशी झाली.

मिशिगनमधील एका अपार्टमेंटमध्ये हे दाम्पत्य राहत होते. तेव्हाच त्यांनी स्वत:ची कंपनी सुरू करण्याचा निर्णय घेतला. देसाई यांनी पत्नी नीरजा सेठी यांच्यासोबत १९८० मध्ये आपली आयटी कन्सल्टिंग आणि आऊटसोर्सिंग कंपनी सिंटेल सुरू केली. पहिल्या वर्षी सिंटेलनं ३०,००० डॉलर्सची कमाई केली. २०१८ पर्यंत कंपनीचा महसूल ९० कोटी डॉलर्सपर्यंत वाढला. याकडे फ्रेन्च आयटी कंपनी Atos SE चंही लक्ष वेधलं गेलं.

एटोस एसईनं सिंटेलला ३.४ अब्ज डॉलर (सुमारे २८,००० कोटी रुपये) रोखीनं विकत घेतलं. मात्र, नंतर देसाई यांच्यावर एटीओएसनं खटला दाखल केला. विलीनीकरणापूर्वी त्यांनी देणी लपवल्याचा आरोप कंपनीनं केला. २०२३ मध्ये हा खटला फेटाळण्यात आला. देसाई सध्या फ्लोरिडाच्या फिशर आयलंडमध्ये कुटुंबासह राहतात. ते अनेक सामाजिक कार्यांमध्येही सक्रिय आहेत. देसाई डेट्रॉइटच्या 'पेंट द टाऊन' उपक्रमात सहभागी आहेत.

भरत देसाई यांना १९९६ मध्ये यूएसए टुडे आणि नॅसडॅकतर्फे 'आंत्रप्रेन्योर ऑफ द इयर' पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं होतं. फोर्ब्सनंही सिंटेलला 'अमेरिकेतील सर्वोत्कृष्ट २०० छोट्या कंपन्यांपैकी एक' म्हणून मान्यता दिली आहे. यशस्वी व्यवसाय सुरू करण्याचं स्वप्न पाहणाऱ्यांसाठी देसाई यांची कहाणी प्रेरणादायी आहे. मोठ्या पगाराची नोकरी सोडून त्यांनी स्वत:च्या बळावर एक कंपनी उभी केली, जी आज जगातील नामांकित कंपन्यांपैकी एक आहे. प्रबळ इच्छाशक्ती आणि कष्ट करण्याची तळमळ असेल तर काहीही अशक्य नाही, हे देसाई यांनी सिद्ध केलंय.