Success Story : दिव्याच्या प्रकाशात केला अभ्यास, शाळेसाठी ८ किमी पायी प्रवास; आज आहेत ७०००० कोटींचे मालक

By ऑनलाइन लोकमत | Published: September 6, 2023 09:54 AM2023-09-06T09:54:22+5:302023-09-06T10:11:34+5:30

छोट्याशा गावातून सुरू झालेला जय चौधरी यांचा प्रवास आज अमेरिकेपर्यंत पोहोचलाय.

मनात जिद्द आणि मेहनत करण्याची तयारी असेल तर कोणतीही गोष्ट करणं अशक्य नाही. आजपर्यंत अशा अनेक लोकांची यशोगाथा तुम्ही ऐकली असेल ज्यांनी आपल्या मेहनतीच्या जोरावर यशाचं शिखर गाठलं. अशीच एक व्यक्ती म्हणजे जय चौधरी. त्यांनी अगदी शून्यातून आपलं मोठं साम्राज्या उभं केलंय.

जय चौधरी हे हिमाचलमधील एक छोट्या गावातून बाहेर पडले आणि त्यांनी दिल्ली गाठली. नंतर आपली प्रतिभा सिद्ध करण्यासाठी ते अमेरिकेला गेले. आज जय चौधरी यांची अमेरिका आणि भारतातील अब्जाधीशांमध्ये गणना होते.

मूळचे हिमाचल प्रदेशातील असलेले जय चौधरी आज अमेरिकेतील टॉप टेक कंपन्यांच्या सीईओंच्या यादीत सामील आहेत. ते Zscaler या सुप्रसिद्ध क्लाउड सिक्युरिटी कंपनीचे मालक आहेत. जय चौधरी यांची यशोगाथा देशातील आणि जगातील लाखो तरुण उद्योजकांना प्रेरणा देणारी आहे.

Zscaler चे सीईओ जय चौधरी यांचा जन्म हिमाचल प्रदेशातील उना जिल्ह्यातील एका छोट्या गावात झाला. त्यांना त्यांच्या बालणी वीज आणि पाण्यासारख्या मूलभूत सुविधांसाठीही संघर्ष करावा लागला होता. एवढंच नाही तर जय चौधरी यांना शाळेत जाण्यासाठी रोज ८ किलोमीटर पायी प्रवास करावा लागायचा. पण, शिक्षणाप्रती असलेल्या समर्पणासमोर त्यांनी हे अंतरही पार केलं.

६० वर्षांपूर्वी त्यांच्या पानोह गावात वीज पोहोचली नसल्यानं ते रात्री दिव्याखाली अभ्यास करायचे. ते नेहमी मोकळ्या वेळेत अभ्यासाशी संबंधित प्रश्न घेऊन शिक्षकांकडे जात असत. याच कारणामुळे ते सातत्यानं टॉपर्सच्या लिस्टमध्ये असत. आज जय चौधरी यांचं नाव अब्जाधीशांच्या यादीत समाविष्ट झालंय.

जय चौधरी यांनी देशातील प्रतिष्ठित अभियांत्रिकी संस्था आयआयटी बीएचयूमधून कम्प्युटर इंजिनिअरिंगची पदवी प्राप्त केली. देशात शिक्षण पूर्ण केल्यानंतर, जय चौधरी हे अमेरिकेला गेले. त्या ठिकाणी त्यांनी सिनसिनाटी विद्यापीठातून एमबीए केलं.

शिक्षण पूर्ण केल्यानंतर जय चौधरी यांनी आयबीएम आणि युनिसिस सारख्या मोठ्या कंपन्यांमधून करिअरला सुरुवात केली. १९९६ मध्ये, जय चौधरी आणि त्यांच्या पत्नीनं नोकरी सोडली आणि SecureIT कंपनी सुरू केली. यानंतर त्यांनी मिळून एअर डिफेन्स आणि कोअर हार्बर कंपनीची स्थापना केली. मात्र, या सर्व कंपन्यांचं अधिग्रहण करण्यात आलं.

यानंतर, २००७ मध्ये, त्यांनी Zscaler ही सायबर सिक्युरिटी फर्म स्थापन केली. जगातील आघाडीच्या कंपन्यांना त्यांची कंपनी सेवा पुरवते. २०१८ मध्ये, Zscaler चा आयपीओ आला आणि त्यांची कंपनी अमेरिकेचा आयटी इंडेक्स Nasdaq मध्ये लिस्ट झाली. जगभरातील ४०० कंपन्या त्यांची सेवा घेतात.

फोर्ब्सनुसार, त्यांची एकूण संपत्ती ७०,३९२ कोटी रुपये आहे. जय चौधरी यांचं नाव २०२० मध्ये फोर्ब्स ४०० लिस्ट ऑफ रिचेस्ट पिपल इन अमेरिकामध्येही आलं होतं. यामध्ये ते ८५ व्या क्रमांकावर होते.