Richest Indian in Canada : कोण आहेत कॅनडातील सर्वात श्रीमंत भारतीय, ज्यांना जगही म्हणतं कॅनडियन वॉरन बफे; पद्मश्रीनंही झालाय सन्मान By ऑनलाइन लोकमत | Published: November 14, 2024 08:54 AM 2024-11-14T08:54:03+5:30 2024-11-14T09:06:02+5:30
Richest Indian in Canada : तुम्हाला माहितीये का कॅनडातील सर्वात श्रीमंत व्यक्ती कोण आहेत. त्यांनी निष्ठा, व्यावसायिक कौशल्य आणि भक्कम शैक्षणिक पार्श्वभूमी यामुळे जगात स्वत:चं वेगळं स्थान निर्माण केलं आहे. आज असा कोणाताही देश नसेल जिकडे भारतीयांनी आपलं नाव मोठं केलं नसेल. गेल्या काही दिवसांपासू कॅनडाच्या नावाची चर्चा सुरुये. तुम्हाला माहितीये का कॅनडातील सर्वात श्रीमंत व्यक्ती कोण आहेत. त्यांनी निष्ठा, व्यावसायिक कौशल्य आणि भक्कम शैक्षणिक पार्श्वभूमी यामुळे जगात स्वत:चं वेगळं स्थान निर्माण केलं आहे.
आम्ही तुम्हाला सांगत आहोत प्रेम वत्स यांच्याबद्दल. प्रेम वत्स हे कॅनडातील सर्वात श्रीमंत भारतीय व्यक्ती आहेत. ते टोरंटोस्थित कंपनी फेअरफॅक्स फायनान्शियल होल्डिंग्सचे अध्यक्ष आणि मुख्य कार्यकारी अधिकारी आहेत. ९७ अब्ज डॉलर्सची ही कंपनी उत्तर अमेरिका, लॅटिन अमेरिका, युरोप, आशिया आणि मध्य पूर्वेत पसरली आहे.
वत्स यांना कॅनडाचे वॉरेन बफे म्हणूनही संबोधलं जातं. जानेवारी २०२० मध्ये त्यांना पद्मश्री हा भारताचा चौथा सर्वोच्च नागरी पुरस्कार प्रदान करण्यात आला. प्रेम वत्स कॅनडातील सर्वात श्रीमंत भारतीय बनण्याच्या प्रवासावर एक नजर टाकूया.
वत्स यांचा जन्म ५ ऑगस्ट १९५० रोजी हैदराबादमधील एका मध्यमवर्गीय कुटुंबात झाला. १९७१ मध्ये त्यांनी प्रतिष्ठित इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी मद्रास (आयआयटी मद्रास) येथून केमिकल इंजिनीअरिंगची पदवी घेतली. त्यानंतर व्यापक संधीच्या शोधात ते कॅनडाला गेले.
तेथे त्यांनी वेस्टर्न ओंटारियो विद्यापीठातून बिझनेस अॅडमिनिस्ट्रेशनमध्ये पदव्युत्तर पदवी मिळवली. या शिक्षणामुळे त्यांना करिअर सुरू करण्यास मदत झाली. यानंतर ते कॅनडाच्या आर्थिक क्षेत्रातील अग्रगण्य व्यक्तिमत्त्वांपैकी एक बनले.
१९७४ मध्ये कॉन्फेडरेशन लाइफ इन्शुरन्स कंपनीत वत्स यांच्या फायनान्स क्षेत्रातील कारकिर्दीला सुरुवात झाली. तेथे त्यांनी स्टॉक पोर्टफोलिओ सांभाळले आणि गुंतवणुकीवर संशोधन केलं. या ठिकाणी त्यांनी वित्त व विमा उद्योगातील बारकावे शिकून घेतले.
या कंपनीत काही वर्षे काम केल्यानंतर त्यांनी गुंतवणूक व्यवस्थापनावर लक्ष केंद्रित करत हॅम्बलिन वॉट्स इन्व्हेस्टमेंट कौन्सिल लिमिटेडची स्थापना केली. १९८५ मध्ये त्यांनी टोरंटोस्थित फायनान्शियल सर्व्हिसेस कंपनी फेअरफॅक्स फायनान्शिअल होल्डिंग्सचं नियंत्रण मिळवले. हा त्यांचा प्राथमिक व्यवसाय ठरला.
वत्स यांच्या नेतृत्वाखाली फेअरफॅक्सने उत्तमोत्तम प्रगतीकेली. या काळात कंपनीची मालमत्ता ३१ अब्ज डॉलरवर पोहोचली आणि गुंतवणूकदारांना वार्षिक सुमारे २० टक्के परतावा मिळत राहिला. टोरंटो स्टॉक एक्स्चेंजमध्ये लिस्टेड फेअरफॅक्स फायनान्शियल होल्डिंग्स ही कॅनडामधील वित्तीय सेवा क्षेत्रातील एक प्रमुख कंपनी आहे. वत्स यांची गुंतवणुकीची शैली आणि रणनीती बफे यांच्यासारखीच आहे. म्हणूनच त्यांना कॅनडाचे वॉरेन बफे म्हटलं जातं.
वत्स यांची नेटवर्थ सुमारे २.१ अब्ज डॉलर (सुमारे १७,४३० कोटी रुपये) असून ते कॅनडातील सर्वात श्रीमंत भारतीय आहेत. नेटवर्थच्या बाबतीत प्रेम वत्स मुकेश अंबानी आणि गौतम अदानी यांच्या जवळही नाहीत. पण, त्याची यशोगाथा खूप प्रेरणादायी आहे.
केवळ कॅनडातच नव्हे, तर भारतातही त्यांचा आदर केला जातो. भारत सरकारनं त्यांना पद्मश्री पुरस्कारानं सन्मानित केलं आहे. त्यांनी भारतात सुमारे ७ अब्ज डॉलर्सची गुंतवणूक केली असून येत्या ४-५ वर्षांत ती दुप्पट करण्याची त्यांची योजना आहे.