सुकन्या समृद्धी, पीपीएफ, किसान विकास पत्र; कोणत्या योजनेवर किती व्याज, काय आहे नवी अपडेट?

By ऑनलाइन लोकमत | Published: March 9, 2024 08:47 AM2024-03-09T08:47:43+5:302024-03-09T09:05:01+5:30

सुकन्या समृद्धी योजना, सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी आणि किसान विकास पत्र यासह विविध अल्प बचत योजनांबाबत एक महत्त्वाची अपडेट समोर आली आहे.

सुकन्या समृद्धी योजना, सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी (PPF) आणि किसान विकास पत्र यासह विविध अल्प बचत योजनांबाबत एक महत्त्वाची अपडेट समोर आली आहे. १ एप्रिल २०२४ पासून सुरू होणाऱ्या पुढील आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीमध्ये मिळणाऱ्या व्याजाबाबत ही माहिती समोर आलीये.

सरकारने या अल्प बचत योजनांच्या व्याजदरांमध्ये कोणताही बदल केलेला नाही. म्हणजे त्यांचे व्याजदर 'जैसे थे'च राहणार आहेत. या निर्णयानंतर PPF वर पूर्वीप्रमाणेच ७.१ टक्के व्याज मिळत राहील. यासंदर्भात अर्थ मंत्रालयाने शुक्रवारी अधिसूचना जारी केली.

'विविध अल्प बचत योजनांवरील व्याजदर २०२४-२५ या आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीसाठी (एप्रिल-जून) चौथ्या तिमाहीसाठी (जानेवारी-मार्च, २०२४) अधिसूचित दरांप्रमाणेच असतील,' असं यात नमूद करण्यात आलंय. म्हणजेच यात कोणताही बदल होणार नाही.

सुकन्या समृद्धी योजनेत सध्या सर्वाधिक व्याज मिळत आहे. सुकन्या समृद्धी योजनेंतर्गत जमा केलेल्या रकमेवर ८.२ टक्के व्याज मिळेल. त्याच वेळी, पोस्ट ऑफिसच्या तीन वर्षांच्या मुदत ठेवींवरील व्याज ७.१ टक्के असेल. सुकन्या समृद्धी (SSY) ही सरकारची अल्प बचत योजना आहे. मुलींच्या भविष्याच्या दृष्टीनं सरकारनं ही योजना सुरू केली आहे. ही योजना १० वर्षांखालील मुलींसाठी उपलब्ध आहे. योजनेअंतर्गत, तुम्ही वार्षिक किमान २५० रुपये आणि जास्तीत जास्त १.५ लाख रुपये जमा करू शकता.

पीपीएफवरील व्याजदर ७.१ टक्के आणि पोस्ट ऑफिस सेव्हिंग डिपॉझिटवर ४ टक्के व्याजदर कायम ठेवण्यात आले आहेत. सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी लोकांना दीर्घकालीन आर्थिक उद्दिष्टांसाठी बचत करण्यात मदत करते. करबचतीसाठीही ही योजना फायदेशीर आहे.

किसान विकास पत्रावरील व्याजदर ७.५ टक्के असेल. ही गुंतवणूक ११५ महिन्यांत मॅच्युअर होईल. तुम्ही किसान विकास पत्रामध्ये किमान १००० रुपयांपासून सुरुवात करू शकता. कमाल ठेवीवर कोणतीही मर्यादा नाही. किसान विकास पत्र योजनेअंतर्गत ठेवी आणि व्याज करमुक्त आहेत.

राष्ट्रीय बचत प्रमाणपत्र (NSC) वर १ एप्रिल ते ३० जून २०२४ या कालावधीसाठी ७.७ टक्के व्याजदर असेल. एनएसई दीर्घकालीन आर्थिक उद्दिष्टांसाठी बचत करण्यात मदत करते. ही योजना करबचतीचाही लाभ देते. तुम्ही एनएसईमध्ये किमान १०० रुपयांपासून गुंतवणूक सुरू करू शकता.

मंथली इन्कम स्कीममध्ये (MIS) व्याजदर चालू तिमाहीप्रमाणे ७.४ टक्केच असेल. हे लोकांना दरमहा निश्चित उत्पन्न प्रदान करते. नियमित उत्पन्नाच्या शोधात असतात अशा लोकांसाठी ही योजना उत्तम आहे. यामध्ये पेन्शनधारकांचा समावेश आहे.