Survey on Digital Currency: क्रिप्टोकरन्सीबाबत भारतीयांना काय वाटते? किती विश्वास? सर्व्हेमध्ये धक्कादायक खुलासा By ऑनलाइन लोकमत | Published: November 25, 2021 04:12 PM 2021-11-25T16:12:12+5:30 2021-11-25T16:17:35+5:30
Indians mood on cryptocurrency: केंद्र सरकार बैठकांवर बैठका घेत आहे. अशावेळी क्रिप्टोकरन्सी (Cryptocurrency) बाबत देशवासियांना काय वाटते याची माहिती गोळा करण्यात आली आहे. क्रिप्टोकरन्सी (Cryptocurrency) ची सध्या देशभरात मोठी चर्चा आहे. केंद्र सरकार क्रिप्टोकरन्सीला मान्यता देणार की नाही ते भारत स्वत:ची क्रिप्टोकरन्सी काढणार का आदीपर्यंत ठोकताळे जोरावर आहेत. सरकार या विषयावर गंभीर असताना लोकल सर्कल (LocalCircles) चा एक सर्व्हे समोर आला आहे.
केंद्र सरकार बैठकांवर बैठका घेत आहे. अशावेळी क्रिप्टोकरन्सी (Cryptocurrency) बाबत देशवासियांना काय वाटते याची माहिती या संस्थेने गोळा केली आहे.
सर्व्हेमध्ये धक्कादायक माहिती समोर आली आहे. यामध्ये प्रत्येक दुसरा भारतीय क्रिप्टोकरन्सीच्या बाजुने नाहीय. म्हणजेच निम्म्या लोकसंख्येच्या मनात देशात डिजिटल करन्सीला वैध बनविण्यात यावे असे वाटत आहे. तर 76 टक्के लोकांना वाटतेय की जोवर नियम बनविले जात नाहीत तोवर देशात क्रिप्टोकरन्सीवर बंदी असावी.
सध्या 71 टक्के भारतीयांना आंतरराष्ट्रीय क्रिप्टोकरन्सीवर अजिबात विश्वास नाहीय. तर 51 टक्के लोकांना वाटतेय की भारत सरकारने आपल्या डिजिटल करन्सीला लाँच करावे. 54 टक्के लोकांना वाटतेय की क्रिप्टोकरन्सीला वैध घोषित करू नये.
तसेच त्यावर आकारला जाणारा कर हा परदेशी डिजिटल संपत्तीवर जसा आकारला जातो तसा आकारावा. 26 टक्के लोकच क्रिप्टोकरन्सीच्या बाजुने आहेत. त्यांच्या म्हणण्यानुसार सरकारने क्रिप्टोकरन्सीला मान्यता द्यावी व त्यानंतर कर आकारला जावा.
87 टक्के भारतीय कुटुंबे ही या क्रिप्टोकरन्सीपासून दूर आहेत. 74 टक्के लोकांच्या म्हणण्यानुसार क्रिप्टोकरन्सीशी जोडलेल्या जाहिराती या त्यातील धोके सांगत नाहीत.
केंद्र सरकार क्रिप्टोकरन्सीबाबत हिवाळी अधिवेशनात विधेयक मांडण्याच्या तयारीत आहे. अलीकडेच आरबीआयने क्रिप्टोकरन्सीबाबत चिंता व्यक्त केली होती, त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली या विषयावर बैठक झाली. ज्यामध्ये सर्व मुद्यांवर चर्चा करण्यात आली.
क्रिप्टोकरन्सी निरीक्षकांचा असा दावा आहे की एप्रिल-2020 मध्ये भारताचे डिजिटल चलन 923 दशलक्ष डॉलर इतके होते, जे एप्रिल 2021 मध्ये सुमारे 6.6 अब्ज डॉलर इतके वाढले. तथापि, RBI गव्हर्नर के शक्तिकांत दास म्हणतात की, देशात क्रिप्टोकरन्सीकडे लोकांचा कल वाढला आहे. पण तरीही 70-80 टक्के भारतीयांनी क्रिप्टोकरन्सीमध्ये केवळ 500 ते 1000 रुपये गुंतवले आहेत.
LocalCircles ने क्रिप्टोकरन्सीबाबत गेल्या 15 दिवसांत हा सर्व्हे केला आहे. यामध्ये 342 जिल्ह्यांतील एकूण 56000 लोकांची मते जाणून घेण्यात आली. यामध्ये 66 टक्के पुरूष आणि 34 टक्के महिला होत्या. भारतीयांचा क्रिप्टोकरन्सीवर किती विश्वास आहे, हे यामागे जाणून घ्यायचे होते.