Rural India Debt: घरटी उत्पन्न सरासरी ७५ टक्क्यांनी घटलं; ग्रामीण भारत कर्जाच्या गर्तेत!

By ऑनलाइन लोकमत | Published: July 6, 2021 07:19 PM2021-07-06T19:19:43+5:302021-07-06T19:25:03+5:30

Rural India Debt: एका सर्वेक्षणातून धक्कादायक माहिती समोर येत आहे.

कोरोनाचा भारतात शिरकाव झाल्यापासून अनेकविध संकटांना सामान्य नागरिक सामोरे जात आहेत. बेरोजगारीत झालेली वाढ, वाढती महागाई यामुळे सामान्य जनता त्रस्त झाली आहे.

कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होण्यासाठी करण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे उद्योग, व्यापार यांचे कंबरडेच मोडले. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा मोठा फटका बसला आहे.

त्यातूनही आता हळूहळू देश सावरताना दिसत आहे. असे असले, तरी रॉयटर्सने केलेल्या एका सर्वेक्षणातून धक्कादायक माहिती समोर येत आहे.

रॉयटर्सने ग्रामीण भारतातील मोठ्या राज्यांमधील ८ गावांतल्या ७५ कुटुंबांची भेट घेतली. यानंतर असे लक्षात आले की, या लोकांचं घरटी उत्पन्न सरासरी ७५ टक्क्यांनी घटले असून, यापैकी दुपटीपेक्षा जास्त हिस्सा कर्जातच जातो.

मार्च २०२० पासून उधारी मागण्यामध्ये तिप्पट वाढ झाली आहे आणि त्यापैकी अर्ध्याहून अधिक उधारी ही गेल्या सहा महिन्यातली आहे, असे या सर्वेक्षणातून समोर आले आहे.

या ७५ कुटुंबांचे एकूण उत्पन्न करोनाकाळापूर्वी साधारण ८ लाख १५ हजार रुपये होते. मात्र आता ते केवळ २ लाख २० हजारांवर आले आहे.

उत्तर भारताच्या एका कोपऱ्यातल्या छोट्याश्या गावात राहणाऱ्या आशा देवी. सात माणसांना पोसता यावं म्हणून त्या आत्तापर्यंत किती वेळा उपाशी झोपल्यात याचा त्यांनाही ताळमेळ लागत नाही, असे सर्वेक्षणात म्हटले आहे.

२० हजाराच्या कर्जासाठी त्यांना आपली जमीन गहाण ठेवावी लागली. पैश्यांअभावी त्यांनी दुध घेणं बंद केलं, तेलाचा वापर कमी केला आणि डाळी तर दहा-बारा दिवसांतून एकदाच शिजवल्या जातात.

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी गरिबांना मोफत धान्याची सोय तर केली. मात्र एका परिवाराला हे धान्य पुरेसे नाही, असे आशा देवी यांनी यावेळी सांगितले. असे अनेक परिवार ग्रामीण भारतात पाहायला मिळतात.

जगच थांबल्याने हातावर पोट असलेल्यांचे जगही थांबल्याचे विदारक सत्य या सर्वेक्षणातून समोर आल्याचे सांगितले जात आहे. अनेक परिवारांना तर आपला वडिलोपार्जित व्यवसाय गुंडाळून बसावे लागत आहे.