रतन टाटांसह त्यांच्या भावानेही लग्न केले नाही; सावत्र भाऊ सांभाळतो व्यवसाय, कुटुंबात कोण..? By ऑनलाइन लोकमत | Published: October 10, 2024 03:27 PM 2024-10-10T15:27:41+5:30 2024-10-10T15:34:11+5:30
Ratan Tata Passes Away : रतन टाटा यांचे काल रात्री वयाच्या 86 व्या वर्षी निधन झाले. ते आपल्या मागे मोठा उद्योग समूह सोडून गेले... Ratan Tata Passes Away : टाटा समूह हा फक्त देशातील नाही, तर जगातील सर्वात मोठ्या उद्योग घरांपैकी एक आहे. बुधवारी(9 ऑक्टोबर 2024) रात्री टाटा समूह आणि देशाने आपल्या पालकासमान व्यक्तीमत्व गमावले. उद्योगसम्राट रतन टाटा यांचे 9 ऑक्टोबर रोजी वयाच्या 86 व्या वर्षी दीर्घ आजाराने निधन झाले. आज(10 ऑक्टोबर 2024) सायंकाळी रतन टाटा यांच्यां पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.
रतन टाटा हे केवळ एक उद्योगपतीच नव्हते, तर ते अनेक परोपकारी कार्यांसाठी ओळखले जायचे. त्यांनी सर्वसामान्यांसाठीही अनेक महत्वाच्या गोष्टी केल्या, त्याची अनेक उदाहरणे आहेत. त्यांच्या नेतृत्वात टाटा समूह एक आंतरराष्ट्रीय ब्रँड बनला. दरम्यान, रतन टाटा यांच्या कुटुंबाबद्दल फार कमी लोकांना माहिती आहे. त्यांच्या कुटुंबातील बहुतांश सदस्य लाइमलाइटपासून दूर राहतात. रतन टाटा यांचे कुटुंब खूप मोठे आहे. रतन टाटा यांचे वडील नवल टाटा होते. नवल टाटा यांना त्यांचे वडील रतनजी टाटा यांनी दत्तक घेतले होते. रतनजी टाटा हे टाटा समूहाचे संस्थापक जमशेदजी टाटा यांचे पुत्र होते. चला जाणून घेऊ रतन टाटांच्या कुटुंबात कोण-कोण आहेत?
नुसरवानजी टाटा- टाटा घराण्याचे कुलगुरू नुसरवानजी टाटा होते. टाटा घराण्याची सुरुवात येथून झाली. नुसरवानजी टाटा हे पारशी धर्मगुरू होते. व्यवसाय जगतात प्रवेश करणारे ते टाटा कुटुंबातील पहिले सदस्य होते. टाटा कुटुंबाच्या व्यवसायात प्रवेशाची ही सुरुवात होती.
जमशेटजी टाटा - नुसरवानजी टाटा यांचे पुत्र जमशेदजी टाटा यांनी टाटा समूहाची स्थापना केली. ते गुजरातमधील नवसारी येथील रहिवासी होता. मात्र, मुंबईत आल्यानंतर त्यांचे नशीब उजळले. जमशेदजी टाटा यांनी 1868 मध्ये टाटा समूहाची ट्रेडिंग कंपनी म्हणून पाया घातला. वयाच्या अवघ्या 29 व्या वर्षी त्यांनी 21,000 रुपयांची गुंतवणूक करून कंपनी सुरू केली. यानंतर टाटा समूहाने शिपिंगचे कामही केले आणि 1869 पर्यंत कापड व्यवसायात प्रवेश केला. जमशेदजींना भारतीय उद्योगाचे जनक म्हटले जाते. स्टील, हॉटेल (ताजमहाल हॉटेल) आणि जलविद्युत यांसारख्या कंपन्या स्थापन केल्या.
दोराबजी टाटा- जमशेदजी टाटा यांच्या ज्येष्ठ मुलाचे नाव दोराबजी टाटा होते. जमशेटजींच्या मृत्यूनंतर दोराबजींनी टाटा समूहाचे नेतृत्व हाती घेतले आणि टाटा स्टील, टाटा पॉवर यांसारख्या कंपन्या स्थापन करण्यात आणि वाढवण्यात मोठी भूमिका बजावली.
रतनजी टाटा- दोराबजींचा धाकटा भाऊ किंवा जमशेटजींचा धाकटा मुलगा रतनजी टाटा होते. रतनजी टाटा यांनी कापूस आणि कापड उद्योगांना एक वेगळी ओळख दिली आणि टाटा समूहाच्या इतर व्यवसायांनाही पुढे नेण्यात मोठी भूमिका बजावली.
जेआरडी टाटा (जहांगीर रतनजी दादाभॉय टाटा)- टाटा समूहाला खऱ्या अर्थाने पुढे नेन्यात जेआरडी टाटांचा महत्वाचा वाटा आहे. जेआरडी हे रतनजी टाटा यांचे पुत्र होते. जेआरडी टाटा यांच्या आईचे नाव सुझान ब्रिएर होते, त्या फ्रेंच महिला होत्या. जेआरडी टाटा हे भारताचे पहिले व्यावसायिक पायलट ठरले. जेआरडी टाटा 50 वर्षांहून अधिक काळ (1938-1991) टाटा समूहाचे अध्यक्ष राहिले. जेआरडी टाटा यांनी विमान कंपनीची स्थापना केली होती. नंतर त्याचे नाव एअर इंडिया ठेवण्यात आले. टाटा समूहाला बहुराष्ट्रीय कंपनी बनवण्यात जेआरडी टाटा यांनी महत्त्वाची भूमिका बजावली.
नवल टाटा- नवल टाटा हे रतनजी टाटा यांचे दत्तक पुत्र होते. टाटा समूहाला त्यांनीही वेगळी ओळख मिळवून दिली. टाटा समूहाला पुढे नेण्यात त्यांचा मोठा वाटा मानला जातो.
रतन नवल टाटा- रतन टाटा यांचा जन्म 8 डिसेंबर 1937 रोजी झाला. त्यांच्या वडिलांचे नाव नवल टाटा आणि आईचे नाव सनी टाटा होते. रतन टाटा हे जमशेटजी टाटा यांचे पणतू होते. 1991 ते 2012 पर्यंत ते टाटा समूहाचे अध्यक्ष होते. ऑक्टोबर 2016 ते फेब्रुवारी 2017 पर्यंत हंगामी अध्यक्ष म्हणून काम पाहिले. 2017 पासून टाटा समूहाच्या चॅरिटेबल ट्रस्टचे प्रमुख बनले. रतन टाटा यांनी टाटा समूहाला आंतरराष्ट्रीय ब्रँड बनवले. जेआरडी टाटा यांनी सुरू केलेली एअर इंडिया त्यांनी परत विकत घेतली. रतन टाटा यांनी फोर्डच्या लक्झरी कार ब्रँड लँड रोव्हर आणि जग्वारचाही त्यांच्या पोर्टफोलिओमध्ये समावेश करण्यात मोठी भूमिका बजावली. 2008 मध्ये रतन टाटा यांना पद्मविभूषण हा भारताचा दुसरा सर्वोच्च नागरी पुरस्कार मिळाला. यापूर्वी 2000 मध्ये त्यांना पद्मभूषण पुरस्कारानेही सन्मानित करण्यात आले होते.
जिमी टाटा- जिमी टाटा हे रतन टाटा यांचे सख्खे भाऊ आहेत. रतन टाटाप्रमाणेच जिमी टाटादेखील बॅचलर आहेत. ते नेहमीच लाइमलाइटपासून दूर राहतात, त्यामुळे त्यांच्याबद्दल फारशी कुणाला माहिती नाही. 90 च्या दशकात निवृत्त होण्यापूर्वी जिमी टाटा यांनी टाटाच्या विविध कंपन्यांमध्ये काम केले. ते सध्या टाटा सन्स आणि इतर अनेक टाटा कंपन्यांमध्ये शेअरहोल्डर आहेत. जिमी आजही मोबाईल फोन वापरत नाहीत किंवा आलिशान घरातही राहत नाहीत. मुंबईत एका छोट्याशा घरात त्यांचे वासत्व्य आहे.
नोएल टाटा- नोएल टाटा हे रतन टाटा यांचे सावत्र भाऊ आहेत. नोएल टाटा यांचा जन्म 1957 मध्ये झाला. ते टाटा इंटरनॅशनलचे अध्यक्ष आणि टाटा समूहाच्या अनेक कंपन्यांमध्ये भागधारक आहेत.
नोएल टाटा नंतर कोण? नोएल टाटा यांचा विवाह आलू मिस्त्री यांच्याशी झाला आहे. दोघांना तीन मुले आहेत, त्यांची नावे नेव्हिल, लेआ आणि माया टाटा आहेत. नेव्हिलचे लग्न किर्लोस्कर ग्रुपच्या सदस्य मानसी किर्लोस्करशी झाले आहे. तर, लेआ टाटाने स्पेनमधून शिक्षण घेतले आहे. ही तिन्ही मुले सध्या टाटा समूहातच विविध जबाबदाऱ्या पार पाडत आहेत.