गरजेच्या वेळी धावून आले Ratan Tata; अनेक Startups ना दिला आर्थिक मदतीचा हात

By ऑनलाइन लोकमत | Published: August 31, 2021 02:57 PM2021-08-31T14:57:28+5:302021-08-31T15:06:01+5:30

रतन टाटा यांची विशेष ओळख करून देण्याची गरजच नाही. आतापर्यंत त्यांनी अनेक स्टार्टअप्सना दिलंय आर्थिक पाठबळ.

रतन टाटा यांची विशेष ओळख करुन देण्याची गरज नाही. कोणतंही संकट असो त्यात मदतीचा हात पुढे करण्यात रतन टाटा यांच्या टाटा समुहाचं नाव कायम अग्रेसर असतं. एक यशस्वी उद्योजक म्हणूनही ते सर्वांच्या परिचयाचे आहेत. रतन टाटा यांनी आतापर्यंत अनेक स्टार्टअप्सना पुढे येण्यासाठी आर्थिक मदतीचा हातही दिलाय.

पेटीएम ही कंपनी ऑनलाइन ट्रान्झॅक्शन करणाऱ्यांना परिचयाची असेलच. ऑनलाइन ट्रान्झॅक्शन करणाऱ्या दिग्गज कंपन्यांपैकी ही एक कंपनी आहे. रतन टाटा यांनी पेटीएममध्येही गुंतवणूक केली होती. त्यांनी यापूर्वी एका मुलाखतीदरम्यान, आपण एक अॅक्सिडेंटल स्टार्टअप इन्व्हेस्टर असल्याचंही म्हटलं होतं.

तंत्रज्ञानाशी निगडीत नव्या पिढीच्या स्टार्टअप्स कंपन्यांमध्ये गुंतवणूक करण्यात रतन टाटा हे कायम पुढए असतात. अॅपद्वारे टॅक्सी सेवा पुरवणारी कंपनी OLA असेल किंवा पेटीएम, या कंपन्यांमध्ये त्यांनी २०१५ मध्येच गुंतवणूक केली होती. तसंच यात गुंतवणूक करणाऱ्या प्राथमिक गुंतवणूकदारांपैकी टाटा हे एक आहेत.

क्याझुंगा या ऑनलाइन तिकिटिंग प्लॅटफॉर्ममध्येही टाटांनी गुंतवणूक केली आहे. २००७ मध्ये आकाश भाटीया, अर्पिता मुझुमदार आणि नीती भाटीया यांनी या कंपनीची सुरूवात केली होती.

उत्तम डॉक्टर्स पर्यंत पोहोचण्यासाठी रुग्णांना मदत करणारं एक माध्यम म्हणजे Lybrate. आरोग्य सेवेत काम करणाऱ्या स्टार्टअप्समध्ये या कंपनीचं नाव येतं. ओला, झोमॅटो सारख्या माध्यमांप्रमाणेच याद्वारे वैद्यकीय क्षेत्रातील सेवांचा फायदा घेता येत असून या कंपनीतही रतन टाटा यांची गुंतवणूक आहे.

लेन्सकार्ट ही कंपनी अनेकांच्या परिचयाची असेलच. चष्मा, लेन्सेस अशा अनेक गोष्टींची विक्री करणाऱ्या या कंपनीतही रतन टाटा यांनी गुंतवणूक केली आहे. ही कंपनी २०१० मध्ये सुरू करण्यात आली होती. तसंच देशातील सर्वात मोठी ऑनलाइन ऑप्टिकल सेवा देणारी कंपनी म्हणून लेन्सकार्टला ओळखलं जातं.

२०१११ मध्ये रिचा कार हीनं झिवामीची सुरूवात केली होती. २०१५ मध्ये रतन टाटा यांनी या कंपनीत गुंतवणूक केल्यानंतर कंपनीनं देशभरात आपल्या व्यवसायाचा विस्तार केला होता. झिवामी हे एक ऑनलाईन लिंगरीज स्टोअर आहे.

Firstcry ही कंपनीही बेबी केअर प्रोडक्टसाठी सर्वांच्या परिचयाची आहेच. २०१० मध्ये firstcry ची सुरूवात झाली. २०१६ मध्ये रतन टाटा यांनी या कंपनीत गुंतवणूक केली होती. याशिवाय ऑनलाइन पद्धतीनं फर्निचरची विक्री करणाऱ्या कंपन्यांमध्ये अर्बन लॅडर ही कंपनी परिचयाची असेलच. २०१५ मध्ये रतन टाटा यांनी या कंपनीतही गुंतवणूक केली होती.

CarDekho हे नाव परिचयाचं नाही असं होणार नाही. जुन्या नव्या गाड्यांच्या खरेदी विक्रीसाठी असलेल्या प्लॅटफॉर्मपैकी एक म्हणजे कारदेखो. या कंपनीमध्येही टाटा यांची गुंतवणूक आहे. याशिवाय २०१५ मध्ये सुरू करण्यात आलेल्या अर्बन क्लॅप असेल किंवा रिपोझ एनर्जी असेल अशा अनेक कंपन्यांना टाटा यांनी आर्थिक पाठबळ दिलं आहे.

आपण आपले स्वत:चे पैसे स्टार्टअपमध्ये गुंतवत असल्याची माहिती रतन टाटा यांनी एका मुलाखती दरम्यान यापूर्वी दिली होती. आपल्या अनुभवाच्याच आधारे कोणत्या कंपनीत गुंतवणूक करायची याचा निर्णय ते घेतात. तंसच कोणत्याही कंपनीच्या प्रमोटरमध्ये असलेली जिद्द, त्यांचे विचार आणि त्यांच्याद्वारे देण्यात आलेलं सोल्यूशन याची गुंतवणूकीच्या निर्णयात मोठी भूमिका असल्याचंही त्यांनी सांगितलं होतं.