TATA रेकॉर्ड ब्रेक कामगिरी! ‘या’ कंपनीच्या शेअरने घेतला रॉकेट स्पीड; १ लाखाचे झाले २ कोटी By ऑनलाइन लोकमत | Published: April 2, 2022 02:40 PM 2022-04-02T14:40:42+5:30 2022-04-02T14:45:38+5:30
TATA ग्रुपच्या या कंपनीच्या शेअरने रॉकेट स्पीड पकडला असून, गुंतवणूकदारांना प्रचंड परतावा दिला आहे. आताच्या घडीला TATA ग्रुप अनेकविध क्षेत्रात दमदार कामगिरी करत आहे. शेअर मार्केटमध्येही टाटाच्या विविध कंपन्या रेकॉर्ड ब्रेक कामगिरी करत असल्याचे पाहायला मिळत आहे. यामुळे गुंतवणूकदार मालामाल होत आहेत. गुंतवणूकदारांचा टाटावरील विश्वास वाढत आहे.
यातच आता TATA ग्रुपच्या एका कंपनीच्या शेअरने रॉकेट स्पीड पकडला असून, गुंतवणूकदारांना प्रचंड परतावा दिला आहे. टाटा समूहातील या कंपनीचे नाव आहे टाटा एलेक्सी. (Tata Elxsi)
राष्ट्रीय शेअर बाजारात टाटा एलेक्सीच्या शेअर्सने ९,४२० रुपयांच्या नवीन सार्वकालिक उच्चांक गाठला आहे. Tata Elxsi चे शेअर्स २०२१ च्या मल्टीबॅगर स्टॉक्सपैकी एक होते. याशिवाय, कंपनीच्या समभागांनी गेल्या एका वर्षात गुंतवणूकदारांना २२० टक्क्यांहून अधिक परतावा दिला आहे.
टाटा एलेक्सीचा शेअर २ एप्रिल २००९ रोजी शेअर मार्केटमध्ये ४२ रुपयांवर होता. गेल्या १३ वर्षांत कंपनीच्या समभागांनी २०८ वेळा उसळी घेतली आहे. टाटा एलेक्सीच्या समभागांनी या कालावधीत गुंतवणूकदारांना २०,७०० टक्क्यांहून अधिक परतावा दिला आहे.
एखाद्या व्यक्तीने १३ वर्षांपूर्वी टाटा एलेक्सीच्या शेअर्समध्ये १ लाख रुपये गुंतवले असते आणि त्याची गुंतवणूक चालू ठेवू दिली असती, तर सध्या ही रक्कम २.८ कोटींपेक्षा जास्त झाली असती. त्याचप्रमाणे, जर एखाद्या व्यक्तीने १० वर्षांपूर्वी टाटा समूहाच्या या मल्टीबॅगर स्टॉकमध्ये १ लाख रुपये गुंतवले असतील, तर आता तीच रक्कम ८८.५० लाख रुपये झाले असते.
एखाद्या व्यक्तीने ५ वर्षांपूर्वी कंपनीच्या शेअर्समध्ये १ लाख रुपये गुंतवले असते, तर आज त्याचे मूल्य ११ लाख रुपयांपेक्षा जास्त झाले असते. Tata Elxsi चे सध्याचे मार्केट कॅप सुमारे ५५ हजार कोटी रुपये आहे आणि त्याचा लाभांश उत्पन्न ०.५४ आहे.
गेल्या वर्षभरात या कंपनीने १६८ टक्के रिटर्न दिल्याचे सांगितले जात आहे. आर्थिक बाबींचा विचार करता कंपनी तिच्या तिमाही कामगिरीत सातत्यपूर्ण राखून आहे. मागील तिमाहीत कंपनीने ६३५.४० कोटी रुपयांची निव्वळ विक्री गाठली आहे.
कंपनीने अपेक्षेपेक्षा चांगली तिमाही कामगिरी नोंदविल्यामुळे शेअर मूल्यतेजीला आणखी चालना मिळाली. टाटा एलक्सी ही वाहतूक, माध्यम, दळणवळण आणि आरोग्यनिगा तसेच वैद्यकीय उपकरणे यांसारख्या विविध क्षेत्रात आरेखन नेतृत्वाखालील तंत्रज्ञान सेवांमध्ये गुंतलेली आघाडीची तंत्रज्ञान कंपनी आहे.
टाटा समूहातील अनेक कंपन्या शेअर मार्केटमध्ये कमाल कामगिरी करत असून, टाटा समूहातील तीन डझन कंपन्यांचा सर्वांत विश्वासार्ह ब्रँडच्या यादीत समावेश झाला होता.