याला म्हणतात मेगा रिटर्न! TATA ‘या’ शेअरची कमाल; १ लाखाचे झाले ७.३४ कोटी, कंपनी देतेय लाभांश

By ऑनलाइन लोकमत | Published: April 21, 2022 05:04 PM2022-04-21T17:04:45+5:302022-04-21T17:20:05+5:30

बोर्डाने ४२५ टक्के लाभांश देण्याची शिफारस केली असून, कंपनीने तिमाहीत १६० कोटींपेक्षा अधिक नफा कमावला आहे.

TATA ग्रुप आताच्या घडीला नेकविध क्षेत्रात दमदार कामगिरी करत आहे. शेअर मार्केटमध्येही टाटाच्या विविध कंपन्या रेकॉर्ड ब्रेक कामगिरी करत असल्याचे पाहायला मिळत आहे. यामुळे गुंतवणूकदार मालामाल होत आहेत. गुंतवणूकदारांचा टाटावरील विश्वास वाढत आहे.

TATA ग्रुपच्या एका कंपनीच्या शेअरने आता रॉकेट स्पीड पकडला असून, गुंतवणूकदारांना प्रचंड परतावा दिला आहे. टाटा समूहातील या कंपनीचे नाव आहे टाटा एलेक्सी. (Tata Elxsi) या कंपनीने अलीकडेच तिमाहीचे निकाल जाहीर केले आहेत.

तिमाहीचे निकाल जाहीर करताना, Tata Elxsi कंपनीने सांगितले की, त्यांच्या बोर्डाने गत आर्थिक वर्षासाठी ४२५ टक्के लाभांश देण्याची शिफारस केली आहे. या कंपनीचा निव्वळ नफा जानेवारी-मार्चच्या तिमाहीत १६० कोटी रुपयांपर्यंत वाढला आहे, जो एका वर्षापूर्वीच्या तुलनेत सुमारे ३९ टक्क्यांनी अधिक आहे.

वार्षिक आधारावर, Tata Elxsi चा महसूल ३१.५ टक्क्यांनी वाढून ६८१.७ कोटी रुपये झाला आहे. कंपनीचे ऑपरेटिंग मार्जिन ३२.५ टक्के राहिले. कंपनीचा सर्वांत मोठा विभाग, एम्बेडेड प्रॉडक्ट डिझाइन तिमाही आधारावर ७.५ टक्क्यांनी वाढला.

औद्योगिक डिझाइन आणि व्हिज्युअलायझेशन विभाग मागील तिमाहीच्या तुलनेत ८ टक्क्यांनी वाढला आहे. टाटा अलेक्सीच्या समभागांनी एका वर्षात १५७ टक्क्यांहून अधिक परतावा दिला आहे. ५ एप्रिल १९९६ रोजी Tata Elxsi चे शेअर्स १०.६३ रुपयांच्या पातळीवर होते.

Tata Elxsi चा हाच शेअर २० एप्रिल २०२२ रोजी ७८०८ रुपयांवर बंद झाला. जर एखाद्या व्यक्तीने ५ एप्रिल १९९६ रोजी कंपनीच्या शेअर्समध्ये १० हजार रुपये गुंतवले असतील आणि त्याची गुंतवणूक कायम ठेवली असेल तर सध्याची रक्कम ७३.४५ लाख रुपये झाली असती.

या काळात Tata Elxsi कंपनीच्या शेअर्समध्ये १ लाख रुपये गुंतवले असते, तर सध्या ही रक्कम ७.३४ कोटी रुपयांच्या जवळपास गेली असती. या कालावधीत कंपनीच्या समभागांनी ७३,३०० टक्क्यांहून अधिक परतावा दिला आहे.

राष्ट्रीय शेअर बाजारात टाटा एलेक्‍सीच्या शेअर्सने ९,४२० रुपयांच्या नवीन सार्वकालिक उच्चांक गाठला आहे. Tata Elxsi चे शेअर्स २०२१ च्या मल्टीबॅगर स्टॉक्सपैकी एक होते. कंपनीने अपेक्षेपेक्षा चांगली तिमाही कामगिरी नोंदविल्यामुळे शेअर मूल्यतेजीला आणखी चालना मिळाली.

Tata Elxsi ही वाहतूक, माध्यम, दळणवळण आणि आरोग्यनिगा तसेच वैद्यकीय उपकरणे यांसारख्या विविध क्षेत्रात आरेखन नेतृत्वाखालील तंत्रज्ञान सेवांमध्ये गुंतलेली आघाडीची तंत्रज्ञान कंपनी आहे.