ठरलं? TATA आता Ford च्या गुजरातमधील प्लांटचे अधिग्रहण करणार; केवळ एक पाऊल दूर! By ऑनलाइन लोकमत | Published: March 20, 2022 04:34 PM 2022-03-20T16:34:46+5:30 2022-03-20T16:38:11+5:30
गुजरात सरकारने नियुक्त केलेली उच्चाधिकार समिती या प्रस्तावाला मंजुरी देऊ शकते, असे सांगितले जात आहे. TATA ग्रुपच्या अंतर्गत आताच्या घडीला शेकडो कंपन्या कार्यरत आहेत. यातील अनेक कंपन्या शेअर मार्केटमध्ये लिस्टेड आहेत. केवळ भारतीय बाजारपेठेत नाही, तर शेअर बाजारातही दमदार कामगिरी करताना पाहायला मिळत आहे.
TATA ग्रुप देशातील सर्वांत मोठा औद्योगिक समूह असून त्यात ११० हून अधिक कंपन्या कार्यरत आहेत. अलीकडेच टीआरए रिसर्चने देशभरात एक सर्वेक्षण केले, यामध्ये जवळपास एक हजारपेक्षा जास्त ब्रँड्सचा समावेश असून, केवळ TATA ग्रुपचे ३६ ब्रँड सर्वांत विश्वासार्ह ब्रँड आहेत.
यातच आता TATA ग्रुपमधील टाटा मोटर्स कंपनी Ford इंडिया कंपनीचा पॅसेंजर व्हेइकल मॅन्युफॅक्चरिंग प्लांट साणंदमध्ये घेण्याच्या तयारीत आहे. हा प्लांट अहमदाबादपासून ४० किमी अंतरावर आहे.
एका अहवालानुसार, दोन्ही कंपन्यांनी फोर्डच्या पॅसेंजर व्हेइकल मॅन्युफॅक्चरिंग प्लांटची मालकी TATA मोटर्सकडे हस्तांतरित करण्यासाठी संमती प्रस्ताव सादर केला आहे.
गुजरात सरकारने नियुक्त केलेली उच्चाधिकार समिती या प्रस्तावाला मंजुरी देऊ शकते. यामुळे पुढील आठवड्यात TATA मोटर्सचा फोर्ड प्लांट ताब्यात घेण्याचा मार्ग मोकळा होईल.
मीडिया रिपोर्ट्सनुसार, मोठ्या प्रकल्पांच्या अंमलबजावणीशी संबंधित समस्यांचे निराकरण करण्यासाठी एप्रिल २०१८ मध्ये गुजरात सरकारने एचपीसीची स्थापना केली होती. या समितीचे नेतृत्व मुख्यमंत्र्यांनी केले आहे.
पुढील आठवड्यात होणाऱ्या HPC बैठकीत, फोर्ड इंडियाचा साणंदमधील वाहन असेंब्ली प्लांट टाटा मोटर्सकडे हस्तांतरित करण्याच्या प्रस्तावावर आणि हस्तांतरणाशी संबंधित समस्यांवर तपशीलवार चर्चा केली जाईल आणि अंतिम निर्णय घेतला जाईल, असे सांगितले जात आहे.
TATA मोटर्सच्या नवीन प्लांटसाठी प्रोत्साहन आणि फायदे मिळतील की नाही हे सांगणे खूप घाईचे आहे. साणंद येथे नॅनो प्लांट उभारताना टाटा मोटर्सला प्रचंड प्रोत्साहन आणि फायदे मिळाले होते, असे सांगितले जात आहे.
Ford मोटर कंपनीने हा प्लांट उभारण्यासाठी ४ हजार कोटी रुपयांची गुंतवणूक केली होती. प्लांटची वार्षिक उत्पादन क्षमता २.४ लाख युनिट्स तसेच २.७ लाख इंजिन आहेत. टाटा मोटर्सनेही ४ हजार ५०० कोटी रुपयांची गुंतवणूक त्यांच्या उत्पादन प्रकल्पावर केली. ज्याची उत्पादन क्षमता वार्षिक १.५ लाख युनिट्स आहे. सदर युनिट सध्या टिगोर, टियागो आणि टिगोर ईव्ही कारचे उत्पादन करते.