TATA चे क्रांतिकारी पाऊल! मुंबईतील ‘या’ हॉटेलचे बांधकाम केवळ महिला करणार; पाहा, मेगा प्लान

By ऑनलाइन लोकमत | Published: December 17, 2021 11:49 AM2021-12-17T11:49:42+5:302021-12-17T11:53:17+5:30

टाटाच्या मुंबईतील या हॉटेलचे बांधकाम पूर्ण होण्यासाठी १९ महिन्यांचा कालावधी लागणार आहे.

आताच्या घडीला TATA ग्रुप अनेकविध क्षेत्रात आघाडीवर असून, टाटाच्या कंपन्या दमदार कामगिरी करताना पाहायला मिळत आहेत. भारतीय ग्राहकांची मने जिंकताना टाटाच्या बड्या कंपन्यांच्या शेअर मार्केटमधील मोठ्या घोडदौडीमुळे गुंतवणूकदारही मालामाल झाले आहेत.

TATA ग्रुप महिलांनाही पुरुषांप्रमाणे समान संधी देण्यावर भरत देत असून, महिला सशक्तीकरणाला प्रोत्साहन देण्याचे लक्ष्य टाटा ग्रुपने ठेवले आहे. टाटा स्टीलच्या एका प्रकल्पामध्ये महिला या पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून काम करतात.

TATA ग्रुप महिलांना प्रशिक्षण देण्यावरही लक्ष केंद्रीत करत आहे. टाटा स्टील २०३० पर्यंत आपल्या वर्कफोर्समध्ये ३० टक्के महिलांना संधी देणार असल्याचे सांगितले जात आहे. अनेकविध क्षेत्रांसह टाटा ग्रुप हॉटेल व्यवसायातही अग्रेसर आहे. याच क्षेत्रात टाटा ग्रुपने एक क्रांतिकारी पाऊल उचलल्याचे सांगितले जात आहे.

TATA ग्रुपच्या इंडियन हॉटेल कंपनीने एक नवीन निर्णय घेतला आहे. या कंपनीने मुंबईतील सांताक्रूझ येथे नवीन हॉटेल बांधण्याचा निर्णय घेतला आहे. मुंबईतील या जिंजर हॉटेलच्या बांधकामाची सगळी सूत्रे महिलांकडे सोपवण्यात आल्याचे सांगितले जात आहे. बांधकामासारख्या पुरुषांची मक्तेदारी असलेल्या पारंपरिक क्षेत्रात महिलांना संधी देण्याचे टाटाचे हे पाऊल क्रांतिकारक असल्याचे बोलले जात आहे.

TATA ग्रुपच्या इंडियन हॉटेल्स कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी पुनीत छतवाला यांनी याविषयी बोलताना सांगितले की, या कंपनीत सर्वांना समान संधी देण्यास आम्ही प्रतिबद्ध आहोत. महिला सर्व सीमा उल्लंघून पुढे जात आहेत. टाटा प्रोजेक्ट्ससोबत ही भागीदारी करण्यात येत आहे.

मुंबईतील सांताक्रूझ येथील जिंजर सांताक्रूझ हॉटेलच्या बांधकामात सहभागी सर्व महिलांचा आम्हाला अभिमान आहे, असेही छतवाला यांनी नमूद केले. टाटांचे हे हॉटेल मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ आणि वेस्टर्न एक्सप्रेस हायवे दरम्यान बांधले जात आहे. टाटा प्रोजेक्ट्स लिमिटेडद्वारा या जिंजर हॉटेलचे बांधकाम केले जात आहे.

TATA चे हे जिंजर हॉटेल १९ हजार वर्ग मीटवर बांधले जात आहे. या हॉटेलमध्ये ३७१ रुम असतील. या हॉटेलचे बांधकाम पूर्ण होण्यासाठी १९ महिन्यांचा कालावधी लागणार आहे. तर, जिंजर हॉटेल प्रकल्पासाठी सर्व महिला टीम नेतृत्वात उत्तम काम करत आहेत.

कंपनीने उचललेले हे पाऊल संस्कृती दर्शवणारे आहे. महिलांना आपल्या कार्यक्षेत्रात चांगले काम करण्याची आणि आपल्या भूमिका उत्तमरित्या पार पाडण्याची ही एक चांगली संधी असून, महिलांना यातून प्रोत्साहनच मिळणार आहे, असे टाटा प्रोजेक्ट्स लिमिटेडचे व्यवस्थापकीय संचालक विनायक देशपांडे यांनी सांगितले.