TATA ग्रुपचा धमाका! ‘या’ कंपनीतील कर्मचाऱ्यांसाठी गुड न्यूज; २७० कोटींचा बोनस घोषित

By ऑनलाइन लोकमत | Published: August 19, 2021 03:32 PM2021-08-19T15:32:58+5:302021-08-19T15:40:01+5:30

Tata Steel सर्व पात्र कर्मचाऱ्यांना वार्षिक बोनस म्हणून एकूण २७०.२८ कोटी रुपये देणार आहे.

TATA ग्रुप देशातील सर्वांत यशस्वी उद्योगांपैकी एक असून, ऑटोमोबाइल, विमान, इन्सुरन्स, स्टील, केमिकल अशा वेगवेगळ्या सेक्टरमध्ये TATA ग्रुपने आपली स्वतंत्र ओळख निर्माण केली आहे.

आताच्या घडीला TATA ग्रुप अनेकविध क्षेत्रात दमदार कामगिरी करत आहे. TATA ग्रुपच्या अनेक कंपन्या भन्नाट रिटन्सही देत आहेत. तसेच टाटा आता नवनव्या क्षेत्रातही पदार्पण करत असल्याचे पाहायला मिळत आहे.

TATA ग्रुपमधील Tata Steel ही जगातील आघाडीच्या स्टील उत्पादक कंपन्यांपैकी एक आहे. कंपनीच्या सर्व लागू विभाग/युनिटच्या पात्र कर्मचाऱ्यांना वर्ष २०२०-२१ साठी वार्षिक बोनस म्हणून एकूण २७०.२८ कोटी रुपये देणार आहे.

Tata Steel ने सांगितले की, वार्षिक बोनस देण्यासंदर्भात बुधवारी टाटा स्टील आणि टाटा वर्कर्स युनियन यांच्यात सामंजस्य करार करण्यात आला. कंपनीच्या सर्व लागू विभाग/युनिट्सच्या पात्र कर्मचाऱ्यांसाठी एकूण पेआउट २७०.२८ कोटी रुपये असेल. यापैकी १५८.३१ कोटी रुपयांची रक्कम जमशेदपूरमधील विविध विभागांना दिली जाणार आहे.

Tata Steel मधील कर्मचाऱ्यांच्या बोनसमध्येही बंपर वाढ झाली. कर्मचाऱ्यांना किमान ३४,९२० आणि कमाल ३,५९,०२९ रुपये वार्षिक बोनस मिळेल. युनियनच्या वतीने अध्यक्ष संजीव चौधरी, उपाध्यक्ष शैलेश कुमार सिंह, सरचिटणीस सतीश कुमार सिंह यांच्यासह एमडी आणि सीईओ टीव्ही नरेंद्रन, उपाध्यक्ष (एचआरएम) अत्रेय सरकार आणि इतर वरिष्ठ अधिकाऱ्यांनी बोनस करारावर स्वाक्षरी केली.

Tata Steel ला पहिल्या तिमाहीत तब्बल ९ हजार ७६८.३४ कोटी रुपयांचा एकत्रित निव्वळ नफा झाला आहे. गतवर्षी याच कालावधीत टाटा स्टीलला ४ हजार ६४८.१३ कोटी रुपयांचा निव्वळ तोटा झाला होता. भारतातील टाटा स्टील जगातील आघाडीच्या स्टील उत्पादक कंपन्यांपैकी एक आहे.

Tata Steel ने रोहतक, हरियाणा येथे पहिला स्टील रिसायकलिंग प्लांट सुरू केला. टाटा स्टीलने एका निवेदनात म्हटले आहे की, ५ लाख टन वार्षिक क्षमतेचा प्लांट आरती ग्रीन टेक लिमिटेडच्या सहकार्याने बिल्ड-कीप-रन (BOO) तत्त्वावर उभारण्यात आला.

स्टीलचा अनेक वेळा पुनर्वापर करता येतो आणि ते त्याचे गुणधर्म गमावत नाही. म्हणून स्टील स्क्रॅप हे एक मौल्यवान स्त्रोत आहे आणि स्टील बनवण्यासाठी एक महत्त्वाचा कच्चा माल आहे, असे Tata Steel चे स्टील रिसायकलिंग बिझनेसचे प्रमुख योगेश बेदी यांनी सांगितले.

Tata Steel ने युरोपमधील व्यवसायासाठी ३ हजार कोटी रुपयांचा भांडवली खर्च निश्चित केला आहे. कंपनीने तेथील व्यवसाय मजबूत करण्याचे लक्ष्य ठेवले आहे. दरम्यान, Tata Steel केंद्र सरकारच्या अखत्यारित असलेली एक स्टील कंपनी खरेदी करण्यास इच्छुक असल्याचे सांगितले जात आहे. टाटा स्टीलचे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि व्यवस्थापकीय संचालक टी. व्ही. नरेंद्रन यांनी याबाबतची माहिती दिली आहे.

केंद्रीय स्टील मंत्रालयाअंतर्गत येणाऱ्या राष्ट्रीय इस्पात निगम लिमिटेड (RINL) कंपनी टाटा स्टील खरेदी करण्यास उत्सुक आहे. RINL ही कंपनी विशाखापट्टनम येथे स्थित असून, भारताचा पहिला तटीय प्रकल्प असण्याचा मान या कंपनीला मिळाला आहे.

Tata Steel चे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि व्यवस्थापकीय संचालक टी. व्ही. नरेंद्रन यांनी म्हटले आहे की, होय, अधिग्रहणाच्या माध्यमातून कंपनीचा विस्तार करण्याची ही मोठी संधी आहे. कारण पूर्व आणि दक्षिणेपर्यंत या कंपनीचा विस्तार आहे. हा एक तटीय प्रकल्प असल्यामुळे याचे अनेक फायदे आहेत, असे ते म्हणाले.

Tata Steel ने ओडिशा येथील नीलांचल इस्पात निगम लिमिटेड (NINL) ही कंपनीही खरेदी करण्यासाठी इच्छा व्यक्त केली असून, त्यासाठीचा अर्जही सादर करण्यात आला आहे. NINL हा संयुक्त उपक्रम असून, याअंतर्गत एमएमटीसी, राष्ट्रीय खनिज विकास निगम (NMDC), भारत हेवी इलेक्ट्रिकल्स लिमिटेड (BHEL) आणि मेकॉन तसेच ओडिशा सरकारच्या दोन कंपन्या आयपीआयसीओएल आणि ओडिशा माइनिंग कॉरपोरेशन (OMC) ची हिस्सेदारी आहे.

केंद्र सरकारच्या आर्थिक व्यवहाराच्या मंत्रिमंडळाने २७ जानेवारी २०२१ रोजी RINL च्या विक्रीला तत्त्वतः मंजुरी दिली होती. १८ फेब्रुवारी १९८२ मध्ये RINL ची स्थापना करण्यात आली होती. आताच्या घडीला या कंपनीत जवळपास १६ हजार ८०० कर्मचारी काम करतात.