Tata Motors: पडत्या काळात साथ दिली! टाटा मोटर्सने केले गुंतवणूकदारांना मालामाल, 1 लाखाचे झाले 8 लाख By ऑनलाइन लोकमत | Published: October 13, 2021 06:46 PM 2021-10-13T18:46:36+5:30 2021-10-13T18:54:12+5:30
Tata Motors share Profit: ऑक्टोबर महिन्यात आतापर्यंत टाटा मोटर्सच्या शेअरने 50 टक्क्यांपर्यंत परतावा दिला आहे. टाटा मोटर्सने कोरोना काळात मागे वळून पाहिले नाही. एकेकाळी नुकसानीत असलेली टाटा मोटर्स सध्या फुल फॉर्ममध्ये आहे. टाटा मोटर्सच्या (Tata Motors) शेअरमध्ये (Share) तुफान आले आहे. आज शेअर बाजार उघडताच शेअरला 10 टक्क्यांचे अप्पर सर्किट लागले. यानंतर अर्ध्या तासात पुन्हा 15 टक्क्यांचे सर्किट लागले. शेवटी टाटा मोटर्सचा शेअर 21 टक्क्यांनी वधारून 509.70 रुपयांवर बंद झाला.
बुधवारी टाटा मोटर्सच्या शेअरमध्ये मोठी वाढ झाली. 462.90 रुपयांवर हा शेअर उघडला होता. आज दिवसभरात हा शेअर 23 टक्क्यांहून अधिक वर गेला. यावेळी शेअरने 523.85 रुपयांचा स्तर गाठला.
सोमवारीदेखील टाटाच्या शेअरमध्ये 10 टक्के वाढ दिसली होती. गेल्या आठवड्यात देखील टाटा मोटर्सच्या शेअरमध्ये वाढ होती. आजच्या या वाढीमुळे टाटा मोटर्सचे बाजारमुल्य 1.81 लाख कोटी रुपयांवर गेले आहे.
ऑक्टोबर महिन्यात आतापर्यंत टाटा मोटर्सच्या शेअरने 50 टक्क्यांपर्यंत परतावा दिला आहे. टाटा मोटर्सने कोरोना काळात मागे वळून पाहिले नाही. एवढेच नाही तर एका वर्षात शेअरमध्ये 289 टक्क्यांचा रिटर्न मिळाला आहे. 14 ऑक्टोबर 2020 मध्ये टाटाचा शेअर 130 रुपये होता. तो आता 509 रुपये झाला आहे.
गेल्या 18 महिन्यांत टाटा मोटर्सच्या शेअरने गुंतवणूकदारांना 8 पटींनी फायदा करून दिला आहे. 3 एप्रिल 2020 ला टाटा मोटर्सचा शेअर घसरून 65.30 रुपये झाला होता. आता 18 महिन्यांनी 13 ऑक्टोबर 2021 ला हा शेअर 523 रुपयांवर पोहोचला आहे. म्हणजेच दीड वर्षांपूर्वी ज्या लोकांनी 1 लाख रुपये गुंतविले त्यांचे पैसे आता 8 लाखांवर गेले आहेत.
टाटा मोटर्सने आपली नवीन सबसि़डरीमध्ये 7500 कोटी रुपये गुंतविण्याची योजना बनविली आहे. ही रक्कम टाटाने TPG Rise Capital आणि ADQ द्वारे गोळा केली आहे. या दोन्ही कंपन्यांची टाटाच्या नव्या सबसिडरीमध्ये 11 ते 15 टक्क्यांपर्यंत भागीदारी असणार आहे. यामुळे नव्या कंपनीचे व्हॅल्युएशन 68,598 कोटी रुपये अंदाजे करण्यात आले आहे.
शेअर वाढीचे कारण काय.... शेअर बाजारात मोठी वाढ मिळण्यामागे टाटा मोटर्सचा वाढता व्यवसाय आहे. टाटा मोटर्सच्या गाड्यांची मागणी वाढत आहे. तसेच कंपनी इलेक्ट्रीक वाहनांवरही लक्ष देत आहे. सप्टेंबरमध्ये टाटाच्या दोन कार देशातील टॉप 10 सेलिंग कारमध्ये होत्या. याशिवाय टाटा या महिन्यात टाटा पंच लाँच करणार आहे.
डिझेल आणि पेट्रोल महाग झाल्याने लोकांचा ओढा इलेक्ट्रीक गाड्यांकडे आहे. यामुळे टाटाच्या गाड्यांना मोठी मागणी आहे. टाटाकडेच सर्वाधिक इलेक्ट्रीक कार आहेत. कंपनीने भविष्य ओळखले आहे.