विराट कोहलीची गुंतवणूक असलेली कंपनी आणणार IPO, मिळणार कमाईची मोठी संधी

By ऑनलाइन लोकमत | Published: May 25, 2022 03:17 PM2022-05-25T15:17:40+5:302022-05-25T15:38:49+5:30

या कंपनीला Fairfax Group चं समर्थनही आहे, तसंच या कंपनीत विराट आणि अनुष्का शर्मा यांची गुंतवणूकही आहे.

जर तुम्ही शेअर बाजारात गुंतवणूक करत असाल आणि आयपीओमध्येही पैसे गुंतवून मोठी कमाई करण्याच्या विचारात असाल तर तुमच्यासाठी एक मोठी संधी आहे. भारतीय संघाचा क्रिकेटपटू विराट कोहली यानं ज्या कंपनीत गुंतवणूक केली आहे, ती कंपनी आपला आयपीओ घेऊन येण्याच्या तयारीत आहे.

विराट कोहली आणि अनुष्का शर्मा यांची या कंपनीत गुंतवणूक आहे. तर दुसरीकडे तो केवळ गुंतवणूकदारच नाही, तर त्या कंपनीचा ब्राँड अँबेसेडरही आहे. आयपीओ आणण्याच्या तयारीत असलेल्या या कंपनीचं नाव डिजिट इन्शुरन्स (Digit Insurance) असं आहे.

माहितीनुसार, डिजिट इन्शुरन्स 4.5 ते 5 बिलियनच्या मूल्यांकनाने सुमारे 500 बिलियन डॉलर्स उभारण्याचा विचार करत आहे. सप्टेंबरपर्यंत, कंपनी बाजार नियामक सेबीकडे एक मसुदा IPO दस्तऐवज दाखल करण्याची योजना आखत आहे. याशिवाय जानेवारीपर्यंत कंपनी शेअर बाजारात लिस्ट होण्याच्याही विचारात आहे.

नियमांनुसार, सूचीबद्ध होण्यापूर्वी विमा कंपनीला या क्षेत्रातील किमान पाच वर्षांचा अनुभव असणे आवश्यक आहे. डिजिटची पाच वर्षे सप्टेंबरपर्यंत होत आहेत. माहितीनुसार, डिजिटने आपल्या सर्वात मोठ्या शेअरहोल्डर फेअरफॅक्ससह नवीन शेअर्स ऑफर करून निधी उभारण्याची योजना आखली आहे. यात सुमारे 30 टक्के स्टेक आहेत.

डिजिटचे संस्थापक कामेश गोयल हे विमा उद्योगातील दिग्गज आहेत ज्यांनी जर्मनीच्या Allianz सोबत काम केले आहे आणि त्यांच्या भारतीय संयुक्त उपक्रमाचेही नेतृत्व केले आहे. कंपनीला कॅनेडियन अब्जाधीश प्रेम वत्सा यांच्या फेअरफॅक्स ग्रुपचा पाठिंबा आहे.

आपल्या वेबसाईटवर दिलेल्या माहितीनुसार डिजिटनं कार, बाईक, आरोग्य आणि प्रवास विम्यात 20 दशलक्ष पेक्षा अधिक लोकांना सेवा पुरवल्याचं म्हटलं आहे. डिजिट भारतातील काही स्टार्टअप युनिकॉर्न्सपैकी एक आहे. या कंपनीचं मार्केट व्हॅल्युएशन 1 बिलियन डॉलर्सपेक्षाही अधिक आहे.