शेअर बाजाराचे काही खरे नाही; गड्या, आपली बँकच बरी!

By ऑनलाइन लोकमत | Published: November 19, 2024 01:31 PM2024-11-19T13:31:10+5:302024-11-19T13:38:08+5:30

गेल्या काही दिवसांपासून शेअर बाजारात अस्थिरता निर्माण झाली आहे. शेअर मार्केटमध्ये सातत्याने घसरण होत असून, गुंतवणूकदारांचे प्रचंड नुकसान झाले आहे.

शेअर बाजारात मागील जवळपास ४८ दिवस सातत्याने घसरणीचे चित्र आहे. या काळात गुंतवणूकदारांचे जवळपास ४७ लाख कोटी रुपयांचे नुकसान झाले.

बाजारात धाकधूक वाढल्याने गुंतवणूकदार पुन्हा बँकांकडे वळू लागले आहेत. ऑक्टोबरच्या दुसऱ्या पंधरवड्यात बँकांमध्ये झालेली जमा वाढून २.३५ लाख कोटींवर पोहोचल्याचे आरबीआयने दिलेल्या आकडेवारीवरून दिसून येत आहे.

ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात बँकामधून १.१२ लाख कोटी काढून घेण्यात आले. यातील मोठी रक्कम शेअर बाजारात गुंतविली होती. नंतरचित्र बदलले. ऑक्टोबरमध्ये सेन्सेक्सचा निर्देशांक ६ टक्के घसरला. सप्टेंबरमध्ये सेन्सेक्स ८५ हजारांपर्यंत झेपावल्यानंतर बाजारात गुंतवणुकीचा ओघ सुरू राहिला.

ऑक्टोबरपासून सुरू असलेल्या घसरणीमुळे गुंतवणूकदारांची संपत्ती ४७ लाख कोटींनी कमी झाली. २७ सप्टेंबर रोजी बाजारातील कंपन्यांचे एकूण बाजार भांडवल ४७७.९० लाख कोटी इतके होते. आता यात घट होऊन बाजार भांडवल ४३०.६० लाख कोटींवर पोहोचले आहे.

सेन्सेक्सने विक्रमी झेप घेण्यापूर्वी ऑगस्टच्या दुसऱ्या पंधरवड्यात बँकांमधील एकूण जमा २१५.५० लाख कोटी रुपयांच्या घरात होती. सप्टेंबरच्या पहिल्या पंधरवड्यात बँकांमधील जमा रकमेत ४५ हजार कोटींची घट झाल्याचे दिसून आले.

नंतर सप्टेंबरच्या अखेरीपर्यंत बाजारात घसरणीचे सत्र सुरू झाले. या काळात बँकांमध्ये जमा वाढू लागली. ४ ऑक्टोबर रोजी बँकांमधील जमा रक्कम २१९ लाख कोटींवर पोहोचली, तर १८ ऑक्टोबर रोजी ही जमा २१८ लाख कोटी इतकी होती.

ऑगस्टपासून १८ ऑक्टोबरपर्यंत बँकांनी दिलेल्या कर्जाची रक्कम ४ लाख कोटी इतकी होती, तर बँकांमध्ये जमा झालेली रक्कम ५ लाख कोटी रुपयांनी वाढली. मार्च ते ऑक्टोबर या काळात बँकांमधील जमा ७.७ टक्के वाढून २२० लाख कोटींवर पोहोचली.