दहावी पास लेकाची कमाल; वडिलांचा डबघाईला आलेला उद्योग मालामाल, ३ हजार कोटींची उलाढाल

By ऑनलाइन लोकमत | Published: May 16, 2024 09:00 AM2024-05-16T09:00:06+5:302024-05-16T09:07:25+5:30

आज आम्ही तुम्हाला अशा व्यक्तीबाबत सांगणार आहोत, ज्यांच्या व्यावसायिक कौशल्यानं सर्वांनाच चकित केलं. त्यांचं नाव आहे सुभाष चंद्र एल, जे १० वी पास आहेत. संघर्षातून त्यांचं बालपण गेलं. वयाच्या सातव्या वर्षी सुभाष यांच्या डोक्यावरील आईचं छत्र हरपलं. वडिलांचा उद्योग डबघाईला आला होता.

बिझनेसमधून वडिलांना मोठा आर्थिक फटका बसला. मात्र जेव्हा या उद्योगाची कमान सुभाष चंद्र एल यांनी हाती घेतली तेव्हा उद्योग पुन्हा यशाच्या शिखरावर पोहचला. संगीता मोबाइल्स नावाच्या या कंपनीला सुभाष यांनी आज ३ हजार कोटींची बनवली. सुभाष चंद्र एल यांच्या यशाचा हा प्रवास जाणून घेऊ.

सुभाष चंद्र एल बंगळुरूला राहणारे आहेत. त्यांचे वडील नारायण रेड्डी यांनी १९७४ मध्ये त्यांच्या २ मित्रांसोबत संगीता नावाच्या कंपनीची सुरुवात केली. सुरुवातीला ही कंपनी म्यूझिक रेकॉर्ड विकत होती. परंतु जेव्हा व्यवसायाला यश मिळाले नाही तेव्हा मित्रांनी साथ सोडली. ते या बिझनेसमधून बाहेर पडले.

याच काळात सुभाष यांनी शिक्षण सोडलं आणि वडिलांच्या व्यवसायात हातभार लावणं सुरु केले. ते म्युझिक रेकॉर्ड, होम अप्लायंस आणि सिम कार्ड विकायचे काम करत होते. सुभाष यांच्या नेतृत्वात कंपनीला खऱ्या अर्थाने १९९७ मध्ये यश मिळण्यास सुरुवात झाली जेव्हा मोबाईल लोकप्रिय व्हायला लागले

सुभाष चंद्र एल यांची कंपनी पूर्ण देशात पहिलेच रिटेलर होते, ज्यांनी मोबाईलसाठी इन्सुरन्स प्रदान केले. जर तुमचा फोन तुटला नाही तर तुम्हाला इन्सुरन्सचा प्रिमियम परत केला जातो. कंपनीचा हा मॉडेल व्यवसायाच्या भरारीसाठी प्रमुख मोलाचा ठरला.

लोकांच्या विश्वासावर संगीता मोबाईल्स आज ६ राज्यातील ८०० स्टोअर्समध्ये २५०० लोकांना रोजगार देते. संगीता मोबाईल्स जवळपास ३००० कोटी रुपये उलाढाल करणारी बनली आहे. ज्यावेळी या कंपनीची सुरुवात झाली तेव्हा बंगळुरूच्या जेसी रोडवर ६०० स्क्वेअर फूटाचं छोटं स्टोअर होते.

संगीता मोबाईल हे नाव दक्षिण भारतातील ऑफलाईन मोबाईल फोन रिटेल स्टोअरमध्ये सर्वाधिक प्रसिद्ध बनलं आहे. सुभाष चंद्र एल यांचे वडील नारायण रेड्डी हे एका होम अप्लायंस कंपनीत स्टोअर मॅनेजरची नोकरी करायचे. त्यानंतर त्यांनी बंगळुरूमध्ये येत स्वत:ची कंपनी स्थापन केली.

बंगळुरूत कुटुंब आल्यानंतर सुभाष यांच्या आईचं निधन झालं, त्यानंतर वडिलांनी सुभाष आणि त्यांच्या ५ वर्षीय बहिणीला आजी आजोबांकडे पाठवले. त्यानंतर सुभाष ८ वर्षाचा झाल्यानंतर तो वडिलांसोबत राहण्यास आला. दरम्यानच्या काळात वडिलांनी जेसी रोडवर द मर्चंट नावाचं घरगुती उपकरणं विक्रीचं स्टोअर उघडलं होते

मित्रांसोबत सुरु केलेली वडिलांची कंपनी डबघाईला आली. अनावश्यक खर्चामुळे कंपनीला तोटा झाल्याचं सुभाष चंद्र एल सांगतात, वडिलांनी हे दुकान विक्री करण्याचा विचार केला. परंतु कुणीही खरेदीदार सापडला नाही. मित्रांनी काढता पाय घेतल्यानं संगीता मोबाईल्स कंपनीचे ते एकमेव मालक राहिले.

बाप-लेकाच्या आयुष्यातील हा सर्वात कठीण काळ होता. ते दोघं दुकानातच राहायचे. शेजारी जेवायला जायचे. मात्र वडिलांचा व्यवसाय पुन्हा नव्याने उभारण्याची सुभाषची जिद्द होती. त्यात १९९७ मध्ये मोबाईल हँडसेट पहिल्यांदा भारतात आला. तिथूनच या नव्या तंत्रज्ञानामुळे सुभाष यांच्या आयुष्यात मोठं वळण लागलं.