सातासमुद्रापार पोहोचवली बीकानेरची चव, ८ वी उत्तीर्ण व्यक्तीनं भुजीया विकून उभी केली १२००० कोटींची कंपनी By ऑनलाइन लोकमत | Published: December 8, 2023 08:54 AM 2023-12-08T08:54:22+5:30 2023-12-08T09:15:17+5:30
जेव्हा केव्हा नमकीन भुजीयाचा विषय येतो तेव्हा तुमच्या तोंडी बीकानेरी भुजीयाचं नाव आलं असेल. जेव्हा केव्हा नमकीन भुजीयाचा विषय येतो तेव्हा तुमच्या तोंडी बीकानेरी भुजीयाचं नाव आलं असेल. आज बीकानेरी भुजीयाची चव सातासमुद्रापार पोहोचलीये. बीकानेरची ही चव आज परदेशातही अनेकांच्या तोंडावर आहे. भारतीय स्नॅक्समध्ये आपलं वर्चस्व तयार केल्यानंतर बीकाजी फूड्स इंटरनॅशननं वेस्टर्न स्नॅक्स कॅटेगरीमध्ये आपली ओळख निर्माण केलीये. यामागे एका आठवी उत्तीर्ण व्यक्तीचं डोकं आहे.
भारतात नमकीन क्षेत्रात दोन कंपन्यांचं वर्चस्व आहे. पहिली कंपनी म्हणजे हल्दीराम आणि दुसरी म्हणजे बीकाजी. मात्र, बीकाजीचा जन्मही हल्दीरामपासून झाला हे फार कमी लोकांना माहीत आहे. म्हणजे दोन्ही कंपन्या एकाच कुटुंबाचा भाग आहेत. याचा प्रवास ८० वर्षांपूर्वी १९४० मध्ये राजस्थानच्या बीकानेर येथून सुरू झाला होता. बीकानेरच्या रस्त्यावर एका छोट्या चुलीवर भुजिया बनवून विकणाऱ्या अग्रवाल कुटुंबानं काही काळातच १२००० कोटी रुपयांची कंपनी उभी केली.
हल्दीराम बीकाजी भुजियाचे संस्थापक आणि अध्यक्ष शिवरतन अग्रवाल यांचे आजोबा होते. ते स्वतः आपल्या हातानं भुजीया बनवून विकायचे. हळुहळु त्याची ख्याती शहरभर पसरली. नंतर हल्दीराम कोलकाता येथे जाऊन स्थायिक झाले. हल्दीराम भुजियावाले यांचा व्यवसाय त्यांचा मुलगा मूलचंद अग्रवाल यांच्याकडे गेला.
मूलचंद अग्रवाल यांना शिवकिशन अग्रवाल, मनोहर लाल अग्रवाल, मधु अग्रवाल आणि शिवरतन अग्रवाल अशी चार मुले आहेत. तीन भावांनी मिळून हल्दीरामचा व्यवसाय पुढे नेला, तर चौथा मुलगा त्यांच्यापासून वेगळा झाला आणि त्याने स्वतःचा नवीन ब्रँड सुरू केला, त्याचं नाव बीकाजी असं ठेवण्यात आलं.
शिवरतन अग्रवाल यांनी १९८७ मध्ये बीकाजी भुजियाची सुरूवात केली. याचं नाव त्यांनी बीकानेर शहराचे संस्थापक राव बीकाजी यांच्या नावावर ठेवलं. त्यांनी आपल्या कामाची सुरूवातही त्याच शहरापासून केली. त्यावेळी हल्दीराम हा ब्रँड प्रसिद्ध होता. परंतु शिवरतन यांना बीकाजी भुजियासाठी मोठी मेहनत करावी लागली.
उत्पादनाच्या बाबतीत त्यांचे विचार अतिशय निराळे होते. त्यांनी भुजिया तयार करण्यासाठी मशीनचा वापर सुरू केला. देशात पहिल्यांदाच भुजिया तयार करण्यासाठी फॅक्ट्री सुरुवात करण्यात आली. या ठिकाणी प्रत्येक काम मशीनच्या सहाय्यानं करण्यात येतं.
शिवरतन अग्रवाल यांना लहानपणापासून भुजिया बनवण्याची आवड होती. आजोबा हल्दीराम यांच्याकडून त्यांनी भुजिया बनवायला शिकले. ८ वी पर्यंत पूर्ण केल्यानंतरच ते कौटुंबिक व्यवसायात उतरले. शिवरतन अग्रवाल आठवी पास असूनही व्यवसाय चालवण्याच्या सर्व युक्त्या त्याच्याकडे होत्या. भुजियाच्या चवीबाबत त्यांनी कधीही तडजोड केली नाही.
या जोरावर त्यांनी देशातच नव्हे तर परदेशातही व्यवसायाचा विस्तार केला. आज त्यांची कंपनी २५० हून अधिक प्रकारची उत्पादनं तयार करते. भुजिया, नमकीन, डब्बाबंद मिठाई, पापड तसेच इतर पदार्थांचं उत्पादन ते करतात. बीकाजी ही भारतातील तिसरी सर्वात मोठी पारंपारिक स्नॅक्स उत्पादक आहे, जी आता परदेशातही आपला ठसा उमटवत आहे. त्याची देशभरात ८ लाखांहून अधिक दुकाने आणि रेस्टॉरंट आहेत.
कंपनीचे ८० टक्के कर्मचारी बीकानेरचे रहिवासी आहेत. वेळेनुसार बीकाजीनं पॅकेजिंगपासून जाहिरातींपर्यंत बदल केले. सध्या शिवरतन अग्रवाल यांचा मुलगा दीपक अग्रवाल हे व्यवसाय पुढे नेत आहेत. सध्या ३२ देशांमध्ये बीकाजीचे स्नॅक्स पोहोचलेत. १९९४ मध्ये त्यांनी परदेशात एक्सपोर्ट करण्यास सुरुवात केली. आज अमेरिका, संयुक्त अरब अमिराती, ऑस्ट्रेलिया, रशिया, फ्रान्स, जर्मनी, स्पेन, पोलंड, बेल्जिअम, न्यूझीलंड, इंग्लंड, बहरीन, नॉर्वे, स्वीडन आणि नेदरलँडसारख्या ठिकाणी त्यांचे प्रोडक्ट विकले जात आहेत.