होम लोनच्या वाढत्या EMIच्या ओझ्यातून तुर्तास दिलासा नाहीच, पाहा कधी मिळाणार खूशखबर?

By ऑनलाइन लोकमत | Published: July 6, 2023 10:01 AM2023-07-06T10:01:09+5:302023-07-06T10:10:01+5:30

एकीकडे होम लोनचे व्याजदर वाढत आहेत. तर दुसरीकडे वाढत्या महागाईनं लोकांच्या खिशावरील ताण वाढत आहे.

भाजीपाला, डाळी आणि मसाल्यांच्या किंमतीत सातत्यानं वाढ होत आहे. वाढत्या महागाईमुळे सर्वसामान्य माणूस हैराण झाला आहे. त्याच्या खिशावर होणारा परिणाम लक्षात घेऊन ऑगस्टमध्ये होणाऱ्या रिझर्व्ह बँकेच्या पतधोरण समितीच्या बैठकीत व्याजदर कपात पुढे ढकलण्याचा विचार करू शकतात.

दरम्यान, धोरणकर्ते व्याजदर 'जैसे थे' ठेवू शकतात असं तज्ज्ञांचं म्हणणं आहे. गरमी आणि अवकाळी पावसामुळे संपूर्ण भारतात जीवनावश्यक वस्तूंच्या किमती वाढल्या आहेत.

विशेष म्हणजे, रिझर्व्ह बँकेनं अलीकडे रेपो दरांमध्ये कोणताही बदल केलेला नाही. आता रिझर्व्ह बँक रेपो दरात कपात करणार का याकडे सर्वांचे लक्ष लागलं आहे. तज्ज्ञांच्या मते, सध्या व्याजदरात कपातीची अपेक्षा फारच कमी आहे.

यावेळी रेपो दरांमध्ये बदल लिक्विडीनुसारही करता येणार नाही. यामुळे देखील रिझर्व्ह बँकेनं दरांमध्ये स्थिरतेची भूमिका घेतली आहे. सद्य:स्थितीत ते उद्दिष्टापेक्षा जास्त दिसत असून महागाईही वाढत आहे, अशी प्रतिक्रिया एचडीएफसी सिक्युरिटीजचे रिसर्च प्रमुख दीपक जसानी यांनी सांगितलं.

रिझर्व्ह बँकेच्या गव्हर्नरांनी महागाई दर ४ टक्क्यांवर कायम राहण्याची अपेक्षा व्यक्त केली आहे. त्याच वेळी चालू आर्थिक वर्षात रिझर्व्ह बँक दरांवर यथास्थिती कायम ठेवेल आणि २०२४ च्या मार्च तिमाहीतच कपात सुरू करेल असं क्रिसिल रेटिंग्सचे मुख्य इकॉनॉमिस्ट धर्मकीर्ती जोशी यांनी सांगितलं.

उन्हाळ्या दिवसांमध्ये भाज्यांच्या किंमतीत चढ उतार होत असतो. अशात रिझर्व्ह बँकेचा पॉलिसी प्लॅन सध्या तरी बदलणार नाही. आर्थिक वर्ष २०२४ च्या दुसऱ्या सहामाहीत मगाहाईचं लक्ष्य वाढू शकते आणि व्याजदराच्या कपातीच्या अपेक्षांना बळ मिळू शकतं अशी प्रतिक्रिया केअर एजचमधील चीफ इकॉनॉमिस्ट रजनी सिन्हा यांनी म्हटलं.