Personal Loan वर लागतात 'हे' ५ चार्जेस; बरेचदा लोन देणारे एजंट लपवण्याचा प्रयत्न करतात, पाहा

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 10, 2024 10:05 IST2024-12-10T09:34:12+5:302024-12-10T10:05:40+5:30

Personal Loan Charges : पैशांची चणचण भासली की अनेकदा आपण कर्जाचा पर्याय निवडतो. त्यात पर्सनल लोन हे तुलनेनं लवकर मिळत असल्यानं त्याकडे आपण वळतो. पण अशातच त्यासोबत लागणारे चार्जेस विचारायचं मात्र आपण विसरतो.

Personal Loan Charges : कोणतंही सोंग घेता येतं पण पैशांचं सोंग घेता येत नाही, हे तुम्ही कधी ना कधी ऐकलं असेल किंवा अनुभवलंही असेल. पैशांची चणचण भासली की अनेकदा आपण कर्जाचा पर्याय निवडतो. त्यात पर्सनल लोन हे तुलनेनं लवकर मिळत असल्यानं त्याकडे आपण वळतो. पण अशातच त्यासोबत लागणारे चार्जेस विचारायचं मात्र आपण विसरतो. पर्सनल लोन घेताना त्यासोबत काही चार्जेस लागतात. अनेकदा एजंट आपल्याला ते सांगतही नाहीत.

पर्सनल लोन घेताना काही फी आणि चार्जेस (Personal Loan Charge) याबद्दल माहिती असणं खूप गरजेचं असतं. हे शुल्क समजून घेतल्यास आपल्यासाठी आर्थिक नियोजन सोपं होऊ शकतं आणि अनपेक्षित खर्च टाळण्यास मदत होते. पर्सनल लोन घेताना काही विशिष्ट फी आणि चार्जेस लक्षात घेतले पाहिजेत.

प्रोसेसिंग फी (Processing Fee) - कर्जाच्या प्रक्रियेदरम्यान बँक किंवा वित्तीय संस्थेकडून हे शुल्क आकारले जाते. हे सहसा कर्जाच्या १% इतके असते, जे ३% पर्यंतही असू शकतं आणि कधीकधी रक्कम किमान मर्यादेत असू शकते.

प्रीपेमेंट फी (Prepayment/Foreclosure Fee) - कर्जाची रक्कम आगाऊ म्हणजेच मुदतीपूर्वी फेडल्यास काही बँका किंवा वित्तीय संस्था त्यासाठी शुल्क आकारतात. हे शुल्क सामान्यत: कर्जाच्या शिल्लक रकमेच्या २% ते ५% पर्यंत असू शकतं. काही बँकांमध्ये, जर तुम्ही कर्जाचा काही भाग परत केला तर हे शुल्क पूर्णपणे लागू होत नाही.

ईएमआयवर लेट पेमेंट फी (Late Payment Fees) - जर तुम्ही तुमचा ईएमआय वेळेवर भरला नाही तर बँका किंवा लेंडर्स लेट फी आकारू शकतात. हे शुल्क बँक ठरवते आणि ते आपल्या ईएमआयनुसार बदलू शकते. हे शुल्क साधारणत: ५०० ते २००० रुपयांपर्यंत असू शकते.

चेक बाऊन्स फी (Cheque Bounce Fees) - जर तुम्ही चेकद्वारे कर्जाचा ईएमआय भरत असाल आणि चेक बाऊन्स झाला तर बँक तुमच्याकडून बाऊन्स फी आकारू शकते. हे शुल्क २०० रुपयांपासून ५०० रुपयांपर्यंत असू शकते. हे आपल्या बँकेवर देखील अवलंबून असते, आपल्याकडून अधिक शुल्क आकारलं जाऊ शकतं.

इन्शुरन्स फी (Loan Insurance Fee) - काही बँका पर्सनल लोनवर इन्शुरन्स पॉलिसी घेण्यासाठी शुल्क आकारतात. कर्जाच्या रकमेचे जोखमीपासून संरक्षण करणं हा त्याचा उद्देश आहे. हे शुल्क कर्जाची रक्कम आणि विमा पॉलिसीवर अवलंबून असतं.