रिटायरमेंटनंतर पेन्शनचं टेन्शन दूर करतील या ५ स्कीम्स, घरबसल्या महिन्याला होईल कमाई; कोणत्या आहेत स्कीम्स?
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 21, 2025 08:34 IST2025-02-21T08:21:32+5:302025-02-21T08:34:25+5:30
दरमहा पेन्शन मिळाली तर छोट्या-छोट्या कामासाठी दुसऱ्या कोणावर अवलंबून राहावं लागत नाही. आजकाल अशा अनेक योजना आहेत ज्याच्या माध्यमातून तुम्ही वृद्धापकाळात स्वत:साठी पेन्शनची सहज व्यवस्था करू शकता.

Retirement Pension Scheme: निवृत्तीच्या वेळी कितीही पैसे जमा केलेला असेल तरी दैनंदिन कामं मात्र पेन्शननंच पूर्ण होतात. दरमहा पेन्शन मिळाली तर छोट्या-छोट्या कामासाठी दुसऱ्या कोणावर अवलंबून राहावं लागत नाही. आजकाल अशा अनेक योजना आहेत ज्याच्या माध्यमातून तुम्ही वृद्धापकाळात स्वत:साठी पेन्शनची सहज व्यवस्था करू शकता. अशाच ५ योजनांवर एक नजर टाकूयात.
ईपीएफओ
खाजगी क्षेत्रात काम करणारे दर महिन्याला ईपीएफओमध्ये योगदान देतात. कर्मचारी आणि नियोक्ता दोघेही ईपीएफओमध्ये योगदान देतात. यातील काही भाग तुमच्या निवृत्ती निधीत जातो आणि काही भाग ईपीएस (एम्प्लॉई पेन्शन स्कीम) मध्ये जातो. ईपीएसच्या माध्यमातून वृद्धापकाळावर दरमहा पेन्शन दिली जाते. जर तुम्ही सलग किमान १० वर्षे ईपीएसमध्ये योगदान दिले असेल तर तुम्ही ईपीएफओकडून पेन्शन घेण्यास पात्र आहात. हे पेन्शन निवृत्तीच्या वयात उपलब्ध असतं आणि आपल्या योगदानाच्या रकमेवर अवलंबून असतं.
अटल पेन्शन योजना
अटल पेन्शन योजनेच्या माध्यमातून वृद्धापकाळावर नियमित उत्पन्नाची व्यवस्था करू शकता. ही योजना करदाते नसलेल्यांसाठी आहे. यामध्ये गुंतवणूक करण्यासाठी तुमचे वय १८ ते ४० च्या दरम्यान असणं आवश्यक आहे. या योजनेत व्यक्तीला वयाच्या ६० व्या वर्षापर्यंत दरमहा थोडंफार योगदान द्यावं लागते. या योजनेअंतर्गत वयाच्या ६० व्या वर्षानंतर १००० ते ५००० रुपये मासिक पेन्शन दिलं जाईल. तुम्हाला किती पेन्शन घ्यायचं आहे, त्यानुसार तुमच्या योगदानाची रक्कम ठरवली जाते.
एनपीएस
तुम्ही सरकारी नोकरीत असाल किंवा खाजगी नोकरीत असाल तर मासिक पेन्शन मिळवण्यासाठी तुम्ही नॅशनल पेन्शन सिस्टीमचा पर्याय निवडू शकता. ही योजना निवृत्ती निधीसह पेन्शनची व्यवस्था देखील करू शकते. एनपीएस ही मार्केट लिंक्ड स्कीम आहे, त्यामुळे त्याचा परतावा बाजारावर आधारित असतो. पण दीर्घ काळासाठी ही स्कीम खूप चांगला परतावा देऊ शकते. त्याचा सरासरी परतावा १० टक्के मानला जातो. भारतातील कोणताही नागरिक ज्यांचे वय १८ ते ७५ वर्षे आहे ते या योजनेचा लाभ घेऊ शकतात. यामध्ये तुम्हाला निवृत्तीनंतर मिळणारी ६०% रक्कम रिटायरमेंट फंड म्हणून मिळते आणि ४०% रक्कम अॅन्युइटी म्हणून वापरली जाते. अशा प्रकारे तुम्हाला पेन्शन दिली जाते. वार्षिकीची रक्कम जितकी जास्त असेल तितकी पेन्शन जास्त मिळेल.
एसडब्ल्यूपी
वृद्धापकाळावर चांगलं पेन्शन मिळवण्यासाठी तुम्ही सिस्टिमॅटिक विड्रॉल प्लॅनही निवडू शकता. ही अशी गुंतवणूक आहे ज्याअंतर्गत गुंतवणूकदाराला म्युच्युअल फंड योजनेतून दरमहा ठराविक रक्कम मिळते. या माध्यमातून वृद्धापकाळावर चांगल्या पेन्शनची व्यवस्था करता येईल. पण आधी तुम्हाला तुमच्या नोकरीसोबत एसआयपी किंवा इतर कोणत्याही योजनेच्या माध्यमातून मोठा निधी जमा करावा लागतो. निवृत्त झाल्यावर तुम्हाला एसडब्ल्यूपीचा पर्याय निवडावा लागेल. एसडब्ल्यूपीची रक्कम ही म्युच्युअल फंड युनिट्सच्या विक्रीतून मिळते. निधी संपला तर एसडब्ल्यूपी बंद होईल. मासिक, त्रैमासिक आणि वार्षिक पैसे कधी हवे हे ठरवावं लागतं. जर तुम्हाला एसआयपी करता आली नसेल तर निवृत्तीनंतर मिळणारा निधीही तुम्ही यासाठी वापरू शकता.
पोस्ट ऑफिस मंथली इन्कम स्कीम
पोस्ट ऑफिस मंथली इनकम स्कीमच्या माध्यमातूनही तुम्ही दरमहिन्याला उत्पन्न मिळवू शकता. सरकारनं दिलेल्या या गॅरंटीड डिपॉझिट स्कीममध्ये व्याजाच्या माध्यमातून कमाई केली जाते. यामध्ये सिंगल आणि जॉइंट अकाऊंट उपलब्ध आहेत. एका खात्यात जास्तीत जास्त ९ लाख रुपये आणि संयुक्त खात्यात १५ लाख रुपये जमा करण्याची मर्यादा आहे. हे पैसे जास्तीत जास्त ५ वर्षांसाठी जमा केले जातात. सध्याच्या ७.४% व्याजदरानं तुम्ही जॉइंट अकाऊंटच्या माध्यमातून या योजनेतून दरमहा ९,२५० रुपयांपर्यंत कमाई करू शकता. ५ वर्षांनंतर जमा केलेली रक्कम तुम्हाला परत दिली जाते. जर तुम्हाला ५ वर्षांनंतरही योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर तुम्ही नवीन खातं उघडू शकता.