१ मेपासून बदलणार हे पाच नियम, गॅस सिलेंडरपासून ते बँकिंगपर्यंच्या व्यवहारांवर होणार परिणाम By ऑनलाइन लोकमत | Published: April 29, 2021 12:20 PM 2021-04-29T12:20:24+5:30 2021-04-29T12:41:43+5:30
नव्या आर्थिक वर्षातील पहिला महिना अर्थात एप्रिल महिना संपायला आता केवळ एका दिवसाचा अवधी उरला आहे. दरम्यान एक मेपासून अनेक नियम बदलणार आहेत. यामध्ये बँकिंग, गॅस सिलेंडर, कोरोना लसीकरण यासारख्या नियमांचा समावेश आहे. नव्या आर्थिक वर्षातील पहिला महिना अर्थात एप्रिल महिना संपायला आता केवळ एका दिवसाचा अवधी उरला आहे. दरम्यान एक मेपासून अनेक नियम बदलणार आहेत. यामध्ये बँकिंग, गॅस सिलेंडर, कोरोना लसीकरण यासारख्या नियमांचा समावेश आहे. या बदलांचा सर्वसामान्य जनतेवर थेट परिणाम होणार आहे. या बदलांचा घेतलेला हा आढावा.
अॅक्सिस बॅकेच्या नियमांमध्ये होणार आहे हा बदल अॅक्सिस बँकेने १ मेपासून बचत खात्यामधील किमान ठेवीबाबतचा नियम बदलला आहे. १ मेपासून फ्री लिमीटनंचर एटीएममधून कॅश काढल्यास सध्याच्या तुलनेच दुप्पट दंड आकारला जाईल. याशिवाय बँकेने अन्य सेवांसाठीचे शुल्कसुद्धा आधीच्या तुलनेत वाढवले आहेत. १ मे पासून अॅक्सिस बँकेने किमान शिल्लक ठेवीची मर्यादा वाढवली आहे. अॅक्सिस बँकेच्या इझी सेव्हिंग स्कीम खात्यांमध्ये किमान ठेवीची मर्यादा १० हजारांवरून १५ हजार रुपयांपर्यंत वाढवण्यात आली आहे.
१८ वर्षांवरील लोकांचे लसीकरण कोरोनाच्या वाढत्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने १८ वर्षांवरील व्यक्तींच्या लसीकरणाची सुरुवात करण्याची घोषणा केली आहे. सर्वसामान्यांसाठीच्या लसीकरणाच्या या तिसऱ्या टप्प्यात १८ वर्षांवरील सर्व लोकांना कोरोनाविरोधातील लस दिली जाणार आहे. या लसीकरणासाठी सरकारने अनेक नियम बदलले आहेत. अनेक नवे नियमही लागू केले आहेत. त्यामुळे सरकारने ऑनलाइन रजिस्ट्रेशनची प्रक्रियाही अनिवार्य केली आहे.
आयआरडीएने पॉलिसी कव्हर रक्कम केली दुप्पट कोरोनाच्या दुसऱ्या लाटेदरम्यान विमा नियामक कंपनी असलेल्या आयआरडीएने आरोग्य संजीवनी पॉलिसीची कव्हर रक्कम दुप्पट करण्याचे आदेश दिले आहेत. विमा कंपन्यांना १ मेपर्यंत १० लाख रुपयांपर्यंत कव्हर देणारी पॉलिसी सादर करावी लागेल. यापूर्वी गतवर्षी १ एप्रिलपासून सुरू झालेल्या आरोग्य संजीवनी पॉलिसीची किंमत कमाल पाच लाख रुपयांपर्यंतच होती.
गॅस सिलेंडरच्या दरात होणार बदल सरकारी तेल कंपन्या दर महिन्याच्या पहिल्या तारखेला गॅस सिलेंडरच्या दरात बदल करतात. १ मेलासुद्धा गॅस सिलेंडरच्या नव्या किमती जाहीर होणार आहेत. या किमतींमध्ये वाढ होऊ शकते किंवा पुन्हा कपात होऊ शकतो. याबाबतची घोषणा १ मे रोजी होईल.
मे महिन्यात १२ दिवस बंद राहणार बँका मे महिन्यामध्ये एकूण १२ दिवस बँका बंद राहणार आहेत. मात्र यामधील काही दिवस असे आहेत. जेव्हा संपूर्ण देशातील बँका बंद राहणार नाहीत तर काही राज्यांमध्येच त्या बंद राहतील. आरबीआयच्या संकेतस्थळावर देण्यात आलेल्या सुट्ट्यांमधील काही सुट्ट्या ह्या स्थानिक पातळीवरील आहेत.