याला म्हणतात कमाल…, HDFC BANK च्या शेअर होल्डर्सना मिळणार १५५० टक्के डिविडेंड By ऑनलाइन लोकमत | Published: April 24, 2022 04:46 PM 2022-04-24T16:46:08+5:30 2022-04-24T16:56:24+5:30
HDFC BANK Share Holders : देशातील सर्वात मोठी खासगी क्षेत्रातील मोठी बँक एचडीएफसीनं गेल्या आर्थिक वर्षासाठी डिविडेंडची घोषणा केली आहे. देशातील सर्वात मोठी खासगी क्षेत्रातील बँक HDFC BANK नं आपल्या शेअर होल्डर्सना १५५० टक्क्यांचा डिविडेंड देण्याची घोषणा केली आहे. बँकेच्या संचालक मंडळानं ३१ मार्च २०२२ रोजी संपलेल्या आर्थिक वर्षासाठी १ रुपयाच्या फेस व्हॅल्यू एक शेअरवर हा डिविडेंड देण्यास मंजुरी दिली आहे. गेल्या ११ वर्षांतील हा सर्वाधिक डिविडेंड आहे.
बँकेच्या संचालक मंडळानं २३ एप्रिल रोजी झालेल्या बैठकीत प्रति शेअर १५.५० रुपयांचा डिविडेंड देण्याच्या निर्णयाला मंजुरी दिली आहे, अशी माहिती बँकेनं बीएसईला दिली. बँकेच्या १ रुपयाच्या फेस व्हॅल्यूच्या शेअरवर हा १५५० टक्क्यांचा रिटर्न आहे. परंतु आता यावर एजीएममध्ये अंतिम मंजुरी घेणं बाकी आहे.
बँकेनं दिलेल्या माहितीनुसार डिविडेंडसाठी बँकेनं १३ मे २०२२ ही तारीख निश्चित केली आहे. ज्या गुंतवणूकदारांकडे या तारखेला बँकेचे शेअर्स असतील, त्यांना डिविडेंड मिळणार आहे.
खासगी क्षेत्रातील दुसरी मोठी बँक असलेल्या HDFC बँकेला ३१ मार्च २०२२ अखेर संपलेल्या तिमाहीत १० हजार कोटींचा नफा झाला आहे. यंदा नफ्यात २३ टक्के वाढ झाली. एचडीएफसी बँकेने चौथ्या तिमाहीचे निकाल जाहीर केले.
HDFC बँकेला जानेवारी ते मार्च २०२२ या तिमाहीत १०,०५५.२ कोटींचा नफा झाला. गेल्या वर्षी याच तिमाहीत बँकेला ८,१८५.५१ कोटींचा नफा झाला होता. यंदा नफ्यात २३ टक्के वाढ झाली.
HDFC बँकेला व्याजातून १८,८७२.७ कोटींचे निव्वळ उत्पन्न मिळाले आहे. बँकेच्या कर्ज वितरणात २२०.९ टक्के वृद्धी झाली आहे. तर किरकोळ कर्ज वितरण १५ टक्क्यांनी वाढले असल्याचे बँकेने म्हटले आहे.
HDFC बँकेच्या ठेवींमध्ये १६.८ टक्के वृद्धी झाली असून हा आकडा १५.५९ लाख कोटींवर गेला आहे. त्याशिवाय किरकोळ ठेवीमध्ये देखील १८.५ टक्के वाढ झाली आहे.
HDFC बँकेच्या घाऊक ठेवींमध्ये १० टक्के वृद्धिदर नोंदवण्यात आला असल्याचे बँकेच्या आकडेवारीतून दिसून येते. चौथ्या तिमाहीत बँकेने ५६३ नवीन शाखा सुरु केल्या. यामुळे ३१ मार्च २०२२ अखेर बँकेच्या एकूण शाखांची संख्या ६,३४२ वर गेली आहे.
एचडीएफसी बँकेत एचडीएफसी या कंपनीचे विलीनीकरण करण्याची घोषणा करण्यात आली होती. एचडीएफसीच्या संचालक मंडळाने हा विलीनीकरणाचा प्रस्ताव मंजूर केला होता. या विलीनीकरणानंतर एचडीएफसी भागधारकांना २५ शेअरच्या तुलनेत एचडीएफसी बँकेचे ४२ शेअर मिळणार आहेत.