'या' म्युच्युअल फंडात अवघ्या १०,००० च्या SIP मधून कमावले १.१२ कोटी रुपये; कसं आहे गुंतवणुकीचं गणित? By ऑनलाइन लोकमत | Published: October 6, 2024 01:53 PM 2024-10-06T13:53:48+5:30 2024-10-06T14:21:16+5:30
Mutual Fund Scheme : गुंतवणूकदारांनी केवळ मागील परताव्याच्या आधारावर कोणताही गुंतवणूक निर्णय घेऊ नये. त्यासाठी फंडाचा थोडा अभ्यास करणे आवश्यक आहे. कमी उत्पन्नातही कोट्यधीश व्हायचं असेल तर एक गोष्ट लक्षात ठेवा की चक्रवाढ ही दीर्घकाळात पैसे कमविण्याची गुरुकिल्ली आहे. जर तुम्ही म्युच्युअल फंड योजनेत दीर्घकाळ गुंतवणूक केली तर तुमचं श्रीमंत होण्याचं स्वप्न सत्यात उतरण्यास नक्कीच मदत होईल.
म्युच्युअल फंड योजनेत सिस्टिमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन अर्थात एसआयपीद्वारे कमी रकमेतही गुंतवणूक करता येते. आज आम्ही तुम्हाला अशाच एका म्युच्युअल फंड योजनेबद्दल माहिती देणार आहोत. सुंदरम फोकस्ड फंड नोव्हेंबर २००५ मध्ये सुरू झाला आहे. तेव्हापासून या फंडाने उत्कृष्ट परतावा दिला आहे.
जर तुम्ही गेल्या एका वर्षात सुंदरम फोकस्ड फंडमध्ये SIP द्वारे दरमहा १०,००० रुपयांची गुंतवणूक केली असती, तर १ लाख २० हजार रुपयांचे १ लाख ४४ हजार झाले असते. म्हणजे गेल्या एका वर्षात ४०.५० टक्के परतावा या योजनेतून मिळाला. हीच गुंतवणूक सलग ३ वर्षे केली असती तर ३ लाख ६० हजार रुपयांचे ५ लाख १३ हजार रुपये झाले असते.
त्याचप्रमाणे, जर पाच वर्षांसाठी गुंतवणूक केली असेल, तर एकूण ६ लाख रुपयांच्या गुंतवणुकीवर १० लाख ७१ हजार रुपयांचा परतावा मिळाला असता. म्हणजे २३.३८ टक्के वार्षिक परतावा. या म्युच्युअल फंडामध्ये सुरुवातीपासूनच SIP द्वारे १० हजार रुपयांची नियमित गुंतवणूक करणाऱ्याकडे आज १ कोटी 20 लाख रुपये आले असते.
हा एक फोकस्ड म्युच्युअल फंड आहे जो ११ नोव्हेंबर २००५ रोजी लॉन्च झाला होता. या योजनेत बँका (२१.३%), किरकोळ (११.२%), विद्युत उपकरणे (८.१%), फार्मा (७.४%), दूरसंचार (७.२%), IT (७.१%), पेट्रोलियम उत्पादने (६.३%), एरोस्पेस (५.२%), बांधकाम (४.९%) आणि वित्त (४.६%) यांसारख्या क्षेत्रांचा समावेश आहे.
एखाद्या वर्षातील आकर्षक रिटर्न्स पाहून कुठेही गुंतवणूक करू नका. कारण भूतकाळातील परतावा नजीकच्या भविष्यात चालू राहू शकतो का? हे तपासणे आवश्यक आहे. (Disclaimer- यामध्ये म्युच्युअल फंडाच्या कामगिरीविषयी माहिती देण्यात आलेली आहे. हा गुंतवणूकीचा सल्ला नाही. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील जाणकार किंवा तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)