ज्येष्ठांसाठी बेस्ट आहे पोस्टाची ‘ही’ स्कीम; केवळ व्याजातून होईल ₹१२,००,००० पेक्षा जास्त कमाई
By जयदीप दाभोळकर | Updated: April 22, 2025 09:12 IST2025-04-22T09:05:40+5:302025-04-22T09:12:04+5:30
Senior Citizens Savings Scheme: बहुतांश वृद्ध निवृत्तीनंतर आपली बचत अशा ठिकाणी गुंतवणं पसंत करतात जिथे त्यांना चांगलं व्याज मिळेल आणि त्यांचे कष्टानं कमावलेले पैसेही पूर्णपणे सुरक्षित राहतील.

Senior Citizens Savings Scheme: बहुतांश वृद्ध निवृत्तीनंतर आपली बचत अशा ठिकाणी गुंतवणं पसंत करतात जिथे त्यांना चांगलं व्याज मिळेल आणि त्यांचे कष्टानं कमावलेले पैसेही पूर्णपणे सुरक्षित राहतील. त्यामुळेच बहुतांश ज्येष्ठ नागरिक आपले पैसे मुदत ठेवींमध्ये गुंतवतात. ज्येष्ठ नागरिकांना गुंतवणुकीसाठी प्रवृत्त करण्यासाठी बँका त्यांना ०.५० टक्के अधिक व्याज देतात.
परंतु एफडीव्यतिरिक्त ज्येष्ठ नागरिक ज्येष्ठ नागरिक बचत योजनेतही गुंतवणूक करण्याचा विचार करू शकतात. या योजनेत त्यांना खूप चांगलं व्याज मिळतं, जे अनेक ठिकाणी एफडीवरही मिळत नाही. या योजनेत ५ वर्षे गुंतवणूक केल्यास ज्येष्ठ नागरिकांना ६ लाख रुपयांपेक्षा जास्त व्याज मिळू शकतं.
एससीएसएसवर सध्या ८.२ टक्के दरानं व्याज मिळत आहे. ज्येष्ठ नागरिक या योजनेत जास्तीत जास्त ३०,००,००० रुपयांपर्यंत गुंतवणूक करू शकतात, तर किमान गुंतवणुकीची मर्यादा १००० रुपये आहे. या योजनेत जमा रकमेवर त्रैमासिक आधारावर व्याज दिलं जातं. ही योजना पाच वर्षांनंतर मॅच्युअर होते.
जर तुम्हाला ५ वर्षांनंतरही या योजनेचा लाभ सुरू ठेवायचा असेल तर डिपॉझिट मॅच्युअर झाल्यानंतर तुम्ही खात्याचा कालावधी तीन वर्षांपर्यंत वाढवू शकता. मॅच्युरिटीच्या एका वर्षाच्या आत ही मुदत वाढवता येते. मुदतपूर्तीच्या तारखेला लागू असलेल्या दरानं विस्तारित खात्यावर व्याज दिलं जाते. एससीएसएसमधये कलम ८० सी अंतर्गत करसवलतीचाही लाभ मिळतो.
जर तुम्हाला तुमचं डिपॉझिट कॅपिटल वेगानं वाढवायचं असेल तर ही योजना एक चांगला पर्याय ठरू शकते. जर तुम्ही या योजनेत आपल्या जमा भांडवलातून ३० लाख रुपये जमा केले तर तुम्हाला केवळ ८.२% व्याजदरानुसार १२,३०,००० रुपये मिळू शकतात. अशा परिस्थितीत प्रत्येक तिमाहीवर ६१,५०० रुपये व्याज म्हणून मिळतील आणि ५ वर्षांनंतर ४२,३०,००० रुपये तुम्हाला मिळतील.
जर तुम्ही ५ वर्षांसाठी १५ लाख रुपये जमा केले तर सध्याच्या ८.२ टक्के व्याजदरानुसार तुम्हाला ५ वर्षात फक्त व्याज म्हणून ६,१५,००० रुपये मिळतील. तिमाही आधारावर व्याजाची गणना केल्यास ती ३०,७५० रुपये होईल. अशा प्रकारे १५,००,००० आणि ६,१५,००० व्याजाची रक्कम जोडल्यानंतर एकूण २१,१५,००० रुपये मॅच्युरिटी अमाउंट म्हणून दिले जातील.
ज्येष्ठ नागरिक बचत योजना ही ठेव योजना आहे. यामध्ये ५ वर्षांसाठी रक्कम जमा केली जाते. ६० वर्षे किंवा त्यापेक्षा जास्त वय असलेली कोणतीही व्यक्ती गुंतवणूक करू शकते. त्याचबरोबर व्हीआरएस घेणाऱ्या नागरी क्षेत्रातील सरकारी कर्मचारी आणि संरक्षणातून निवृत्त होणाऱ्या कर्मचाऱ्यांना काही अटींसह वयोमर्यादेत सवलत दिली जाते.