मुकेश अंबानींचं साम्राज्य धोक्यात; अब्जाधीशाची कंपनी भारतात येणार; इंटरनेट सुस्साट चालणार

By ऑनलाइन लोकमत | Published: March 2, 2021 11:23 AM2021-03-02T11:23:48+5:302021-03-02T11:29:03+5:30

गेल्या काही महिन्यांपासून रिलायन्स जिओनं दूरसंचार क्षेत्रासह इंटरनेट सेवा क्षेत्रातही मुसंडी मारली आहे. या क्षेत्रातल्या दिग्गज कंपन्यांना कडवी टक्कर देत जिओनं दमदार कामगिरी केली. मात्र आता जिओला जोरदार धक्का बसण्याची शक्यता आहे.

जिओनं आधी स्वस्तात मोबाईल इंटरनेट सेवा सुरू केली. त्यानंतर जिओ फायबरच्या माध्यमातून वायफाय सेवेचा श्रीगणेशा केला. त्यामुळे इंटरनेट क्षेत्रात जिओचा डंका वाजू लागला. रिलायन्स समूहाला मिळणाऱ्या महसुलात जिओचा मोठा वाटा आहे.

जिओच्या माध्यमातून मुकेश अंबानींनी इंटरनेट सेवा क्षेत्रात आपलं साम्राज्य उभारलं. मात्र आता या साम्राज्याला धक्का देण्याची तयारी टेस्लाचे प्रमुख एलन मस्क यांनी सुरू केली आहे.

अंतराळ क्षेत्रासह इलेक्ट्रिक कार क्षेत्रातही दमदार कामगिरी करणारे मस्क आता भारतात इंटरनेटवर आधारित इंटरनेट सेवा देणार आहेत. पुढील वर्षापर्यंत मस्क स्टारलिंक सॅटेलाईट इंटरनेट सेवा सुरू करणार आहेत.

स्टारलिंक सॅटेलाईट इंटरनेट वेबसाईटनं दिलेल्या माहितीनुसार, भारतीय नागरिक ९९ डॉलर (जवळपास ७३०० रुपये) भरून प्री-ऑर्डर करू शकतात. स्टारलिंकनं भारतात सेवा सुरू केल्यावर या ग्राहकांना प्राधान्य देण्यात येईल. त्यांना सर्वात आधी इंटरनेट सेवा मिळेल.

स्टारलिंककडून दिल्या जाणाऱ्या उपकरणांसाठी ७३०० रुपये आकारण्यात येतील. ही रक्कम अनामत रक्कम म्हणून घेतली जाईल. कंपनीनं ग्राहकांच्या क्षेत्रात सेवा सुरू केल्यावर त्यांना याची माहिती दिली जाईल.

कंपनीनं इंटरनेट सेवा सुरू केल्यानंतर ग्राहकांना स्टारलिंक किट उपलब्ध करून देण्यात येईल. प्री-ऑर्डर करण्यासाठी ऍपल पे, डेबिट किंवा क्रेडिट कार्डचा वापर करू शकतात.

प्री-ऑर्डर करताना घेतली जाणारी रक्कम रिफंडेबल असेल, असं स्टारलिंककडून सांगण्यात आलं आहे. पण रक्कम परत दिली गेल्यावर प्रायॉरिटी सेवा मिळणार नाही. सुरुवातीला स्टारलिंकचं हार्डवेअर किट मर्यादित संख्येत मिळेल.

स्टारलिंक सॅटेलाईट ब्रॉडबँड सर्व्हिसची चाचणी मस्क यांच्या स्पेसएक्स कंपनी करत आहे. स्टारलिंकची सेवा घेणाऱ्या ग्राहकांना ५० ते १५० एमबीपीएस इतका वेळ मिळेल.

स्टारलिंकची सुविधा सर्वप्रथम देशातल्या प्रमुख शहरांमध्ये उपलब्ध करून देण्यात येईल. मुंबई, दिल्ली, कोलकाता, चेन्नई आणि हैदराबादमध्ये स्टारलिंक सेवा सुरू करेल. स्टारलिंक किटमध्ये ग्राहकांना एक सॅटेलाईट डिश, एक ट्रायपॉड आणि एक वायफाय राऊटर मिळेल. ही सेवा मिळवण्यासाठी स्टारलिंकचं ऍप डाऊनलोड करावं लागेल.