१५ हजार वेतन आहे?; तर जाणून घ्या काय आहे तुमच्या PF खात्यासंबंधी महत्त्वाची अपडेट

By ऑनलाइन लोकमत | Published: August 14, 2021 04:58 PM2021-08-14T16:58:03+5:302021-08-14T17:10:06+5:30

जर तुमचं वेतन १५ हजार रूपये असेल आणि तुमचा PF कापला जात असेल तर तुमच्यासाठी एक नवी अपडेट आहे. EPFO नं ट्विटरद्वारे दिली नवी महत्त्वाची माहिती.

Provident Fund New Update : जर तुमचं वेतन १५ हजार रूपयांपेक्षा अधिक आणि जर तुमचा पीएफ कापला जात आहे, तर EPFO नं तुमच्यासाठी एक नवी अपडेट आणली आहे.

या नव्या अपडेटमध्ये Aadhaar-UAN लिंकिंगपासून PF वर मिळणाऱ्या जीवन विम्याबद्दल अपडेट सामील आहे. इम्प्लॉई डिपॉझिट लिंक इन्शुरन्स स्कीम १९७६ अंतर्गत विमा कव्हरेज ६ लाखांवरून वाढवून आता ७ लाख करण्यात आलं आहे.

दरम्यान, ही वाढ एप्रिल महिन्यातच करण्यात आली आहे. परंतु अनेकांना याबाबत कल्पना नाही. या वाढीनंतर तुमच्या खात्यात Nominee अपडेट करणं अनिवार्य करण्यात आलं आहे.

EPFO द्वारे एक व्हिडीओ ट्वीट करण्यात आला आहे. यामध्ये क्षेत्रीय कमिश्नर कार्तिकेय सिंह यांनी माहिती देताना सांगितलं की EPFO अंतर्गत तीन योजनांद्वारे विमा सुविधेचा लाभ घेतला जाऊ शकतो.

यामध्ये एम्प्लॉई डिपॉझिट लिंक इन्शुरन्स स्कीम १९७६ ही प्रमुख आहे. याअंतर्गत ज्या कर्मचाऱ्याचा EPF मेन्टेन केला जातो ते सर्वच आपोआप या स्कीमचे मेम्बर्स होतात. यासाठी वेगळी मेम्बरशीप घेण्याची गरज नाही ना कोणता प्रिमिअम द्यावा लागतो.

नियुक्ती करणाऱ्याकडून दर महिन्याला वेतनाच्या ०.५ टक्के अनुदान जमा करण्यात येतं. याशिवाय कोणत्याही आकस्मिक कारणामुळे कर्मचाऱ्याचा मृत्यू झाल्यास त्याच्या पीएफच्या रकमेसोबत विम्याची रक्कमही नॉमिनीला उपलब्ध करून दिली जाते.

या अंतर्गत मिळणाऱ्या विम्याच्या रकमेत EPFO द्वारे एप्रिल महिन्यात वाढ करण्यासत आली आहे. ही रक्कम यापूर्वी ६ लाख होती. ती आता वाढवून ७ लाख करण्यात आली आहे. या अंतर्गत मिनिमम अशॉरन्स बेनिफिट म्हणून २.५ लाख रूपयांचा लाभ मिळत होता. ज्याचा हा लाभ लॅप्स झाला होता तोदेखील त्यांना उपलब्ध करून दिला जाणार आहे.

कोरोना महासाथीच्या पार्श्वभूमीवर हा उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. याशिवाय EPFO अंतर्गत ई-नॉमिनेशनची सुविधा सुरु करण्याचे प्रयत्न केले जात आहे. या अंतर्गत आता तुम्ही घरबसल्या आपलं नॉमिनेशन फाईल करू शकता.

गेल्या अनेक दिवसांपासून UAN आणि Aadhaar लिंक करण्याबाबत विचार सुरू आहे. ज्यानंतर कोणताही कर्मचारी थेट EPFO शी जोडला जाईल. तसंच त्यांना अनेक प्रकारच्या सुविधा मिळतील. सप्टेंबरपर्यंत आधार लिंक न केल्यास एम्पलॉयर खात्यात पैसे जमा करू शकणार नसल्याचं सिंह म्हणाले.

ही अतिशय चांगली सुरूवात आहे. परंतु ती नवी आहे. यापूर्वीच्या नियमांपेक्षा ती उत्तम आहे. जे इन्शुरन्स खरेदी करू शकत नाहीत, त्या कमी वेतन असलेल्या कर्मचाऱ्यांच्याही कामाची स्कीम आहे. याशिवाय लोकं स्वत:च आपला प्रिमिअम जमा करू शकतील अशी सुविधा दिली गेली पाहिजे, असं मत व्हॅल्यू रिसर्चचे मुख्य कार्यकारी अधिकारी धीरेंद्र कुमार म्हणाले.