सन २०२१ मध्ये ‘या’ उद्योजकांचा बोलबाला! मिळकतीमुळे मोठी चर्चा; कमाईचा आकडा पाहून व्हाल अवाक्

By ऑनलाइन लोकमत | Published: December 27, 2021 03:34 PM2021-12-27T15:34:19+5:302021-12-27T15:50:48+5:30

रतन टाटा, अदर पूनावाला ते फाल्गुनी नायर यांसारख्या भारतीय उद्योजकांची सन २०२१ मध्ये विविध कारणांसाठी जोरदार चर्चा झाली. जाणून घ्या, डिटेल्स...

जगभरात सर्वांना आता सन २०२२ ची चाहूल लागली आहे. सन २०२१ च्या कटू आठवणी दूर सारून सर्वजण सन २०२२ सकारात्मक आणि आशादायी ठरो, अशी प्रार्थना करत आहेत. यंदाच्या वर्षी कोरोनामुळे मोठा फटका बसलेल्या उद्योग क्षेत्राची चर्चा सर्वत्र सुरू होती.

कोरोनाचा फटका बसल्याने अनेक उद्योग बंद झाले. त्यामुळे बेरोजगारांची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढली. मात्र, अशाही भीतीच्या आणि दहशतीच्या काळात काही उद्योग अगदी सुस्साट सुरू होते. या उद्योगांनी स्वतःसोबत गुंतवणूकदारांनाही मालामाल केले.

शेअर मार्केटने विक्रमी स्तरही गाठला. तसेच तो दणकन आपटलाही. मात्र, तरीही शेअर बाजारात धडकणाऱ्या IPO ची संख्या कमी झाली नाही. उलट गेल्या वर्षांच्या तुलनेत त्यात मोठी वाढ झाली.

याच निमित्ताने अनेकविध कंपन्या आणि त्यांचे संस्थापक, मालक, प्रमोटर्स यांची मोठ्या प्रमाणात चर्चा झाली. काही IPO ने दमदार रिटर्न्स दिले. तर काही IPO चा फुगा फुटला. चला तर मग जाणून घेऊया, त्या उद्योगपतींविषयी ज्यांच्या उत्पन्नाची अधिक चर्चा झाली.

सन २०२१ मध्ये मुकेश अंबानी यांनी विविध क्षेत्रात नवीन प्रवेश करण्यास व्यस्त दिसले. ग्रीन एनर्जीसाठी ७५ हजार कोटी रुपयांच्या गुंतवणुकीची त्यांनी घोषणा केली. RIL ने शेअर मार्केटमध्येही दमदार कामगिरी केली. फोर्ब्सच्या अहवालानुसार, मुकेश अंबानी जगभरातील टॉप १० श्रीमंत व्यक्तींच्या यादीत सामील झाले असून, त्यांचे नेटवर्थ ८५ अब्ज डॉलर आहे.

दुसरीकडे अदानी समूहाचे प्रमुख गौतम अदानी मुंद्रा पोर्ट आणि मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या व्यवस्थापन अधिग्रहणावरून खूपच चर्चेत राहिले. सोशल मीडियावरून टीकाही करण्यात आली. मात्र, विमानतळांसह काही कंपन्यांचे अधिग्रहण यामुळे अदानी समूहाला खूपच फायदा झाला. अदानी समूहाच्या अनेक कंपन्यांनी शेअर मार्केटमध्ये मोठी कामगिरी केली. गौतम अदानी यांचे नेटवर्थ ५० अब्ज डॉलर असल्याचे सांगितले जात आहे.

IPO मुळे पेटीएमचे संस्थापक आणि व्यवस्थापकीय संचालक विजय शेखर शर्मा यांच्या नावाचाही मोठा बोलबाला पाहायला मिळाले. आतापर्यंतचा सर्वांत मोठा IPO आणण्याचा विक्रम प्रस्थापित झाल्याचे सांगितले जात आहे. लिस्टिंगच्या दिवशी पेटीएमचे बाजारमूल्य १ लाख कोटी रुपयांवर गेले होते. २१५० रुपये किमतीचा पेटीएमचा शेअर १५०० रुपयांपर्यंत खाली आला होता.

कोरोनाविरोधातील लढाईत सर्वांत प्रभावी अस्त्र म्हणजे लस. कोव्हिशिल्ड लसीचे उत्पादन करणाऱ्या सीरम इन्स्टिट्यूटचे अदर पूनावाला यांची चर्चा जगभर झाली. देशातील मोठी लस निर्माता कंपनीने केवळ भारतालाच नाही, तर जगातील अनेक देशांना लस पुरवठा केला. अदर पूनावाला यांनी लंडनमध्ये ६९ हजार डॉलर प्रति आठवडा भाडेतत्त्वावर एक घर खरेदी केल्याची चर्चा चांगलीच रंगली.

शेअर मार्केटमधील बिग बूल अशी ओळख असलेल्या राकेश झुनझुनवाला यांचेही नाव अनेकदा चर्चेत राहिले. राकेश झुनझुनवाला यांची संपत्ती २२ हजार कोटी रुपये असल्याचे सांगितले जात आहे. पंतप्रधान मोदी यांच्याशी भेट आणि स्टार हेल्थचा IPO यामुळे ते चांगलेच चर्चेत राहिले. राकेश झुनझुनवाला यांचा पोर्टफोलियो अनेकांसाठी मार्गदर्शक ठरत असल्याचे सांगितले जात आहे.

सन २०२१ च्या अखेरीस नायकाचा IPO शेअर बाजारात येऊन धडकला आणि कंपनीच्या प्रमुख फाल्गुनी नायर यांचे नाव चर्चेत आले. ४९ व्या वर्षी उद्योगजगतात पाऊल ठेवणाऱ्या फाल्गुनी नायर अवघ्या काही वर्षांत अब्जाधीशांच्या यादीत जाऊन बसल्या. फाल्गुनी नायर जगातील सर्वांत शक्तिशाली महिलांपैकी एक असून, फोर्ब्स यादीत समावेश करण्यात आला आहे.

जगातील आघाडीच्या उद्योजकांपैकी एक असलेले दिग्गज नाव म्हणजे रतन टाटा. रतन टाटा यांच्या टाटा समूहासाठी सन २०२१ हे वर्ष खूपच शानदार राहिले. एअर इंडियाची घरवापसी, टाटा ग्रुपची सेमीकंडक्टर क्षेत्रात एन्ट्री, काही कंपन्यांचे अधिग्रहण, टाटा पॉवरचे हजारो ठिकाणी ईव्ही स्टेशन्स, ईव्ही सेक्टसाठी नवीन कंपनीची स्थापना, शेअर मार्केटमध्ये टाटा ग्रुपच्या कंपन्यांची कमाल कामगिरी, रतन टाटांना आसाम भूषण पुरस्कार, अशा अनेकविध कारणांमुळे टाटा समूह, रतन टाटा चर्चेत राहिले.

सोशल मीडियावर सक्रीय असलेल्या महिंद्रा अँड महिंद्रा कंपनीचे प्रमुख आनंद महिंद्रा यांची कायमच चर्चा असते. एखादी आवडलेली गोष्ट सर्वांसोबत शेअर करण्यामुळे आनंद महिंद्रा अनेकदा चर्चेत येतात. अलीकडेच सादर करण्यात आलेल्या XUV700 कारला प्रचंड लोकप्रियता मिळाली. ६५ हजारापर्यंत बुकिंग गेली. मात्र, सेमीकंडक्टर चीपच्या तुटवड्यामुळे ग्राहकांना कारची डिलिव्हरी देण्यात विलंब होत आहे. तसेच ऑलिम्पिक पदक विजेत्यांना कार भेट म्हणून दिल्यानेही आनंद महिंद्रा यांचे सर्वत्र कौतुक केले गेले.